बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (22:42 IST)

पंजशिरमध्ये युद्धाचे ढग, तालिबानने वेढा दिल्याचा त्यांचा दावा

अफगाणिस्तानातलं पंजशीर खोरं आणि तालिबानमध्ये संघर्ष कायम आहे. नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तानचे (एनआरएफ) परराष्ट्र संबंध प्रमुख अली नाझरी यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांना शांततापूर्ण वाटाघाटी करायच्या आहेत. पण "जर हे अपयशी ठरलं तर आम्ही कोणत्याही प्रकारची आक्रमकता स्वीकारणार नाही," असा इशारा त्यांनी दिलाय.
 
दरम्यान, या गटाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पंजशीर खोऱ्याला वेढा घातल्याचा दावा तालिबानने केला आहे.
 
अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या ईशान्येकडील भागात तालिबान आता पुढे जात असल्याचंही प्रतिकार गटाने म्हटलं आहे.
 
तालिबानविरोधी एक प्रमुख नेते म्हणून ओळख असलेले आणि आधीच्या सरकारचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी तालिबानविरोधात लढणारे पंजशीर खोऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत असल्याचा दावा केला आहे.
 
1979 ते 1989 दरम्यान सोव्हिएत-अफगाण युद्धादरम्यान सोव्हिएत सैन्य आणि 1990 च्या दशकात तालिबानची आक्रमणं यशस्वीरित्या परतवण्यासाठी पंजशिर खोरं प्रसिद्ध आहे.
 
हा प्रदेश अजूनही एनआरएफच्या नियंत्रणाखाली आहे, ज्याची स्थापना अहमद मसूद यांनी केली होती. अहमद मसूद हे अहमद शाह मसूद यांचे पुत्र आहेत.
 
अहमद शाह मसूद हे एक शक्तिशाली कमांडर मानले जात होते ज्यांनी यूएसएसआरविरूद्ध प्रतिकाराचं नेतृत्व केले आणि त्यानंतर 90 च्या दशकात प्रतिस्पर्धी मिलिशियांविरूद्ध अफगाण सरकारच्या लष्करी शाखेचं नेतृत्व केलं.
 
तालिबानने ताबा मिळवल्यानंतरही 2001 मध्ये त्यांच्या हत्येपर्यंत ते तालिबान राजवटीविरुद्ध लढणारे मुख्य विरोधी कमांडर होते.
 
नाझरी यांनी बीबीसी रेडिओ 4 च्या आजच्या (23 ऑगस्ट) कार्यक्रमात सांगितलं की, "पंजशिरकडे गेल्या काही काळापासून देशभरातून स्थानिक प्रतिकार दलांचा ओघ होता. ते स्थानिक पातळीवर आधीच प्रशिक्षण घेतलेल्या लढाऊ सैनिकांमध्ये सामील झाले आहेत."
 
ते म्हणाले की, आमच्या गटाकडे "प्रतिकारासाठी हजारोंचं सैन्य तयार आहे." बीबीसीने या दाव्याची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही.
 
"आम्ही कोणत्याही प्रकारचं युद्ध आणि संघर्ष होण्यापूर्वी शांतता आणि वाटाघाटी करण्यासाठी प्राधान्य देतो," असंही त्यांच्या प्रवक्त्याने पुढे सांगितलं. देशात विकेंद्रित सरकार आणणे हे एनआरएफचं लक्ष्य आहे.
 
ते पुढे म्हणाले, "देशात कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अफगाणिस्तानातील मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यावं लागेल असा एनआरएफचा विश्वास आहे."
 
"अफगाणिस्तान हा वांशिक अल्पसंख्याकांनी बनलेला देश आहे, इथे कुणीही बहुमताने नाही. हे एक बहुसांस्कृतिक राज्य आहे, म्हणून त्याला सत्ता वाटपाची गरज आहे. सत्ता-सामायिक करारने द्यावी ज्यानुसार प्रत्येकजण स्वत:ला सत्तेचा भाग समजेल."
 
एकाच कोणत्याही गटाने राजकारणावर वर्चस्व गाजवल्यामुळे "अंतर्गत युद्ध आणि सध्याचा संघर्ष कायम राहील," असंही ते म्हणाले.
 
"आम्ही शांततेला प्राधान्य देतो, आम्ही शांतता आणि वाटाघाटींना प्राधान्य देतो," असंही नाझरी पुढे म्हणाले.
 
"जर हे अपयशी ठरलं किंवा आम्ही पाहिलं की दुसरी बाजू प्रामाणिक नाही, जर आमच्या लक्षात आलं की दुसरा पक्ष उर्वरित देशावर स्वत:ला लादण्याचा प्रयत्न करत आहे - तर आम्ही कोणत्याही प्रकारची आक्रमकता स्वीकारणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
"आम्ही स्वत:ला आतापर्यंत सिद्ध केलं आहे, गेल्या (40 वर्षांत) आमच्या ट्रॅक रेकॉर्डने हे दाखवून दिलं आहे की कोणीही आमचा प्रदेश, विशेषत: पंजशिर खोरं जिंकू शकत नाही."
 
"लालसेना आपल्या सामर्थ्याने आम्हाला हरवू शकली नाही. अफगाणिस्तानात सध्या कोणाकडेही लाल लष्कराची ताकद आहे असं मला वाटत नाही. आणि तालिबाननेही 25 वर्षांपूर्वी खोरं ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि ते अपयशी ठरले, त्यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला."