रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 21 जून 2021 (12:21 IST)

या प्रवासात आपण साधनांतच गुंतत जातो

पंढरपुरात एक भिक्षुक होता.रोज घरोघरी भिक्षामागुन जीवन जगायचा.त्याला स्वत:चे घर नसल्यामुळे आणि जवळचं कुणी नसल्यामुळे तो एकटाच धर्मशाळेत रहायचा.कुणी त्याला अन्न द्यायचं,कुणी जुने कपडे तर कुणी पैसे द्यायचं.रोजचं गरजेपुरतं अन्न भेटलं की भिक्षा मागणं बंद करायचा,जरूरी नसलेले कपडे इतर गरजू लोकांना दान द्यायचा.त्याला स्वत:चा असा काहीच खर्च नव्हता त्यामुळे दिलेले पैसे तसेच राहु लागले.हळूहळू त्यात तो आसक्त झाला आणि रोज किती पैसे झाले हे मोजण्यात  दिवस घालवू लागला.
 
भरपूर पैसे जमा झाल्यावर त्याने विचार केला काशीला जाउन गंगेचं स्नान करू,विश्वनाथाचं दर्शन घेऊन पुण्य मिळवू.आताही भिक्षा मागून जेवत होता आणि पैसे जमवत होता कारण तो त्या द्रव्याच्या मोहात होता.स्वत:च्या जेवणासाठीही पैसे खर्चायला त्याचं मन तयार होत नव्हतं इतका तो त्यात गुंतत चालला होता....
 
शेवटी एकदाचा तो गंगेकिनारी पोहोचला.वाटेत कितीतरी गरजू लोकं भेटले आजारी,भुकेले पण याने पैसे असुनही कुणाला मदत केली नाही,फक्त ते जीवापाड सांभाळले पूर्ण प्रवासात! आता स्नान करायला गंगेत उतरायचं पण पैशाची पिशवी कुठे ठेवायची हा प्रश्न आला .सोबत न्यायची तर भिजून खराब होतील,तिथेच ठेवली तर चोरीचं भय आणि कुणाकडे द्यायची तर अविश्वास ,फसवणुक होण्याची भिती....असं करता करता बराच वेळ गेला स्नान करून पुण्य तर मिळवायचं होतंच पण पैशाची आसक्ति त्याला रोखत होती .गंगा समोर ,विश्वनाथ शेजारी पण मन मात्र पिशवीत!!
 
शेवटी कसंतरी मन पक्क करून वाळूत खड्डा खोदला त्यात पिशवी ठेवली .पण नदीतून बाहेर आल्यावर जागा कशी ओळखायची?मग त्यावर एक शिवलिंग तयार केलं आणि स्नान करायला गेला मन पिशवीत ठेउन!इकडे अजून भाविक आले,त्यांना वाटलं स्नानापूर्वी शिवलिंग करण्याची प्रथाचआहे आणि पहातापहाता तिथे बरेच शिवलिंग तयार झाले.
 
भिक्षुक गंगेच्या बाहेर आला आणि इतके शिवलिंग पाहुन व्यथित झाला आणि ज्याला सांभाळण्यात आणि जमवण्यात भरपूर शक्ती व्यर्थ झाली होती ते सर्व द्रव्य त्याने काही क्षणात गमावले.त्याच्या नादात तो गंगास्नानाचं पूण्यही विसरला आणि काशीविश्वनाथाच्या दर्शनाच्या आनंदालाही मुकला!
 
आपलंही थोडंफार असंच होत नाही का? आपण आनंद सुखाच्या शोधात निघतो. पैसे कमवण्यात,जास्त जास्त वस्तू जमवण्यात,यश प्रसिद्धी वाढवण्यात आनंद मिळेल असं वाटतं आणि ते आपण करत जातो.... जीवापाड मेहनत करतो,यश संपादन करतो ,जीवन चांगलं जगण्यासाठी जरूरीच ते....पण या प्रवासात आपण साधनांतच गुंतत जातो आणि साध्य समोर असलं तरी त्याचा अनुभव घ्यायला विसरतो. अजाणतेपणात गरजू लोकांना मदत करायचं विसरतो आणि एखाद्या क्षणी आपलं कमावलेलं सर्व वाळूखाली दबून नष्ट होतं.
 
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः।।
 
-सोशल मीडिया