गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (16:28 IST)

एंटेबेः इस्रायलनं अपहरण झालेल्या विमानातील 102 नागरिकांना 58 मिनिटांमध्ये कसं सोडवलं?

रेहान फजल
27 जून 1976 रोजी तेल अविवमधून पॅरिसला जाणारं एअर फ्रान्सचं विमान फ्लाईट 139 अथेन्सला थोड्य़ा काळासाठी थांबलं. पुढच्या प्रवासासाठी या विमानानं उड्डाण करताच 4 प्रवासी अचानक जागेवरुन उठले. त्यांच्या हातामध्ये पिस्तुलं आणि ग्रेनेड होते.
 
विमानावर नियंत्रण मिळवताच त्यांनी पायलटला लिबियातल्या बेन्गाझी शहराकडे जाण्याचा आदेश दिला. या चार अपहरण करणाऱ्यांमध्ये दोन पॅलेस्टिनी नागरिक आणि दोन जर्मन नागरिक होते.
 
त्या चौघांमधील एक महिला ब्रिजेत कुलमानने हँड ग्रेनेडची पिन काढली आणि कोणीही प्रतिकार केल्यास सगळं विमान उडवून देईन अशी धमकी दिल्याचं विमानातले एक प्रवासी जियान हारतुव सांगतात.
 
बेन्गाझीमध्ये सात तास थांबल्यावर आणि इंधन भरल्यावर अपहरण करणाऱ्यांनी युगांडाच्या एंटेबे विमानतळाकडे विमान नेण्याची सूचना पायलटला दिली.
त्यावेळेस युगांडाची सत्ता हुकुमशहा इदी अमिन यांच्याकडे होती. त्यांचा अपहरण करणाऱ्यांना पूर्ण पाठिंबा होता. अपहरण करणाऱ्या लोकांना एंटेबे विमानतळावर त्यांचे 4 सहकारी येऊन मिळाले.
त्यांनी ज्यू प्रवाशांना वेगळं केलं आणि जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये कारागृहात असणाऱ्या 54 पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करण्याची मागण केली. त्यांची मागणी मान्य न केल्यास एकेक प्रवाशाला मारायला सुरू करू अशी धमकीही दिली.
 
एंटेबे इस्रायलपासून सुमारे 4000 किमी दूर आहे. त्यामुळे प्रवाशांन वाचवण्यासाठी मोहीम आखण्याचा विचारही केला जाऊ शकत नव्हता. प्रवाशांच्या संबंधित लोकांनी तेल अविवमध्ये निदर्शनं सुरू केली होती.
 
ओलीस ठेवलेल्या लोकांमध्ये काही लोक इस्रायलचे पंतप्रधान राबिन यांच्या जवळचे होते. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना सोडवलं जावं असा त्यांच्यावर मोठा दबाव होता. त्यांनी या प्रवाशांना सोडवण्यासाठी एक धाडसी मोहीम आखली त्याला 'ऑपरेशन थंडरबोल्ट' असं म्हटलं जातं.
 
'ज्यू प्रवाशांना वेगळं केलं'
अपहृत प्रवाशांमधील सारा डेव्हिडसन सांगतात की अपहरण करणाऱ्यांनी सर्व प्रवाशांची दोन भागात विभागणी केली. "त्यांनी लोकांची नावं घेतली आणि त्यांना दुसऱ्या खोलीत जाण्यास सांगितलं. थोड्यावेळानं ते फक्त ज्यू लोकांची नावं घेत असल्याचं लक्षात आलं."
 
ज्यू नसलेल्या 47 प्रवाशांना सोडून देण्यात आलं. त्यांना एका खास विमानाने पॅरिसला नेण्यात आलं. तिथं मोसादच्या हेरांनी त्यांच्याशी बोलून एंटेबेची सखोल माहिती जाणून घेतली.
मोसादच्या एका एजंटनी केनियामध्ये एक विमान भाड्यानं घेतलं आणि एंटेबेवर जाऊन त्या विमानतळाची भरपूर छायाचित्रं घेतली. विशेष म्हणजे एंटेबे विमानतळाच्या ज्या टर्मिनलवर प्रवाशांना ओलीस ठेवलं होतं ते टर्मिनल इस्रायली कंपनीने बांधलं होतं.
 
त्या कंपनीकडून टर्मिनलचा नकाशा मिळवण्यात आला आणि कमांडोना हल्ल्याच्या अभ्यासासाठी तसंच एक मॉडेल तयार करण्यात आलं.
 
मोहिमेत सर्वोत्तम सैनिकांचा समावेश
या मोहिमेसाठी इस्रायली सैन्यातील 200 सर्वोत्तम सैनिकांना निवडण्यात आलं. कमांडो मिशनमध्ये अनेक अडथळ्यांची शक्यता होती. एंटेबे विमानतळाचे दिवे रात्री बंद केले तर? किंवा धावपट्टीवर इदी अमिनच्या सैनिकांनी ट्रक उभे करून ठेवले तर? अशा अनेक संभाव्य अडथळ्यांची शक्यता होती.
 
अपहरण करणाऱ्यांबरोबर आपण चर्चेला तयार आहोत असा इस्रायली सरकारने संकेत दिला आणि कमांडो मोहिमेच्या तयारीला थोडा वेळ मिळवला. इदी अमिनचे मित्र समजले जाणारे माजी सैन्याधिकारी बार लेव यांना बोलणी करण्यासाठी नेमण्यात आलं.
 
त्यांनी इदी अमिन यांच्याशी फोनवर अनेकदा बोलणी केली. मात्र प्रवाशांना सोडवण्यात यश आलं नाही. त्यातच इदी अमिन अफ्रिकेतील देशांच्या एका बैठकीत जाण्यासाठी मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईसला गेले. त्यामुळे इस्रायलला आणखी वेळ मिळाला.
 
त्यावेळेस जनरल अशोक मेहता भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. ते अमेरिकेतील पोर्ट लॅवनवर्थच्या कमांड अँड जनरल स्टाफ कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेत होते.
 
हवेतच विमानात भरलं इंधन
जनरल अशोक मेहता म्हणतात, 4000 किमी जाऊन पुन्हा 4000 किमी परत येणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. त्यामुळे हवेतच दुसऱ्या विमानातून या विमानात इंधन भरण्यात आलं.
ब्रिगेडियर जनरल डॅम शॉमरॉन यांच्याकडे पूर्ण मोहिमेची जबाबदारी देण्यात आली आणि लेफ्टनंट कर्नल योनाथन नेत्यानाहू यांना फिल्ड ऑपरेशनची सूत्र देण्यात आली.
 
इस्रायलकडे तीन पर्याय होते. पहिला म्हणजे हल्ल्यासाठी विमानांची मदत घेणे, दुसरा म्हणजे बोटींद्वारे तिथं पोहोचणं आणि तिसरा म्हणजे केनियातून रस्ता मार्गे युगांडामध्ये जाणं.
 
शेवटी एंटेबेमध्ये पोहोचण्यासाठी विमानाचा वापर करण्याचं ठरलं आणि इदी अमिन परदेशातून परतत आहेत असा आभास युगांडाच्या सैनिकांसमोर करायचं ठरलं.
 
4 जुलै रोजी इस्रायलच्या सिनाई तळावरुन चार हर्क्युलस विमानं हवेत झेपावली. इजिप्त, सुदान आणि सौदी अरेबियाच्या रडारवर येऊ नये म्हणून त्यांनी फक्त 30 मीटर उंचीवरुन उडत त्यांनी तांबडा समुद्र पार केला. वाटेत इस्रायली कमांडोंनी युगांड्या सैनिकांचा पोशाख घातला.
 
फक्त सहा मिनिटांचा वेळ
विमानांनी उड्डाण केल्यानंतरच पंतप्रधान राबिन यांनी या मोहिमेची माहिती मंत्रिमंडळाला दिली. सलग सात तास प्रवास केल्यावर रात्री एक वाजण्याच्या सुमारास पहिलं हर्क्युलस विमान एंटेबेच्यावर पोहोचलं.
त्यांच्याकडे विमान उतरवून अपहरणकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी सहा मिनिटांचा वेळ होता. त्यावेळेस धावपट्टीवरील दिवे सुरू होते. कमीत कमी वेळ वाया जावा म्हणून विमान उतरण्याच्या आठ मिनिटे आधीच हर्क्युलसचे रँप उघडण्यात आले.
 
विमान उतरताच पायलटने विमान धावपट्टीवर मध्यभागी थांबवलं आणि पॅराट्रुपरच्या एका तुकडीला उतरवलं. त्या तुकडीला नंतर येणाऱ्या विमानांसाठी इमर्जन्सी दिवे लावता येणार होते.
 
मर्सिडिज कारद्वारे चकवा
विमानातून एक काळी मर्सिडिज कार उतरवण्यात आली. ही कार राष्ट्रपती अमिन यांच्या कारशी मिळतीजुळती होती. तिच्यामागे कमांडो भरलेल्या दोन लँड रोव्हर गाड्या उतरवण्यात आल्या. ही वाहनं वेगाने टर्मिनलच्या दिशेने जाऊ लागली. टर्मिनलपर्यंत गेल्याशिवाय गोळ्या चालवायच्या नाहीत अशा सूचना कमांडोंना देण्यात आल्या होत्या.
इदी अमिन ओलीस ठेवलेल्या प्रवाशांना भेटायला आले आहेत असा युगांडाच्या सैनिकांचा समज होईल असं इस्रायली सैनिकांना वाटत होतं. पण इदी अमिन यांनी काहीच दिवसांपूर्वी पांढरी गाडी वापरायला सुरुवात केली होती हे इस्रायली सैनिकांना माहिती नव्हतं.
 
त्यामुळेच टर्मिनल बाहेर उभ्या असलेल्या युगांडाच्या सैनिकांनी रायफल्स सरसावल्या. तत्क्षणीच इस्रायली कमांडोंनी सायलेन्सर लावलेल्या बंदुकांनी त्यांना उडवलं.
 
गोळ्या झाडताच कमांडरने सर्वांना वाहनांमधून उतरून चालतच जिथं प्रवासी ठेवलेत त्या टर्मिनलवर हल्ला करण्यास सांगितलं. कमांडोंनी बुल हॉर्नचा वापर करून प्रवाशांना आम्ही इस्रायली सैनिक आहोत आणि आपल्याला वाचवायला आलो आहोत असं हिब्रू आणि इंग्रजीत सांगितलं. त्यांनी प्रवाशांना जमिनीवर पडून राहाण्स सांगितलं आणि हिब्रूमध्ये अपहरण करणारे लोक कोठे आहेत असं त्यांना विचारलं.
प्रवाशांनी मुख्य हॉलमध्ये उघडणाऱ्या दरवाजाकडे इशारा केला. कमांडो हँड ग्रेनेड फेकत त्या हॉलमध्ये घुसले. इस्रायली कमांडोना पाहताच अपहरण करणाऱ्यांनीही गोळ्या झाडायला सुरुवात केली. त्यात इस्रायलचा केवळ एक सैनिक मारला गेला.
 
या गोळीबारात अपहरण करणारे सर्व मेले. तीन प्रवाशांचाही मृत्यू झाला.
 
याच काळात इस्रायलची आणखी दोन विमानं उतरली, त्यातही सैनिक होते. चौथं विमान प्रवाशांना नेण्यासाठी होतं. ते पूर्ण रिकामंच एंटेबेमध्ये आणलं होतं.
 
एटंबेत उतरताच वीस मिनिटांमध्ये प्रवाशांना लँड रोव्हरमधून विमानात पोहोचवण्यात आलं. त्यावेळी युगांडाच्या सैनिकांनी गोळीबार सुरू करून पूर्ण विमानतळाचे दिवे घालवले.
या मोहिमेत इस्रायलचा केवळ एक सैनिक मारला गेला. ते म्हणजे लेफ्टनंट कर्नल नेत्यानाहू.
 
सैनिकांनी जखमी नेत्यानाहू यांना विमानात आणलं. एंटेबेवर उतरल्यानंतर 58 व्या मिनिटाला प्रवाशांना घेऊन ही विमानं परतण्यासाठी हवेत झेपावली. त्यापूर्वी त्यांनी एंटेबेवर असलेली 11 मिग जहाजं नष्ट केली जेणेकरुन ती त्यांचा पाठलाग करणार नाहीत.
 
प्रवासात असतानाच नेत्यानाहू यांनी प्राण सोडले. या मोहिमेत 7 अपहरणकर्ते आणि युगांडाचे 20 सैनिक मारले गेले. एक प्रवासी डोरा ब्लॉक यांना परत आणता आलं नाही कारण त्यांना कंपालाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
 
या मोहिमेनंतर डोरा ब्लॉक यांना इदी अमिन यांच्या आदेशानुसार दोन सैनिकांनी पलंगावरुन खाली ओढून ठार मारल्याची माहिती युगांडाच्या अॅटर्नी जनरलनी मानवाधिकार आयोगाला दिली.
 
इतिहासातली सर्वात धाडशी मोहीम
4 जुलै रोजी सकाळी अपहरणातून सोडवलेले 102 प्रवासी आणि इस्रायली कमांडो नैरोबीमार्गे तेल अविवला पोहोचले. यासर्व मोहिमेला इस्रायलच्या इतिहासातली सर्वात धाडशी मोहीम मानलं गेलं.
 
कमांडो दलाचे सदस्य लेफ्टनंट कर्नल मोर सांगतात, "जेव्हा आम्ही बेन गुरियान विमानतळावर उतरलो तेव्हा इस्रायली लोकांचा समूह एखाद्या समुद्रासारखा आमच्या सन्मानासाठी उपस्थित होता. दस्तुरखुद्द पंतप्रधान राबिन आणि त्यांचं मंत्रिमंडळ स्वागतासाठी आलं होतं."
 
जनरल अशोक मेहता सांगतात, जेव्हा पंतप्रधान राबिन यांनी विरोधी पक्षनेते मेनाखिम बेगिन यांना शुभेच्छा आणि आनंदाची बातमी देण्यासाठी बोलावलं.
तेव्हा बेगिन म्हणाले, "मी दारू पित नाही म्हणून मी चहा पिऊन हा आनंद साजरा करणार. राबिन यांनी त्यांना सिंगल माल्ट दारू दिली आणि रंगीत चहा समजून प्या असं सांगितलं. त्यावर बेगिन म्हणाले, मी आज काहीही पिऊ शकतो. इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दिवस होता. यासारखं वेडं धाडस करणारी मोहीम आधी कधीच सफल झाली नाही आणि पुढे क्वचितच असं होईल."