चौकात बॅनरद्वारे कुत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, सोशल मीडियावर बॅनर व्हायरल
पनवेल शहरात एक अजब प्रकार घडला आहे. नवीन पनवेल येथील एचडीएफसी सर्कलजवळ काही जणांनी कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. त्यामुळे शहरभर चर्चेचा विषय सुरू आहे. नेहमीच्या बॅनरबाजीला कंटाळलेल्या नागरिकांनी अशी गांधीगिरी केली असावी, असे म्हणत अनेकांनी याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
इंटरनेटच्या या युगात वाढदिवस असो की कोणताही समारंभ, विविध जाहिरातीचे फलक सार्वजनिक ठिकाणी लावलेले असतात. काहीवेळा तर याचे प्रमाण अतिच होते. कोणताही चौक रिकामा नसतो. अशाच या बॅनरबाजीला कंटाळून म्हणा किंवा हौस म्हणून शहरातील एचडीएफसी सर्कल परिसरात काही अज्ञातांनी 'टायटन भाई' या कुत्र्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत.
बॅनरवर 'फर्स्ट हॅपी बर्थडे टायटन भाई' असा शुभेच्छा मजकूर लिहिलेला आहे. विशेष म्हणजे 'बेस्ट विशेस फ्रॉम' असा मजकूर लिहून इतर प्रजातीच्या कुत्र्यांचे फोटोज शुभेच्छुक म्हणून बॅनरवर टाकण्यात आले आहेत. शहरात असा बॅनर झळकल्याचे समजताच, अनेकांनी त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले. या वेगळ्या प्रकारच्या बॅनरमुळे उठसूठ कोणालाही शुभेच्छा देणारे मात्र नक्कीच खजिल झाले असणार.
वाढदिवस, लग्न, बारशाच्या निमित्ताने होर्डिंग्ज आणि पोस्टर्सवर झळकण्याची हौस अनेकांना असते. त्यातच बॅनरवर शुभेच्छुकांच्या यादीत अनेक जणांचे चेहरे चमकत असतात. दररोज अनेक बॅनर आणि पोस्टर्स चौकातील मोक्याची जागा अडवून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. त्यातील काही बॅनर्स तर परवानगी न घेता बेकायदेशीरपणे लावले जातात. त्यामुळे नवीन पनवेल येथील एचडीएफसी सर्कलजवळील चौकात कुत्र्याला शुभेच्छा देणारी ही पोस्टरबाजी करण्यात आली असून ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. पनवेल शहरात लागलेल्या या 'टायटन भाई' कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा बॅनरमुळे एकीकडे हशा पिकला आहे तर दुसरीकडे कोणीतरी जाणूनबुजून खोडसाळपणा केल्याचे बोलले जात आहे.