मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: रविवार, 30 मे 2021 (09:45 IST)

संत चोखामेळा (चोखोबा)

संत चोखामेळा (चोखोबा) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा या गावी झाला. संत चोखोबांचे कुटुंब हे महार जातीचे होते.ते वऱ्हाडातील असल्याचे म्हटले जाते.संत चोखोबा हे एक संत ज्ञानेश्वर यांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होते.
 
संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ होते. ते उदरनिर्वाहासाठी कबाड कष्ट मोलमजुरी करत होते.त्यांची पत्नी सोयराबाई, बहीण निर्मला, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे कबाड कष्ट उपसायचे आणि नित्यनेमाने आणि भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण करायचे.
 
चोखोबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता.ते ओळखून  नामदेवांनी चोखोबांची हाडे गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली. 
 
संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते.
त्यावेळी गावात शूद्रांना तुच्छ समजायचे गावातल्या शिवाशिवीच्या वातावरणात त्यांना अस्वस्थ वाटायचे.प्रापंचिक जीवनात दारिद्र्य दैन्य, वैफल्यतेमुळे देखील त्यांना अस्वस्थ वाटत होते,परंतु एवढे असून त्यांना प्रत्यक्ष परमेश्वराने आपल्या जवळ केले.ते शूद्र असल्यामुळे त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता.विठ्ठलाला भेटावे अशी हुरहूर त्यांचा मनात होती.सावळे गोजिरे रूप महाद्वारातून पहावे लागायचे.ही खंत त्यांच्या मनात होती.
 
एकादशीच्या सकाळी  संतांबरोबर चोखामेळा आपल्या कुटुंबासह भूलोकीच्या वैकुंठाला निघाले.पंढरपुरला आल्यावर पांडुरंगाच्या देवळा बाहेर उभे राहून दुरून दर्शन झाले आणि ते या सावळ्या परब्रह्माच्या प्रेमात अडकून पडले. ठरलं आपण आता इथेच पंढरपूर चंद्रभागेत लांब जाऊन आंघोळ करून रोज महाद्वारापाशी येऊन विठ्ठलाला मनात आठवून हृदयात साठवून लोटांगण घालावेत.अशी त्यांची इच्छा होती.रात्री अचानक पंढरीनाथ आले आणि म्हणाले, चल माझ्यासोबत मी तुला मंदिरात नेतो. आता तुला माझा राग येतो आणि क्षणार्धात चोखोबा आणि विठ्ठल गाभा-यात आले. आणि विठ्ठल चक्क चोखोबाला म्हणाले . दररोज सकाळी मी तुला महाद्वाराबाहेर उभा असलेला पाहत असतो. तुझी आठवण येत नाही, असा क्षण ही जात नाही. नाम्याचा नैवेद्य खाताना, पाणी पिताना तुझ्या आठवणीने उचकी येते. तुझ्या आठवणीत हे होतं. हे ऐकून चोखोबांचे डोळे भरून आले. ते विठोबाचे पाय धरून   एवढेच बोलू शकले  विठ्ठला मायबापा तूच आहेस. 
बाजूला असलेल्या एका पुजाऱ्याला हा संवाद ऐकू येत होता.त्या पुजाऱ्याला पांडुरंगाचा आवाज तर ऐकू आला नाही परंतु चोखोबांचा आवाज त्याने ऐकला.त्याने धावत जाऊन ही बातमी इतर पुजारी मंडळींना सांगितली सगळे जमले.तिथे त्यांना चोखोबा विठ्ठलाच्या मूर्तीजवळ हात जोडून असलेला दिसला.त्याने उत्तर दिले की माझी काहीच चूक नाही प्रत्यक्ष पांडुरंगाने मला हात धरून इथं आणले आहे.  
 यावर सगळ्या वरिष्ठांनी त्यांना दरडावून सांगितले या पंढरपुरात राहायचं नाही.हे ऐकल्यावर तुकोबांनी त्यांना सांगितले की, नदी पात्रात जर शुद्ध आणि अशुद्ध पाण्याने अंघोळ केली तर नदीचे पाणी बाटत नाही आणि शुद्राच्या अंगाला वारा लागल्यास वारा शुद्र होतो का? यामध्ये मग विठ्ठल कसा जातीमध्ये भेद करेल विठ्ठलाला ही सर्व जाती सारख्याच आहेत. त्याचे हे बोलणे ऐकून सर्व मंडळी थक्क झाली. 
संत चोखोबा हे आपल्या उदरनिर्वाहासाठी पंढरपुरी येथे गेले असता. विठ्ठल भक्तीत दंग झाले ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरण व भजनात रंगून जायचे. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हरिभक्त पारायण करत असत. त्या सर्वांचे श्री विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वतः विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले. 
 ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत होते.किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम सुरू असताना एके दिवशी उजळ भिंत कोसळली व त्याखाली श्री चोखोबा आणि अनेक मजूर मयत झाले. ही घटना 1260 म्हणजे इ.स. 1338 मध्ये वैशाख, वद्य पंचमीस घडली. पुढे श्री संत नामदेव महाराज हे मंगळवेढ्यास आले. ज्या हाडांमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. म्हणजे ही हाडे श्री चोखामेळा यांच्या आहेत. असे ओळखून त्यांनी त्या पंढरपुरी विठ्ठल मंदिरापुढे सध्या नामदेव पायरी समाधी जवळ त्यांची समाधी बांधली.