शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

गणेशाकडून काय घ्याल?

आपल्या सांस्कृतिक भारतात देवदेवतांची काहीच कमतरता नाही. त्यामुळे सण-समारंभही विपूल प्रमाणात साजरे होतात. यातले काही सण- समारंभ आनंदाचे, उत्साहाचे असतातच, पण काही स्वतःवर अंकुश लावणारे, संयमाची शिकवण देणारेही असतात. देवदेवतांचेही तसेच आहे. 

प्रत्येक शुभकार्यात पहिल्या पुजेचा मान गणरायाचा असतो. हा गणपती, गणाधीश आहे. तो सगळ्यांचा प्रमुख आहे, म्हणून हा त्याचा मान. पण या गणरायाकडून आपल्याला घेण्यासारखे बरेच काही आहे, याचा विचार आपण कधी केलाय का?

गणरायाकडे शुभ कार्याची सुरवात, विघ्नविनाशक, संकटमोचक म्हणून पाहिले जाते. पण हा बाप्पा आपल्या बरेच काही शिकवणाराही आहे.

गणेशाची विशाल मूर्ती आपल्याला सदैव सतर्क, जागरूक रहायला शिकवते. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही अडीअडचणींचा सामना करण्यासाठी आपण तयार रहायला पाहिजे, हे सांगते. त्याचवेळी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, असा सल्लाही देते.

गणरायाचे छोटे डोळे आपल्याला एकग्रता शिकवतात. आपल्या उद्दिष्टांकडेच लक्ष ठेवून ते साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम करायला सांगतात. गणेशाचे मोठे कान म्हणजे 'इतरांचे भरपूर काही ऐका' हा सल्ला देणारे आहेत. कमी बोला आणि जास्त ऐका हा सल्ला हल्ली मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमातही शिकवला जातो. गणपतीबाप्पा यापेक्षा वेगळे काय सांगतो?

गणेशाचे मोठे पोट म्हणजे इतरांच्या चुका, त्यांनी सांगितलेल्या वाईट गोष्टी, वाईट घटना आपल्या पोटात सामावून घ्या. त्या बाहेर काढू नका वा जाऊ देऊ नका ही शिकवण देणारे आहे. गणेशाचे मुख म्हणजे 'कमी बोला पण गोड बोला' हा संदेश देते. त्याचे विशाल मस्तक आपल्याला चांगला आणि सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा देते.

गणरायाचे वाहन मूषक म्हणजे उंदिर आहे. गणेशाने त्याला नियंत्रित केले आहे, म्हणून त्याची चंचलता कमी झाली आहे. तद्वतच आपणही आपल्यातल्या चंचलतेवर, अस्थिरतेवर नियंत्रण राखले पाहिजे. इतरांची कुचेष्ठा करणे किंवा त्याच्या नावे बोटे मोडणे थांबवले पाहिजे.

हे सगळे ध्यानी धरून गणरायाची आराधना केल्यास बाप्पा नक्कीच तुम्हाला पावेल.