गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (15:51 IST)

शार्क माशांच्या शरीरात कोकेन; नेमके काय असू शकते कारण?

ब्राझीलच्या किनाऱ्याजवळ आढळणाऱ्या शार्क माशांच्या शरीरात कोकेनचे अंश कसे सापडले याचा सध्या संशोधक तपास करतायत.
ओस्वाल्ड क्रूझ फाऊंडेशनच्या संशोधकांनी रिओ दी जेनेरोच्या किनारपट्टीजवळच्या 13 शार्कची तपासणी केली. त्यात त्यांना या शार्क्सचे स्नायू आणि यकृतात मोठ्या प्रमाणात कोकेन सापडलं.
पहिल्यांदाच अशाप्रकारे शार्क्सच्या शरीरात कोकेन सापडलंय आणि इतर सागरी जीवांमध्ये आढळलेल्या कोकेनपेक्षा हे प्रमाण 100 पटींनी अधिक आहे.
पण कोकेन याठिकाणी कसं आलं असावं याविषयी काही अंदाज मांडले जातायत.
ड्रग्स तयार करणाऱ्या बेकायदेशीर प्रयोगशाळा किंवा ड्रग्स घेणाऱ्यांची विष्ठा - लघवी याद्वारे कोकेनचे अंश समुद्राच्या पाण्यात मिसळले गेले असण्याची शक्यता काही तज्ज्ञ मांडत आहेत.
 
ओस्वाल्ड क्रूझ इन्स्टिट्यूटच्या पर्यावरणाच्या आरोग्याविषयी काम करणाऱ्या लॅबच्या बायोलॉजिस्ट आणि संशोधक रेचल डेव्हिस सांगतात, "आमच्या रिपोर्टमध्ये या दोन्ही शक्यता मांडण्यात आल्या आहेत. रिओ दी जानेरोमधील कोकेन सेवन करणाऱ्यांमुळे हे होणं आणि ड्रग्स तयार करणाऱ्या बेकायदेशीर लॅब्स."
ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांद्वारे समुद्रात फेकण्यात आलेला कोकेनचा साठा किंवा मग त्यांच्याकडून समुद्रात चुकून पडलेला माल यामुळेही समुद्राच्या पाण्यात कोकेन मिसळलं जाण्याची शक्यता आहे. पण असं होण्याचं प्रमाण फारच कमी असल्याचं संशोधकांना वाटतंय.
 
शार्कच्या शरीरात कोकेन कसं मिसळलं?
संशोधक रेचल यांच्या मते, "कोकेनची थप्पी समुद्रात नष्ट करण्यासाठी फेकून देण्याचं प्रमाण इथे फारसं नाही. मेक्सिको आणि फ्लोरिडात हे प्रकार जास्त होतात. म्हणूनच आमचा भर आधीच्या दोन शक्यतांवर आहे."
 
इतर सागरी जीवांपेक्षा शार्क्समधल्या कोकेनचं प्रमाण 100 पटींनी जास्त असल्याचं संशोधकांनी म्हटलंय.
 
हा शोध अतिशय महत्त्वाचा आणि काळजी करण्यासारखा असल्याचं पोर्तुगालमधल्या लेरिया विद्यापीठातील एन्व्हार्यन्मेंट अँड मरीन सायन्सेस विभागाच्या मरीन इकोटॉक्सिकॉलॉजिस्ट सारा नोव्हिस यांनी सायन्स या जर्नलशी बोलताना सांगितलंय.
 
अभ्यास करण्यात आलेल्या या शार्क्सपैकी मादी शार्क्स या गरोदर होत्या पण त्यांच्या शरीरातलं कोकेन त्यांच्या पिलापर्यंत पोहोचलं होतं का? हे अद्याप स्पष्ट नाही.
 
या ड्रगमुळे शार्कच्या वागण्यावर काही परिणाम झाला का? त्यात काही बदल झाला का? हे ठरवण्यासाठी अधिक संशोधन करावं लागणार आहे.
 
पण यापूर्वी झालेल्या संशोधनांनुसार ड्रग्सचे जसे माणसांच्या वागण्यावर परिणाम होतात तसेच प्राण्यांवरही होत असल्याचं आढळलेलं आहे.
 
रेचल डेव्हिस सांगतात की, "सध्या संशोधकांनी फक्त एकाच प्रजातीच्या शार्क्सचा अभ्यास केलाय. पण या भागात आढळणाऱ्या इतर प्रजातीही कोकेन पॉझिटिव्ह असण्याची शक्यता आहे. शार्क्स Carnivorous म्हणजे मांसाहारी आहेत. म्हणूनच त्यांच्या अन्नाद्वारे त्यांच्या शरीरात अनेक रासायनिक प्रदूषकं जाण्याची शक्यता अधिक असते. इथे शार्क्स ज्यांची शिकार करतात ते - crustaceans - क्रस्टेशन्स ( पाण्यात राहणारे आणि टणक कवच असणारे जीव) आणि मासे प्रदूषित असण्याची शक्यताही मोठी आहे."
कोकीन ट्रांझिटचा रूट
ब्राझीलमध्ये कोकेन मोठ्या प्रमाणात आढळतं. हा देश मोक्याच्या जागी असल्याने तस्कर या देशामार्गे कोकेन प्रामुख्याने युरोप आणि आफ्रिकेतल्या मार्केट्सना पुरवत असल्याचं ब्राझीलच्या साओ पाउलो विद्यापीठातील समाजशास्त्राच्या संशोधक कमिला न्यून्स डायस सांगतात. त्यामुळेच ब्राझील हे वितरणासाठीचं गुन्हेगांरासाठीचं केंद्र बनल्याचंही त्या म्हणतात.
 
त्या सांगतात, "भौगोलिक मुद्दा महत्त्वाचा आहे कारण ब्राझीलची पश्चिम सीमा ही ड्रग निर्मिती करणाऱ्या पेरू, कोलंबिया, बोलिव्हियासारख्या देशांना लागून आहे. आणि ब्राझीलमधल्या विविध बंदरांद्वारे अटलांटिक समुद्रात जाता येतं. म्हणूनच युरोप आणि आफ्रिकेत जाणारा बराच माल हा ब्राझीलमार्गे जातो. संपूर्ण खंडाकडे पाहिलं तर या देशाचं स्थान मोक्याचं आहे."
 
या भागात असणाऱ्या बेकायदेशीररित्या ड्रग्स तयार करणाऱ्या लॅबोरेटरीजमुळे प्राणी प्रदूषित झालं नसल्याचंही त्या म्हणतात.
कोकेन घेऊन जाणाऱ्या डायव्हर्समुळे समुद्राच्या पाण्यात कोकेन पसरलं असल्याचं संशोधकांना वाटतंय. "डायव्हर्सचा वापर करून कोकेन बोटींपर्यंत पोहोचवलं जात असल्याचं अनेकदा समोर आलंय. माझ्यामते हे पाण्यातल्या कोकेनमागचं कारण असू शकतं," असं सेंटर फॉर व्हायोलन्स स्टडीजमधील एक संशोधक सांगतात.
 
जगातल्या बहुतांश देशांमध्ये कोकेनवर बंदी असून त्याचं सेवन करणाऱ्या लोकांच्या शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचं सिद्ध झालंय. कोकेनच्या ओव्हरडोसमुळे काहींचे मृत्यूही झालेले आहेत.
 
माणसांवर काय परिणाम?
ब्राझीलमध्ये रस्ते आणि नदीमार्गांद्वारे कोकेन आणलं जातं आणि ते या देशातली विविध बंदरं आणि विमानतळांद्वारे युरोपात पाठवलं जातं. मेक्सिकन आणि कोलंबियन तस्करांकडून अमेरिकेत कोकेन पाठवलं जात असल्याचं न्यून्स डायस सांगतात.
 
"ब्राझीलमधली सगळी बंदरं यासाठीचा मार्ग आहेत. PCC (प्रायमेरो कमांडो द कॅपिटल) आणि कमांडो वेर्मेल्हो सारख्या प्रत्येक बंदराच्या वापरावर विविध गुन्हेगारी गटांचा अंकुश आहे," न्यून्स डायस सांगतात.
 
तैवानमधल्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली शार्क फिन्स पहायला मिळतात. मग शार्क मीट म्हणजे शार्कचं मांस खाणाऱ्यांच्या शरीरात या कोकेनचा शिरकाव होऊ शकतो का?
संशोधक रेचल डेव्हिस यांच्या मते हे होऊ शकतं. त्या म्हणतात, "ब्राझीलमध्ये डॉगफिश शार्कचं मांस सर्रास खाल्लं जातं. या मांसाद्वारे ड्रग मानवी शरीरात शिरू शकतं. कोकेनचा शिरकाव आता अन्नसाखळीत झालाय. आणि ब्राझील आणि अमेरिकेसह, युके, मेक्सिको आणि इतर अनेक देशात शार्कचं मांस खाल्लं जातं."
 
जगातल्या अनेक भागांमध्ये शार्क फिन सूप प्रसिद्ध आहे.
पण अशाप्रकारे मांसाद्वारे मानवी शरीरात आलेला अंमली पदार्थ माणसांसाठी धोकादायक ठरू शकतो का? हे अजून स्पष्ट नाही. अन्नसाखळीद्वारे माणसापर्यंत पोचणाऱ्या गोष्टींमधल्या धोक्यांबद्दल अजून सखोल संशोधन सुरू आहे.
समुद्राच्या पाण्यात जर कोकेन मिसळलं गेलं असेल तर त्याचा या पाण्यात पोहणाऱ्या माणसांना धोका आहे का? तर तसंही नाही.
 
कल्ले आणि खवल्ल्यांद्वारे शार्क आणि इतर माशांमध्ये पाण्यातल्या गोष्टी शोषून घेतल्या जातात. पण माणसांत तसं होत नसल्याने पाण्यात विरघळलेल्या कोकेनचा धोका माणसांना असण्याची शक्यता कमी आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन
Published By- Priya Dixit