1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

अफगाणी संसदेवर दहशतवादी हल्ला!

PR
रविवारी दुपारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यांनी काबूल हादरले. अफगाणिस्तानची नॅशनल असेंब्ली, अमेरिका, रशिया व ब्रिटनचा दूतावास यासह सात ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले. "नाटो'ला मदत करणाऱ्या देशांचे दूतावास प्रामुख्याने या हल्ल्यांचे लक्ष्य होते. "नाटो'च्या येथील मुख्यालयावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 12 ठिकाणी हे हल्ले करण्यात आले. यात अनेक जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. आज सकाळीही दहशतवाद्यांचा हल्ला सुरुच होता. मात्र, काही तासांतच त्यांचा बिमोड करण्यात यश आल्याचे, सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

तालिबानची अफगाणिस्तानातील सत्ता उलथवून टाकल्यानंतर 2001 पासूनचा हा सर्वांत मोठा हल्ला आहे. काबूल शहराबरोबरच तीन प्रांतांतही दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत. काबूलमध्ये किती दहशतवादी शिरले आहेत याची माहिती उपलब्ध झालेली नाही.

अमेरिका आणि ब्रिटिश दूतावासाच्या चारही बाजूंनी हल्ला करण्यात आला. ब्रिटिश नागरिक राहत असलेल्या काही घरांवर रॉकेटच्या साह्यानेही हल्ला करण्यात आला. काबूलच्या मध्यवर्ती भागात सगळीकडे स्फोटामुळे धुराचे लोट उठल्याचे चित्र दिसून येत होते. जर्मनीच्या दूतावासाजवळही रॉकेट टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. ब्रिटिश दूतावासाच्या परिसरातील टॉवरवर दोन रॉकेट आदळली. या हल्ल्यानंतर अमेरिकेने आपला येथील दूतावास बंद केला आहे. सुरक्षा दलाचे सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये सुमारे अठरा तास ही चकमक सुरु होती. अखेर सर्व दहशतवाद्यांना ठार मारण्यात सैनिकांना यश आले आहे.