बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री भक्तविजय अध्याय १४

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगोपालकृष्णाय नमः ॥    
आजि आनंद वाटला आमच्या मना ॥ जे नामयाची मांडिली समाराधना ॥ त्याचे पंक्तीस भोजना ॥ तुम्हां सज्जनां पाचारिलें ॥१॥
स्वानंदाचे कनकताटीं ॥ नवरस अन्नें वाढिलीं गोमटीं ॥ वैष्णव भक्त सेविती निकटी ॥ अक्षयी होती चिरंजीव ॥२॥
ये पंक्तीस बैसले कोण कोण ॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान ॥ गोरा कुंभार वैष्णव जाण ॥ आणि सांवता नरहरी ॥३॥
उद्धव अक्रूर नारद तुंबर ॥ आणिक वैष्णव वीर ॥ एकपंक्तीस शारंगधर ॥ बैसवी साचार तयांसी ॥४॥
ब्रह्मरस आवडीं सेवितां ॥ तृप्ति जाहली सकळ संतां ॥ त्यांचें उच्छिष्ट अवचितां ॥ पडलें आमुच्या मुखांत ॥५॥
तो महाप्रसाद चमत्कारिक ॥ लाधतां जाहलें कौतुक ॥ निजभक्तकथा अमोलिक ॥ वाचेसी येत निजप्रेमें ॥६॥
जैसें बीज पेरावें भूमींत ॥ पुढें तैसींच फळें येत ॥ तेवीं संतकृपेनें त्वरित ॥ त्यांचीं चरित्रें लाधलीं ॥७॥
आतां ऐका श्रोतेजन ॥ मागील अध्यायीं निरूपण ॥ नामयाचें उच्छिष्ट जगज्जीवन ॥ अति आवडीं सेवित ॥८॥
ब्राह्मण देखोनि ते अवसरीं ॥ विस्मित जाहले निजअंतरीं ॥ म्हणती हा अकर्मकारी ॥ कोण निर्धारीं कळेना ॥९॥
याचें घरीं सेविलें अन्न ॥ सत्कर्मासी मुकलों जाण ॥ आतां कोणीं कोणास प्रतिवचन ॥ न बोलवे सर्वथा ॥१०॥
प्रवासीं केलें भिक्षाटन ॥ दुष्काळीं भक्षिलें शूद्रान्न ॥ अज्ञानपणींचें जारपण ॥ सांगूं नये सर्वथा ॥११॥
मैत्र बोलिला एकांतगोष्टी ॥ कृपणासी धन पडिलें दृष्टीं ॥ संसाराची अकर्मराहटी ॥ सांगूं नये सर्वथा ॥१२॥
द्विजांसी घालितां सहस्रभोजन ॥ अवचित अन्नासी स्पर्शलें श्वान ॥ दृष्टीस देखतां सज्ञान ॥ सांगूं नये सर्वथा ॥१३॥
तंव एक बोले द्विजोत्तम ॥ आपलें अंगीं नसतां कर्म ॥ कासया करावें कोडें वर्म ॥ सत्यधर्म लपवूनि ॥१४॥
नकळत दोष अकस्मात ॥ घडतां चाले प्रायश्चित ॥ जघन्य होतां जनांत ॥ दोष न राहती क्षणमात्र ॥१५॥
अवगुण असला आपणांत ॥ तो अनुतापें सांगावा जगांत ॥ निंदा करित असतां लोक समस्त ॥ दोष नासती या योगें ॥१६॥
तरी आतां निःसंशयचित्त ॥ यासीच घालावें वाळित ॥ आपण त्रिपदा जपोनि त्वरित ॥ शुचिष्मंत असावें ॥१७॥
अज्ञानभ्रमें आम्हांसी पाहे ॥ नाहीं बोलिला प्रत्यवाये ॥ धर्मशास्त्रीं हा उपाये ॥ सिद्ध असे सर्वांसी ॥१८॥
ऐसा करूनि विचार ॥ मौनें चालिले द्विजवर ॥ मग तयांसी शारंगधर ॥ पाचारीत ते वेळीं ॥१९॥
मग म्हणे रुक्मिणीकांत ॥ कां आशंकित जाहलें चित्त ॥ म्लानमुखें करून समस्त ॥ जातसां त्वरित लगबगें ॥२०॥
काय आशंका तुमचें मनीं ॥ ते मज सांगा कृपा करूनी ॥ गुज सांगतां संशय मनीं ॥ तिळमात्र न धरावा ॥२१॥
ऐसें म्हणोनि जगज्जीवन ॥ हिरे रत्नें आणि सुवर्ण ॥ तुळसीदळ मिश्रित करून ॥ दक्षिणा भिजवून दिधली ॥२२॥
मग नामयासी उचलून ते अवसरीं ॥ घातला ब्राह्मणांचे चरणांवरी ॥ म्हणे कृपा असों द्या याजवरी ॥ ऐसें मुरारी बोलिले ॥२३॥
आणि आशंका वाटलीसे सहज ॥ तेही निवेदन करावी मज ॥ ऐसें बोलतां गरुडध्वज ॥ वदती द्विज तेधवां ॥२४॥
शिंपी म्हणती नामयातें ॥ प्रत्यक्ष बोलती निगुतें ॥ तुम्ही कैसे तयातें ॥ घेऊनि बैसलां निजपंक्तीं ॥२५॥
आपुला सांडूनि आचार ॥ त्यासीं केला अन्नव्यवहार ॥ उच्छिष्ट भक्षिलें साचार ॥ चित्तीं विचार न केला ॥२६॥
कवण लोभ धरूनि चित्तीं ॥ तुम्हांसी लागली नामयाची प्रीती ॥ निजकृपेची अद्भुत गती ॥ आम्हां निश्चितीं कळेना ॥२७॥
आम्हीं विचार केला अंतरीं ॥ तों दिसोन आला वेषधारी ॥ लीला अद्भुत वोडंबरी ॥ क्षणक्षणा पालटे ॥२८॥
वर्णाश्रमधर्म पाहीं ॥ तो न दिसेचि तुमचे ठायीं ॥ निर्धार न समजे कांहीं ॥ विचार देहीं केलिया ॥२९॥
वंद्य निंद्य निजदृष्टीसी ॥ सारिखेचि भासती तुम्हांसी ॥ द्वैतकल्पना निजमानसीं ॥ कदाकाळीं स्पर्शेना ॥३०॥
आपुल्याऐसेचि विश्वजन ॥ तुम्ही जाणतसां निश्चयेंकरून ॥ जैसें परिसासी लोह सुवर्ण ॥ निजदृष्टीं सारिखें ॥३१॥
कीं गंगा आणि ओहळ जाण ॥ सागरासी सारिखे दोघे जण ॥ कीं व्याघ्रगायींस समसमान ॥ उदक लेखी दोहींतें ॥३२॥
कीं शीत उष्ण पर्जन्यकाळ ॥ आकाशासी सारिखे तीन्ही वेळ ॥ नातरी बिदी नदी आणि ओहळ ॥ मेघासी जेवीं सारिखे ॥३३॥
कीं कल्पतरुवृक्षासी जाण ॥ राजा रंक समसमान ॥ नातरी मैलागिरी चंदन ॥ शीतळ सर्वांसी सारिखा ॥३४॥
कीं चोर जार सज्जनांवर ॥ सारिखाचि प्रकाशे दिनकर ॥ तेवीं वंद्य निंद्य तुम्हांसी नर ॥ समानचि भासती ॥३५॥
आपणाऐसेचि सर्व जन ॥ सर्वांसी भासे समान ॥ जेवीं धर्मराजासी नष्ट कोण ॥ धुंडितां एक दिसेना ॥३६॥
ब्राह्मणवेष धरिला तुम्हीं ॥ यावरी विश्वास धरिला आम्हीं ॥ परी भाव अंतरींचा स्वामी ॥ आम्हां स्पष्ट कळेना ॥३७॥
आपुलें स्वहित पाहूनी पापपुण्य विचारावें मनीं ॥ वेदवचन सत्य करूनी ॥ विधियुक्त वर्तावें ॥३८॥
तुम्हीं तों सर्वज्ञानसंपन्न ॥ सर्वशास्त्रीं दिसतां निपुण ॥ आतां वेदवचनासी देऊनि मान ॥ कर्माचरण करावें ॥३९॥
ते सांडोनि सर्व व्युत्पती ॥ नामयासी बहु लाविली प्रीती ॥ ऐसें आम्हांसी निश्चितीं ॥ कळों आलें ये समयीं ॥४०॥
ऐकूनि द्विजवरांची मात ॥ काय बोलती रुक्मिणीकांत ॥ नामयासी जेवविलें सांगात ॥ हा दोष आम्हांसी न ठेवावा ॥४१॥
चैतन्य चालक सर्वगत ॥ वंद्य निंद्य कोणा म्हणावें येथ ॥ पुण्य पाप आम्हां निश्चित ॥ बाधूं न शके सर्वथा ॥४२॥
मी शुद्ध बुद्ध निरंजन ॥ सर्वव्यापक चैतन्यघन ॥ अंतरसाक्ष असोनि जाण ॥ अलिप्त असें सर्वांसी ॥४३॥
देह म्हणाल शिंपियाचें ॥ तरी ओडंबर पंचतत्त्वांचें ॥ जेवीं आकाशीं अभ्र साचें ॥ नसतें भासे ज्या रीतीं ॥४४॥
नामा ऐसें नामदेवा ॥ कोणत्या वदावें अवयवा ॥ हें निर्धारूनि भूदेवा ॥ सांगा भाव मजलागीं ॥४५॥
तरी तेजीं किंवा जीवनीं ॥ धरणीं पवनीं अथवा गगनीं ॥ दोष होतां तुमचे नयनीं ॥ गोचर जाहला निजयुक्ती ॥४६॥
तुम्ही वेदवक्ते ब्राह्मण ॥ सर्वंशास्त्रीं असां निपुण ॥ परी ब्रह्मनिष्ठतेचें लक्षण ॥ पावले नाहींत सर्वथा ॥४७॥
भेदभ्रम तुमचा गेला नाहीं ॥ संदेहचि वाढला देहीं नामयानें संकल्प सोडितां पाहीं ॥ विचारणा नाहीं तैं केली ॥४८॥
कीं शिंपियाचें अन्न सेवावयासी ॥ अधिकार बोलिला नाहीं आम्हांसी ॥ यालागीं वारंवार तुम्हांसी ॥ प्रार्थूनि खूण सांगतसें ॥४९॥
नामयाचे प्रसंगें मज ॥ सेवा घडली तुमची आज ॥ ऐकोनि तुमचेंमनीं उमज ॥ जाहला नाहीं ते समयीं ॥५०॥
प्रसाद दिधल्या मंत्राक्षता त्या नामयाचे टाकिल्या माथां ॥ मज निरालंबासी अवलंबता ॥ निष्कामासी म्हणतां सकाम ॥५१॥
मी अकर्ता असें यथार्थ ॥ तुमचेन जाहलों कृतार्थ ॥ ऐकूनि माझा वचनार्थ ॥ अझून ओळख धराना ॥५२॥
निःसंदेह भोजन केलें तुम्हीं ॥ उरलें शेष स्वीकारिलें आम्हीं ॥ यासी प्रायश्चित्त शास्त्रधर्मीं ॥ विधियुक्त कवण मज सांगा ॥५३॥
माझा तंव निश्चय हाचि जाण ॥ या हरिदासाचे पदरजःकण ॥ आणि तुमचें चरणतीर्थ सेवून ॥ होय पुनीत सर्वदा ॥५४॥
याविरहित जें साधन ॥ व्रतें तपें आणि दान ॥ तीं वायांच दिसती मजकारण ॥ जगज्जीवन म्हणतसे ॥५५॥
तयासीच मी सत्य मानीं ॥ भक्त असोत अथवा ज्ञानी ॥ तयां न विसंबें निर्वाणीं ॥ जैसी तान्हया निजमाय ॥५६॥
कृपण न विसंबे धनासी ॥ कीं हरिणी जैसी पाडसासी ॥ कीं लांव पक्षिणी अंडजांसी ॥ मानस वेधोनि सर्वदा ॥५७॥
कीं मीन जैसा जळाप्रती ॥ न विसंबे अहोरातीं ॥ तेवीं निजभक्त माझे चित्तीं ॥ असती निश्चितीं द्विजवर हो ॥५८॥
ते भक्त माझें अंतरंग ॥ ज्ञानोक्ति लेऊनि सौभाग्य ॥ भक्ति आणि वैराग्य ॥ प्रेमरस अखंड सेविती ॥५९॥
संतसंग हा त्यांलागूनी ॥ अखंड अमृतसंजीवनी ॥ वज्रकवच अनुराग लेवोनी ॥ अखंड निर्भय असती ॥६०॥
धर्म अर्थ काम मोक्ष जाण ॥ दृष्टीसी नाणिती भक्तजन ॥ चारी मुक्ती त्यांजकारण ॥ तुच्छ मानसीं वाटती ॥६१॥
माझें नाम गाती आनंदें ॥ हींचि त्यांचीं अनुहत वाद्यें ॥ निजलक्षाचें ताट प्रसिद्ध ॥ आंत दीप उजळले ॥६२॥
इंद्रपदाचे सौख्य जाण ॥ नाशिवंत भासे त्यांकारण ॥ जैसी अभ्रच्छाया देखोन ॥ सज्ञान शाश्वत न मानिती ॥६३॥
देखोनियां राजमंदिर ॥ सुरवाड न घेती वस्तिकर ॥ कीं मृगजळाचा देखोनि पूर ॥ सज्ञान मिथ्या मानिती ॥६४॥
यापरी होऊन उदास ॥ न धरिती अमरपदींची आस ॥ म्हणोनि अखंड माझा वास ॥ हृदयीं असे तयांचे ॥६५॥
ऐसे भक्त धुंडितां आम्हां ॥ एक शिंपी दिसतो नामा ॥ जेणें अंतरीं माझा प्रेमा ॥ अनुभवून ठेविला ॥६६॥
म्हणूनि त्याचें उच्छिष्ट जाण ॥ सेविलें निजप्रीतींकरून ॥ ब्रह्मरसाची उपमा गौण ॥ दिसोनि येतसे तयासी ॥६७॥
आणि मुक्तिक्षेत्र पंढरपूर ॥ सकळ तीर्थांचें भांडार ॥ उपमेसी पाहतां पृथ्वीवर ॥ आणिक न दिसे सर्वथा ॥६८॥
जीवन्मुक्त आणि ज्ञानी ॥ जो भक्तांमाजी अग्रगणी ॥ तो हा पुंडलीक मुनी ॥ बैसला ध्यानीं पर लक्षी ॥६९॥
आणि हे भीमा दक्षिणवाहिनी ॥ कीं हे अमृतसंजीवनी ॥ कीं सौख्यराशीची स्वामिनी ॥ स्वानंदजीवनीं विलसती ॥७०॥
हे चंद्रभागा पाहतां दुरून ॥ गर्भवासासी नलगे येणें जाण ॥ मंदाकिनी देखोन ॥ राहिली लाजून तैसीच ॥७१॥
भय पावूनि मानसीं ॥ भागीरथी मिळाली समुद्रासी ॥ आणि भोगावती पाताळासी ॥ अतिवेगेंसीं पैं गेली ॥७२॥
ऐशा क्षेत्रीं माझे दास ॥ वस्तीस राहूनि रात्रंदिवस ॥ अखंड करिती नामघोष ॥ प्रेमउल्हासेंकरूनियां ॥७३॥
हर्षें निर्भर होऊनि मनीं ॥ नामा नाचे हरिकीर्तनीं ॥ हें सौख्य धुंडितां त्रिभुवनीं ॥ कोठें न दिसे तयासी ॥७४॥
द्विजांसी म्हणे पुरुषोत्तम ॥ सकाम अथवा निष्काम ॥ वाचे वदे जो माझें नाम ॥ तो सखा परम आप्त माझा ॥७५॥
जीवाहूनि मज आवडता ॥ तयासी न करीं मी परता ॥ तोचि माझी कुळदेवता ॥ पूजीं सद्भावें तयासी ॥७६॥
मी सच्चिदानंद वनमाळी ॥ ओळंगें हरिदासांचे कुळीं ॥ हे जगीं प्रसिद्ध बिरुदावळी ॥ निजभक्तमेळीं वसतसे ॥७७॥
मज निजभक्तांचें बहु वेडें ॥ त्यांचें अवचित उच्छिष्ट पडे ॥ उभा राहूनि मी तयांपुढें ॥ मुखांत घालीं निजप्रीतीं ॥७८॥
तें मज वाटे अति गोमटें ॥ सेवितां स्वादिष्ट गोड वाटे ॥ उच्छिष्टयोगें मोटेंधाटें ॥ शरीर माझें अखंड ॥७९॥
माझी सोज्ज्वळ बाळकांती ॥ अखंड यश आणि संपत्ती ॥ पुष्टि तुष्टि सदा असती ॥ उच्छिष्टासाठीं भक्तांच्या ॥८०॥
ते संत सोयरे भेटती जाण ॥ तैं माझी दिवाळी सुख सण ॥ जैसें चकोरां होतां चंद्रदर्शन ॥ प्रेमानंदें उल्हासती ॥८१॥
म्हणोनि बहुत आर्तचित्तें ॥ नामयासी जेवविलें सांगतें ॥ हें अन्यथा नव्हेचि यथार्थें ॥ पुषती विचार कोणता ॥८२॥
ऐसें बोलतां रुक्मिणीवर ॥ ब्राह्मण देती प्रत्युत्तर ॥ म्हणती तूं गुणसमुद्र ॥ कळलें साचार आम्हांसी ॥८३॥
तरी वेदीं जे जे बोलिले धर्म ॥ तें तें आचरावें विहित कर्म ॥ ज्याचा जैसा वर्णाश्रम ॥ तोचि तेणें आचरावा ॥८४॥
तरी आचार जाणिजे प्रथम ॥ हाचि ब्राह्मणाचा स्वधर्म ॥ शौच आणि नित्यनेम ॥ सत्यवचन बोलावें ॥८५॥
तप तेंचि शम दम जाण ॥ भूतदया असावी पूर्ण ॥ आणि स्वस्वरूपीं अनुसंधान ॥ अखंडाकार असावें ॥८६॥
स्नान संध्या देवतार्चन ॥ अग्निहोत्रीं होमदान ॥ यावरी करावें अध्ययन ॥ संतुष्टमनेंकरूनियां ॥८७॥
वैश्वदेव आणि अतिथिपूजा ॥ नैवेद्य ब्रह्मयज्ञ करावा ॥ ओजा ॥ तेणेंकरूनि अधोक्षजा ॥ संतोषवावें मानसीं ॥८८॥
ऐशा रीतीं सारूनि नेम ॥ यावरी करावें भोजन ॥ तृतीयप्रहरीं पुराणश्रवण ॥ संतुष्टमनें करावें ॥८९॥
स्वानंदभरित होऊनि मनीं ॥ विश्वास असावा वेदवचनीं ॥ तुम्ही तों सर्वज्ञानसंपन्न गुणी ॥ विचारा मनीं निजहित ॥९०॥
आपुला स्वधर्म टाकिला जर ॥ तरी कैशा रीतीं तरतील नर ॥ जळचरांनीं त्यागितां नीर ॥ तरी जीवनोपाय कोणता ॥९१॥
बाळक न घे मातेचे स्तन ॥ तरी यासी उपाय नाहीं आन ॥ पक्षियें अंतराळ सांडितां जाण ॥ तरी कोठें गमन करावें ॥९२॥
कमळिणी भास्करा न पाहती ॥ तरी कैशापरी विकासती ॥ जरी भ्रमर आमोद न सेविती ॥ तरी सुखी होती कैसेनि ॥९३॥
सांडोनि शर्करेची राशी ॥ कैसी सौख्य पावेल माशी ॥ तेवीं स्वकर्म सांडितां ब्राह्मणांसी ॥ अपाय दिसतो पुढारा ॥९४॥
तरी आतां सांडोनि अभिमान अनुतापें शुद्ध करावें मन ॥ उभयलोकीं कीर्ति वाढे जाण ॥ तैसें आचरण करावें ॥९५॥
चंद्रभागेसी जाऊन ॥ मंत्रोक्तविधीं करावें स्नान ॥ ब्राह्मणांसी देऊनि सुवर्णदान ॥ पुण्याहवाचन करावें ॥९६॥
ऐकें गा चतुरविचक्षणा ॥ करावी क्षेत्रप्रदक्षिणा ॥ सकल कुल पवित्र जाणा ॥ तेणें तुमचें होईल ॥९७॥
उच्छिष्ट भक्षिलें नामयाचें ॥ येणेंचि दोष हरतील तुमचे ॥ वचन ऐकोनि द्विजवरांचें ॥ अवश्य्म्हणे जगदात्मा ॥९८॥
ब्राह्मणांसी म्हणे हृषीकेशी ॥ तुमची आज्ञा प्रमाण मजसी ॥ परी एक मागणें तुम्हांपासीं ॥ काया वाचा म्हणतसें ॥९९॥
द्विजांसी म्हणे घननीळ ॥ नामयाचा करावा सांभाळ ॥ याजऐसा भक्त प्रेमळ ॥ धुंडितां मज दिसेना ॥१००॥
तुम्ही सदाचारी ब्रह्मवादी ॥ तीर्थरूप तुमची वाड्नदी ॥ सत्य वचन जळामधीं ॥ सुम्नात जाहलों स्वामिया ॥१॥
मी आदि अजित अधोक्षज ॥ परी विश्वास आहे तुमचा मज ॥ तुम्ही माझें अप्रमपूज्य ॥ परमदैवत असा कीं ॥२॥
तुम्ही म्हणतां करा स्नान ॥ तरी त्याचें चतुर्विध लक्षण ॥ तेंचि विशद तुम्हांलागून ॥ यथायुक्त सांगतसें ॥३॥
पुराण आणि हरिकीर्तन ॥ आवडीं करावें श्रवण मनन ॥ सर्वांहून उत्तम स्नान ॥ यासीच जाण बोलिजे ॥४॥
अनुभव आणि निदिध्यासन ॥ मग आत्मसाक्षात्कार जाण ॥ याहीवरिष्ठ कोणी स्नान ॥ बोलिलें नाहीं सर्वथा ॥५॥
आतां अंतर्बाह्य शुचिर्भूत ॥ हें दुजें स्नान म्हणिजे यांत ॥ दैवयोगें ज्यासी साधत ॥ आणिक साधन नलगे त्या ॥६॥
समस्त इंद्रियें करूनि स्वाधीन ॥ करावें वासनेचें दंडन ॥ हें तिजें जया घडे स्नान ॥ मग कासया अनुष्ठान पाहिजे ॥७॥
सर्वां भूतीं करुणा जाण ॥ हें सेवां वरिष्ठ चवथें स्नान ॥ सहस्रांत एक सज्जन ॥ विरळा कोणी साधीतसे ॥८॥
पांचवें स्नान पुसाल कवण ॥ तरी उदकेंकरूनि करावें स्नान ॥ हे लौकिकार्थ अंघोळ जाण ॥ याजकारणें बोलिजे ॥९॥
काम क्रोध आणि लोभ ॥ भेद मोह आणि दंभ ॥ वसती देहीं स्वयंभ ॥ हे जलस्नानें न जाती ॥११०॥
तरी विवेक वैराग्यबुद्धी ॥ यांसीच निवटिजे आधीं ॥ संतसंगें चित्तशुद्धी ॥ साधकजनीं करावी ॥११॥
अनंतजन्मांचें निश्चित ॥ यासीच म्हणिजे प्रायश्चित्त ॥ ज्याचे वाचेसी नेम नित्य ॥ राम कृष्ण गोविंद ॥१२॥
परी तुमची भावना जैसी ॥ तैसीच कळेल तुम्हांसी ॥ नामा आमुच्या चित्तासी ॥ निष्कलंक दिसताहे ॥१३॥
ऐसें म्हणूनि पहाहो ॥ ब्राह्मणांसी प्रार्थीं देवरावो ॥ म्हणे वासनेचा संदेहो ॥ फेडा तुम्ही सकलिक ॥१४॥
चंद्रभागेसी जाऊनि त्वरित ॥ तुम्ही आम्ही वैष्णवभक्त ॥ कैसें द्याल प्रायश्चित्त ॥ तें मी घेईन सर्वथा ॥१५॥
लीलानाटकी रुक्मिणीरमण ॥ जो निजभक्तांचें प्रियभूषण ॥ लीलावोडंबरीं खेळ खेळोन ॥ दावी कौतुक दासांसी ॥१६॥
मग नामयाचा हात वनमाळी ॥ धरूनियां हृदयकमळीं ॥ समारंभें ते वेळीं ॥ सत्वर चालिले चंद्रभागे ॥१७॥
नरनारी येऊनियां देख ॥ पाहात असती कौतुक ॥ इंद्र आणि ब्रह्मादिक ॥ ठाकले उभे तेधवां ॥१८॥
संतमेळी शारंगधर ॥ पुढे चालिले सत्वर ॥ त्यांचे पाठीसीं द्विजवर ॥ चालताती लगबगां ॥१९॥
ऐशा रीतीं वैकुंठनाथ ॥ चंद्रभागेसी ॥ आले त्वरित ॥ केला पुंडलीकासी प्रणिपात ॥ वैष्णव गर्जती नामघोषें ॥१२०॥
मग द्विजवरांसी करूनि प्रदक्षिणा ॥ विधियुक्त आरंभिलें स्नाना ॥ जो मृडानीवरच्या न ये ध्याना ॥ तो तिलदर्भसुमना लावीतसे ॥२१॥
गोमय भस्म लाविलें जाण ॥ मंत्र वेदोक्त म्हणती ब्राह्मण ॥ पीतांबरधारी जगज्जीवन ॥ दावी कौतुक दसांसी ॥२२॥
पृष्ठीवरी सोडिले कुरळ ॥ कमलनेत्र अति विशाळ ॥ जो रुक्मिणीवल्लभ भक्तवत्सल ॥ दावी कौतुक दासांसी ॥२३॥
नानापरींचें अनुष्ठान ॥ जयालागीं करिती योगसाधन ॥ तो क्षीराब्धिवासी जगज्जीवन ॥ प्रायश्चित्त घेत निजप्रीतीं ॥२४॥
नाममात्रें जो निरसी दोष ॥ करी भक्तांचा भवनाश ॥ तो पुंडलीकवरद जगदीश ॥ प्रायश्चित्त घेत निजप्रीतीं ॥२५॥
श्रुतिशास्त्रें धुंडितां जाण ॥ ज्याचें न कळेचि महिमान ॥ निष्कलंकासी ब्राह्मण ॥ प्रायश्चित्त देताती ॥२६॥
ज्याचे चरणांगुष्ठापासून ॥ पवित्र गंगा निघाली जाण ॥ त्यासी उदकांत उभें करून ॥ प्रायश्चित देताती ॥२७॥
जो अचळ अढळ अविनाश पूर्ण ॥ विश्व व्यापक चैतन्यघन ॥ त्यासी गोमय भस्म लावून ॥ प्रायश्चित देताती ॥२८॥
जो वैकुंठविहारी हृषीकेश ॥ निजभक्तभूषण जगदीश ॥ त्यावरी आणोनि नसताचि दोष ॥ प्रायश्चित्त देताती ॥२९॥
मग प्रयोगें करूनि स्नान ॥ पीतांबर केला परिधान ॥ ब्राह्मणांचें तीर्थ घेऊन ॥ मस्तकीं वंदिलें निजप्रीतीं ॥१३०॥
निजभक्तांसी अभिवंदन ॥ करी निजांगें जगज्जीवन ॥ मग करूनि संध्यास्नान ॥ नित्यनेम सारिला ॥३१॥
ब्राह्मणांची पूजा करून ॥ यथाविधि दिधलें दान ॥ द्विजांसी म्हणे जगज्जीवन ॥ केलें सनाथ मजलागीं ॥३२॥
तुमचें आवडीचें आर्त ॥ तें म्यां पुरविलें त्वरित ॥ आतां विकल्प संशय मनांत ॥ आणूं नका सर्वथा ॥३३॥
तुमचें साधने सर्व काज ॥ आतां अगत्यरूप माना मज ॥ ऐसें बोलूनि गरुडध्वज ॥ काय करी ते समयीं ॥३४॥
द्विजांसी निरोप देऊनि त्वरित ॥ आपण आले राउळांत ॥ सवें असती समस्त भक्त ॥ आनंदें गर्जती नामघोषें ॥३५॥
मग सत्यभामा राधा रुक्मिणी ॥ विस्तारूनि आणिती विविध बोणीं ॥ भक्तमंडळींत चक्रपाणी ॥ बैसले भोजनीं निजप्रीतीं ॥३६॥
जेवीं तारागण सभोवतीं ॥ मध्यें शोभतो निशापती ॥ तेवीं वैष्णवमेळीं स्वानंदयुक्ती ॥ रुक्मिणीपती बैसले ॥३७॥
सकळांमुखीं जगज्जीवन ॥ ग्रास घाली प्रीतीकरून ॥ उच्छिष्ट पीतांबरेंकरून ॥ सांवरीतसे निजप्रीतीं ॥३८॥
भोजन करूनि निजप्रीती ॥ विडे दिधले भक्तांप्रती ॥ मग सुखशेजे रुक्मिणीपती ॥ निजपर्यंकीं पहुडले ॥३९॥
आज्ञा मागोनि देवासी ॥ वैष्णव गेले आश्रमासी ॥ भजन करिती निजमानसीं ॥ प्रेमयुक्त आल्हादें ॥१४०॥
तों ब्राह्मवीणा घेऊनि करीं ॥ नारद पातले झडकरी ॥ गायन करीत सुस्वरीं ॥ मधुरोत्तरीं रसाळ ॥४१॥
जें निर्मळ आणि नाम मंगळ ॥ उल्हासें गात भक्त प्रेमळ ॥ सन्निध येऊनि उतावेळ ॥ पांडुरंग नमियेला ॥४२॥
जो वैराग्याचा निजपुतळा ॥ कीं प्रेमसुखाची निजकळा ॥ तो नारद अकस्मात देखिला ॥ रुक्मिणीकांतें तेधवां ॥४३॥
क्षेमालिंगन देऊन प्रीतीं ॥ ब्रह्मसुतासी म्हणे श्रीपती ॥ तुझें गायन मजप्रती ॥ अनुपम्य वाटतसे॥४४॥
वचन ऐकूनि त्वरित ॥ नारद जाहले सद्गदित ॥ नेत्रीं पडतीं अश्रुपात ॥ आल्हादें गात गुणनाम ॥४५॥
जय पुंडलीकवरदा अनाथनाथा ॥ भीमातीरवासिया रुक्मिणीकांता ॥ करुणासागरा स्वानंदभरिता ॥ रक्षिसेसे भक्तां निजांगें ॥४६॥
जय कमललोचना श्रीरंगा ॥ भक्तभूषणा अक्षय अभंगा ॥ विश्वोद्धारका पांडुरंगा ॥ असंगसंगा निर्विकारा ॥४७॥
जय क्षीरसागरविलासिया ॥ विधिजनका वैकुंठराया ॥ निजभक्तांची वारिसी माया ॥ नाममात्रेंकरूनियां ॥४८॥
जय जय करुणासागरा जगजेठी ॥ उभा राहिलासी भीमातटीं ॥ भाविक भक्त येतां भेटी ॥ कृपादृष्टीं पाळिसी त्या ॥४९॥
यापरी नारदें करोन स्तवन ॥ मग ओंवाळिला रुक्मिणीरमण ॥ विसर्जन करूनि कीर्तन ॥ घातलें दंडवत साष्टांगें ॥१५०॥
चंपकतुलसींची मिश्रित माळा ॥ देवें घातली नारदाचिया गळां ॥ देवासी पूजोनि ते वेळां ॥ ब्रह्मसुत निघाले तेथूनि ॥५१॥
इकडे राधा येऊनि रखुमाईजवळी ॥ निजगुज पुसे ते वेळीं ॥ म्हणे माझे हृदयकमळीं ॥ नवल अद्भुत वाटतें ॥५२॥
आजि काय अपवाद वायां ॥ आला होता भक्तसखया ॥ म्हणोनि प्रायश्चित्त घेऊनियां ॥ केली आपण या देहशुद्धि ॥५३॥
हे आशंका माझे चित्तीं ॥ म्हणोनि पुसतसें तुम्हांप्रती ॥ कर्माकर्म अव्यक्तमूर्ती ॥ कैशापरी अडखळ ॥५४॥
सूर्य कोंडिला अंधारांत ॥ कीं थिल्लरीं बुडेल सरितानाथ ॥ कीं गंगा कोंडेल कूपांत ॥ ऐसें विपरीत जाहलें कीं ॥५५॥
चंद्रासी होईल उबारा ॥ नातरी पिंजर्‍यांत कोंडेल वारा ॥ कीं सागरासी देखोनि थरथरां ॥ अगस्ति केवीं कांपेल ॥५६॥
नक्षत्रतेजें वासरमणी ॥ कैसा जाईल लपोनी ॥ कीं सुधारस रागेंकरूनी ॥ मृत्यु कैसा पावेल ॥५७॥
घटांत सांठवेल आकाश ॥ कीं वज्रचि कांपेल पर्वतास ॥ तरी कर्मबंधनें हृषीकेश ॥ कोंडेल मजला वाटतें ॥५८॥
कां बीज पेरिलें भर्जित ॥ तें वाढेल टवटवीत ॥ तरी आपुला प्राणनाथ ॥ कर्मबंधीं गुंतेल ॥५९॥
हें मज बाई सांगा सकळ ॥ कोणें चाळविला घननीळ ॥ तुम्ही सर्वज्ञ आणि वडील ॥ सांगा अज्ञानाकारणें ॥१६०॥
रुक्मिणी म्हणे वो आरज ॥ नामयासाठीं गरुडध्वज ॥ सांडोनि थोरपणाची लाज ॥ कर्म सहज अंगीकारी ॥६१॥
ऐके नेणते सुजाणी ॥ हा अनाथनाथ चक्रपाणी ॥ भुललासे भक्तीलागूनी ॥ ते याजवांचूनि असेना ॥६२॥
म्हणोनि सच्चिदानंद उभे ॥ भुलले नामयाचेनि लोभें ॥ कर्में शुभें आणि अशुभें ॥ अंगिकारिलीं आवडीं ॥६३॥
तरी आवडीचा सोस पाहें ॥ जनांत न करी कोण काये ॥ हा प्रसिद्ध अनुभव जनासी आहे ॥ तो तुज माये सांगेन ॥६४॥
अंधळे पांगळे अनर्गळ ॥ मुकें बोबडें असेल बाळ ॥ परी जननीस त्याची कळवळ ॥ येत तत्काळ निजलोभें ॥६५॥
निजप्रीतीनें होऊनि वेडें ॥ त्यासीच खेळवी लाडेंकोडें ॥ परी दुजयाचें बाळ चोखडें ॥ तें तिज न माने सर्वथा ॥६६॥
कांही विकृति न मानूनि मनीं ॥ म्हणे यासी दृष्टी लागेल झणीं ॥ इडा पीडा घेऊनि जननी ॥ वदन चुंबीत तयाचें ॥६७॥
तैसीच प्रीति धरूनि मनीं ॥ निजभक्त सांभाळी चक्रपाणी ॥ याति कुळ न विचारी मनीं ॥ प्रिय मानी जीवाहून ॥६८॥
मागील अनंत जन्मांचा ॥ काया मनें आणि वाचा ॥ ऋणानुबंध तेव्हांचा ॥ आहे साचा निजप्रीतीं ॥६९॥
त्यांची देवासी बहु प्रीती ॥ तूट नव्हेचि कल्पांतीं ॥ जिवलग नामा सांगाती ॥ मानिला प्रीतीं केशवें ॥१७०॥
ऐकोनि रुक्मिणीचें वचन ॥ राधेसी वाटलें समाधान ॥ मौनेंचि करूनियां नमन ॥ गेली आपुलें मंदिरा ॥७१॥
तों इकडे नारदमुनि सत्वरीं ॥ पातला सत्यभामेचें घरीं ॥ सन्मान करूनियां ते सुंदरी ॥ सुखासनीं बैसवीत ॥७२॥
तयासी पुसे श्रीकृष्णअंगना ॥ नवल वाटे माझिया मना ॥ थोरीव सांडूनि वैकुंठराणा ॥ कीर्तनरंगीं नाचत ॥७३॥
आणि मागें कवणिये जन्मींचें ॥ ऋण घेतलें नामयाचें ॥ म्हणोनि कोड नानापरींचें ॥ पुरवी त्याचें घनीळ ॥७४॥
आणी या पुंडलीकाचें प्रेमरंग ॥ उभें ठाकलें श्रीरंग ॥ लोटलीं अठ्ठावीस युगें सांग ॥ परी शीण न येचि ॥७५॥
उभें करूनि जगदुद्धारा ॥ कदा न पाहे पाठमोरा ॥ वचन न बोले निष्ठुरा ॥ विश्वोद्धारा कष्टविलें ॥७६॥
ऐसें असतां शारंगधर ॥ उभेचि राहिले विटेवर ॥ आणि राखी बळीचें द्वार ॥ अंतरीं विचार न करितां ॥७७॥
आवड देखोनि निजअंतरीं ॥ पांडव रक्षिले नानापरी ॥ भक्तकार्यासी मुरारी ॥ लाज अंतरीं न घरीच ॥७८॥
एकला एकटा हा माधव ॥ निजांगें करी थोर लाघव ॥ भक्तकार्यासी केशव ॥ वायांचि काया शिणवीतसे ॥७९॥
ऐसे निजभक्त ये काळीं ॥ उदंड असतील भूमंडळी ॥ किती त्यांची नामावळी ॥ तुम्हांजवळी सांगूं मी ॥१८०॥
म्हणूनि चिंता थोर चित्तीं ॥ वाटतसे मजप्रती ॥ आमुचे स्वामीतें शिणविती ॥ निजभक्त प्रीति लावूनि ॥८१॥
ऐसें बोलतां सत्यभामेतें ॥ नारद म्हणे ऐक माते ॥ जें मी वचन सांगेन तूंतें ॥ तें यथार्थ चित्तें मानावें ॥८२॥
हा निराकार जगज्जीवन ॥ अवतार घ्यावया हेंचि कारण ॥ जे भक्त रक्षावे नाना यत्न करून ॥ म्हणोनि सगुण जाहला असे ॥८३॥
घ्यावया चराचराचे भार ॥ पृथ्वी जाहली असे साकार ॥ कीं प्रकाश पाडावया जनांवर ॥ भास्कर जैसा अवतरला ॥८४॥
नातरी करावया दहन पचन ॥ म्हणोनि अवतरला जठराग्न ॥ कीं गाईची करावया क्षुधा हरण ॥ निपजविले तृण तयासाठीं ॥८५॥
कीं अंडजयातींसी फिरावयासी ॥ आकाश करी हृषीकेशी ॥ कीं विश्रांति घ्यावया विश्वजनांशीं ॥ निसी निर्मिली साचार ॥८६॥
नातरी सुंदरांगीं ल्यावया भूषणें ॥ म्हणूनि निपजविलीं दिव्यरत्नें ॥ कीं आयुष्यहीनाचे वांचवावया प्राण ॥ म्हणोनि सुधारस निर्मिला ॥८७॥
तेवीं निजभक्तांचे करावया काज ॥ सगुण जाहला अधोक्षज ॥ सोडोनियां थोरपणाची लाज ॥ लीला सहज दावीतसे ॥८८॥
हा अनाथनाथ भक्तवत्सल ॥ कृपासिंधु दीनदयाळ ॥ ब्रीद वागवितो घननीळ ॥ तूं जाणसी सकळ सुजाणे ॥८९॥
तया अंबऋषीचे गर्भवास ॥ निजांगें सोशी हृषीकेश ॥ बळीचें द्वार राखी उदास ॥ लज्जा मनांत न धरितां ॥१९०॥
विकिला पायिक होऊन साचा ॥ काया मनें आणि वाचा ॥ सांभाळ करी पांडवांचा ॥ पति तुमचा कृपाळु ॥९१॥
होऊनि नंदाचा नंदन ॥ गोकुळीं रक्षितसे गोधन ॥ आणि गोपाळांचें उच्छिष्ट घेऊन ॥ पाहात चाखूनि निजप्रीतीं ॥९२॥
विघ्न देखोनि कडोविकडी ॥ आपण निजांगें घाली उडी ॥ निजभक्तांचें बंधन तोडी ॥ कीर्ति चोखडी हे त्याची ॥९३॥
आम्ही सकळ भक्त जाण ॥ त्याचेच अंश असों पूर्ण ॥ परी आजि साक्षात् रूप सगुण ॥ नामयासाठीं अवतरला ॥९४॥
यापरी भामेसी समजाऊनी ॥ सत्वर गेला नारदमुनी ॥ तों मंचकापासीं येऊन रुक्मिणी ॥ चक्रपाणि वंदिला ॥९५॥
सद्भावें चरणीं ठेऊनि माथा ॥ काय पुसतसे पंढरीनाथा ॥ सर्वांपरीस तुमच्या चित्ता ॥ काय आवडतें मज सांगा ॥९६॥
भक्तवत्सला वैकुंठनायका ॥ हे माझे जीवींची फेडा आशंका ॥ अष्टांगयोग साधिती देखा ॥ नससी निका ते ठायीं ॥९७॥
योगी बैसले समाधिस्थ ॥ तेथें न रंजें तुमचें चित्त ॥ वैकुंठभुवनीं नाहीं प्रीत ॥ कळलें निश्चित मजलागीं ॥९८॥
तेथींचें सुख भोगविलास ॥ नावडती तुमचें चित्तास ॥ चित्त अखंड उदास ॥ कवण्या गुणें मज सांगा ॥९९॥
सायुज्यता मुक्ति देऊनी ॥ योगी बुडविले निर्गुणीं ॥ याहूनि सखे तुमचे कोणी ॥ मजलागूनि कळेना ॥२००॥
पोटींचा पुत्र चरुरानन ॥ स्तवितो तुम्हांसी चतुरपणें ॥ चारी वेद अठरा पुराणें ॥ तुमचे सद्गुण वर्णिती ॥१॥
परी ते उबगोनि चित्तीं ॥ शब्द बोलती नेतिनेति ॥ षट्दर्शनें वाद घालिती ॥ परी अनुपम्य ख्याति न कळे त्यां ॥२॥
ऐसें ऐकोनि रुक्मिणीसी ॥ काय बोलती हृषीकेशी ॥ माझे जीवींचें तूं नेणसी ॥ सुजाण म्हणविसी आपणिया ॥३॥
परी काया वाचा मनें निश्चित ॥ तुज सांगतों जीवींची मात ॥ नामयावरी माझी प्रीत ॥ असे निश्चित सर्वदा ॥४॥
आणि जीवींची खूण आज ॥ मी सांगतों तेंचि तुज ॥ जे का भाविक भक्तराज ॥ तेचि मज आवडती ॥५॥
मी निराकार निर्गुण ॥ नामरूपासी आलों जाण ॥ निजभक्तांचें करावया कारण ॥ साकार सगुण जाहलों कीं ॥६॥
निजभक्त आवडाती माझिया जीवा ॥ भक्त ज्ञानियांचा विसांवा ॥ भक्त माझे सुखाचा ठेवा ॥ असों दे ठावा तुजलागीं ॥७॥
माझिया भाग्याचें भूषण ॥ निजभक्त असती सुजाण ॥ भक्तचि माझें गुणनिधान ॥ सर्वदा आधीन मी त्यांचे ॥८॥
भक्तचि माझी यश कीर्ति ॥ भक्तचि माझे सुखमूर्ती ॥ भक्त भेटतां सकळ पुरती ॥ मनकामना माझिया ॥९॥
मज आणि भक्तां वेगळिक ॥ कल्पांतींही नव्हे देख ॥ माझे भजनींचें निजसुख ॥ भक्तचि एक जाणती ॥२१०॥
मी भक्तांचें नाम घ्यावें ॥ तयांचें रूप मनीं ध्यावे॥ भक्तसुख दृष्टीं पाहावें ॥ वेळोवेळां निजप्रीतीं ॥११॥
भक्तीं माझे चिंतावे चरण ॥ त्यांणीं माझेच गावे गुण ॥ निष्कामबुद्धि माझें भजन ॥ तेचि करिती सर्वदा ॥१२॥
धर्म अर्थ काम मुक्ति चारी ॥ देतां भक्त न घेती करीं ॥ संसार ओझें मजवरी ॥ भक्त न घालिती सर्वथा ॥१३॥
मी भक्तांचें अंतर ॥ भक्त सोयरे माझे निर्धार ॥ मजहूनि भक्त उदार ॥ दिसती चौसार मज दृष्टीं ॥१४॥
म्हणोनि नामयाचें आर्त जीवा ॥ हेंचि आवडे मज केशवा ॥ आणिक हेवा नसेचि ॥१५॥
ऐसें बोलतां रुक्मिणीवर ॥ तंव उदयासी आला दिनकर ॥ पुढें वर्तलें तें भक्त चतुर ॥ परिसा सादर निजकर्णी ॥१६॥
हा भक्तिरस निरूपम ॥ चतुर्दशाध्यायीं केलें कथन ॥ जेवीं एकादशस्कंधीं श्रीकृष्ण ॥ उद्धवासी सांगे भागवतीं ॥१७॥
त्या ग्रंथीं एकुणतिसावा अध्याय सुरस ॥ निखिल ओतिला ब्रह्मरस ॥ तेवीं भक्तविजयीं विशेष ॥ चतुर्दश अध्यायीं बोलिला ॥१८॥
म्हणाल प्राकृत तुझीं उत्तरें ॥ आणि उपमा देस्सी गीतेचीं थोरें ॥ तरी तैसें नव्हे जी साचारें ॥ परिसा विचार निजकर्णीं ॥१९॥
तीर्थावळीमाजी साचार ॥ स्वमुखें बोलिला श्रीज्ञानेश्वर । त्या वचनांचा धरूनि आधार ॥ म्यांही तैसेंचि निरूपिलें ॥२२०॥
आणि प्राकृत संस्कृत वाणी ॥ अर्थ पाहतां सारिखा जनीं ॥ जेवीं गौतमी गाय नामें दोनी ॥ दुग्ध - एकचि जाणावें ॥२१॥
कीं पोयोब्धि सागर दोनी म्हणतां ॥ परी उदकासी नाहीं भिन्नता ॥ म्हणोनि सामान्य प्राकृत ग्रंथा ॥ पंडितीं सहसा न म्हणावें ॥२२॥
पुढील अध्यायीं सुरस वाणी ॥ ग्रंथ वदवील चक्रपाणी ॥ महीपति तयाचा अभयदानी ॥ निर्भय मनीं सर्वदा ॥२३॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ चतुर्दशाध्याय रसाळ हा ॥१२४॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥    ॥॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥    ॥ शुभं भवतु ॥    ॥ श्रीरस्तु ॥
भक्तविजय चतुर्दशाध्याय समाप्त