रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

लहानपणापासून सोबत असलेल्या जोडप्याने आयुष्य एकत्रच संपवण्याचा निर्णय का घेतला?

death
जॅन आणि एल्स यांचा जवळपास 50 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. यावर्षी (2024) जून महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी एकत्र मृत्यूला कवटाळलं आहे.दोन डॉक्टरांनी शरीराला अतिशय हानिकारक औषध देऊन त्यांचं आयुष्य संपवलं. नेदरलँड्समध्ये या संकल्पनेला एकत्रित इच्छामरण असं म्हणतात. हे कायदेशीर आहे आणि दुर्मिळ आहे. मात्र प्रत्येक वर्षी अनेक डच जोडपी अशा पद्धतीने आयुष्य जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतात.
 
स्वेच्छेने शेवटचा श्वास घेण्याच्या तीन दिवसांपूर्वी जॅन आणि एल्स यांची कॅम्परव्हॅन नेदरलँड्सच्या उत्तरेला फ्रीझलँडमध्ये एका बीचवर होती. या जोडप्याला सतत फिरण्याची आवड होती. बहुतांश वैवाहिक आयुष्य त्यांनी सतत फिरत्या घरात व्यतीत केलं होतं.
 
मी जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा जॅन म्हणाले होते, “आम्ही अनेकदा दगडाच्या चळतीवर राहण्याचा प्रयत्न केला, पण ते काही शक्य झालं नाही.”
 
जॅन 70 वर्षाचे होते आणि ते व्हॅनच्या ड्रायव्हिंग सीटवर बसले होते. एक पाय त्यांनी दुसऱ्या पायाखाली दाबला होता. त्यांना पाठदुखीचा प्रचंड त्रास असल्यामुळे याच अवस्थेत ते बसले होते. त्यांची पत्नी एल्स यांना डिमेन्शिया होता. एकेक वाक्य जुळवतानाही त्यांना त्रास होत होता.
 
आपल्या शरीराकडे पाहून त्या म्हणाल्या, “ हे खूप छान आहे.” पण डोक्याकडे बोट दाखवून म्हणाल्या, “हे मात्र भीषण आहे.”
जॅन आणि एल्स बालवाडीत असताना एकमेकांना भेटले. ते अक्षरशः आयुष्यभर एकमेकांचे जोडीदार होते. जेव्हा जॅन तरुण होते तेव्हा ते नेदरलँड्सच्या संघासाठी हॉकी खेळायचे आणि त्यानंतर ते प्रशिक्षक झाले. एल्स या प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. त्या दोघांनाही पाणी, बोटी आणि वल्हवण्याची आवड होती. याच त्यांच्या आयुष्याच्या अविभाज्य गोष्टी होत्या.
तरुणपणी ते एका हाऊसबोटवर राहिले होते. त्यानंतर त्यांनी एक कार्गो बोट घेतली आणि नेदरलँड्सच्या अंतर्गत जलमार्गावर वस्तू निर्यातीचा व्यापार उभा केला.
 
एल्स यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलाला जन्म दिला. (मुलाने त्याचे नाव न सांगण्याची विनंती केली आहे.) तो बोर्डिंग स्कूलमध्ये राहायचा आणि वीकेंडला पालकांबरोबर राहायला यायचा. त्यामध्ये तो सुद्धा त्याच्या आई-वडिलांबरोबर फिरायचा. जॅन आणि एल्स कामानिमित्त राहीन नदी किंवा नेदरलँड्सचे बेट अशा रंजक ठिकाणी जायचे.
 
1999 च्या दरम्यान इंग्लंडमध्ये कार्गो बिझनेस या क्षेत्रात स्पर्धा खूपच वाढली. दहा वर्षापेक्षा जास्त काळ अतिशय कष्टाचं काम केल्यामुळे जॅन यांना तीव्र पाठदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर जॅन आणि एल्स सामान्य माणसांसारखे राहू लागले. मात्र काही वर्षानंतर ते पुन्हा बोटीवरच राहू लागले. तेही जेव्हा कठीण जाऊ लागलं तेव्हा त्यांनी एक मोठी कॅम्परवॅन घेतली.
 
2003 मध्ये जॅन यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली. मात्र तरीही त्यांच्यात काहीही सुधारणा झाली नाही. जगातल्या शक्य तितक्या सर्व पेन किलर्स त्यांनी घेतल्या पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. एल्स मात्र शिक्षकी पेशात व्यग्र होत्या. बरेचदा ते इच्छा मरणाबद्दल बोलायचे. इतक्या शारीरिक व्याधी असताना आपल्याला जगायचं नाही असं जॅन यांनी त्यांच्या कुटुंबाला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. याच काळात या जोडप्याने NVV या संस्थेत प्रवेश घेतला.
 
“तुम्ही जर खूप औषधे घेतली तर एखाद्या झोंबी सारखे जगता त्यामुळे मला ज्या वेदना होत्या आणि एल्सलाही ज्या वेदना होत्या ते बघता मला वाटलं की हे इथेच थांबवावं.” जॅन मला सांगत होते
थांबवावं याचा अर्थ जगणं थांबवावं असा होता

2018 मध्ये एल्स यांनी शिक्षकी पेशातून निवृत्ती घेतली. त्यांना डिमेन्शियाची लक्षणं दिसत होती मात्र त्यांनी डॉक्टर कडेजाण्यास नकार दिला. कारण त्याच्या त्यांच्या वडिलांनाही डिमेन्शिया होता. या रोगामुळे तब्येत कशी खालावते आणि मृत्यू येतो हे त्यांनी बघितलं होतं. मात्र एक वेळ अशी आली की लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं.
 
नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांना डिमेन्शियाचं निदान झालं. एल्स डॉक्टरांच्या खोलीतून नवरा आणि मुलाला तिथेच सोडून अतिशय संतापाने बाहेर पडल्या.ती अगदी पिसाळलेल्या बैलासारखी झाली होती. ती प्रचंड चिडली होती.” जॅन सांगतात.जेव्हा एल्स यांना कळलं की त्यांची परिस्थिती सुधारणार नाही तेव्हा त्या दोघांनी एकत्रित इच्छामरणाबद्दल विचार करायला सुरुवात केली.
 
नेदरलँड्समध्ये इच्छामरण आणि देखरेखीखाली आत्महत्या या दोन्ही गोष्टी कायदेशीर आहेत. जर एखाद्याने विनंती केली आणि त्यांच्या वेदना मग त्या शारीरिक असो किंवा मानसिक आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्या असहनीय आहेत आणि त्यात कोणतीही सुधारणा होऊ शकत नाही, अशा वेळेस हा पर्याय स्वीकारण्यात येतो. दोन डॉक्टर्स ही प्रक्रिया पार पडतात. पहिल्या डॉक्टरने केलेले अवलोकन योग्य आहे की नाही ते दुसरा डॉक्टर ठरवतो.
 
2023 मध्ये नेदरलँड्स मध्ये 9068 लोकांनी इच्छामरणाचा पर्याय स्वीकारला. हा दर एकूण मृत्यूच्या पाच टक्के होता. एकत्रित इच्छामरणाच्या 33 केसेस होत्या. म्हणजेच 66 लोकांनी इच्छामरण स्वीकारलं. एखाद्या व्यक्तीच्या जोडीदाराला डिमेन्शिया असेल तर परिस्थिती गुंतागुंतीची होते कारण जोडीदाराची परवानगी आहे किंवा नाही याबद्दल अनिश्चितता असते.
 
अनेक डॉक्टर डिमेन्शियाच्या रुग्णांवर इच्छामरणाची प्रक्रिया करण्यास कचरतात असं वयोवृद्धांचे डॉक्टर रोज मार्जिन व्हॅन ब्रुचेन सांगतात.
 
जॅन आणि एल्स यांच्या फॅमिली डॉक्टरची सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती. इच्छामरणाचा आकडा बघितला तर डॉक्टरांची याबद्दलची अनिच्छा प्रकर्षाने दिसून येते. 2023 मध्ये जितके मृत्यू झाले त्यापैकी 336 लोकांना डिमेन्शिया होता. डिमेन्शियाच्या रुग्णांना असहनीय वेदना होत आहे याची कायदेशीर चाचपणी डॉक्टर कसे करतात?
 
व्हेन ब्रुचेन सांगतात, “डिमेन्शियाच्या सुरुवातीला पुढे काय होईल याची रुग्णांना कल्पना नसते, त्यामुळे आयुष्य संपवण्याचा ते विचार करतात.”
 
“मला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्या मी करू शकणार नाही का? मी माझ्या कुटुंबीयांना ओळखू शकणार नाही का असे प्रश्न त्यांना पडतात. मात्र तुम्ही दोन्ही डॉक्टरांना योग्य पद्धतीने सांगितले तर त्यांना कळू शकते. या प्रक्रियेतला दुसरा डॉक्टर हा मानसिक बाबींवर जास्त भर देतो. त्यामुळे इच्छामरण पत्करण्याची वेळ का आली हे तो योग्य पद्धतीने समजू शकतो.”
 
त्यांच्या फॅमिली डॉक्टरला हे करायचं नव्हतं त्यामुळे ही दोघं एका मोबाईल इच्छामरण क्लिनिक मध्ये गेले. या क्लिनिकने नेदरलँड्स मध्ये गेल्यावर्षी पंधरा टक्के इच्छा मरण प्रक्रिया पार पडल्या होत्या. त्यांच्याकडे येणाऱ्या एक तृतीयांश विनंत्यांचा ते स्वीकार करतात.
 
जेव्हा एखाद्या जोडप्याला आयुष्य संपवायचं असतं एक व्यक्ती जोडीदारावर प्रभाव तर टाकत नाही ना, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.डॉक्टर बर्ट कायझर यांनी अशा एकत्रित इच्छा मरणाच्या दोन केसेस पाहिल्या आहेत. मात्र त्यांना एक भेट आठवते जिथे नवरा तिच्या बायकोवर बळजबरी करत होता. पुढच्या भेटीत डॉक्टरांनी तिला वेगळं भेटण्याचं ठरवलं
 
ती म्हणाली, “माझे खूप प्लॅन्स आहेत.” डॉक्टर कायझर सांगतात, “त्या बाईला कळलं होतं की तिच्या नवऱ्याची तब्येत खूप खराब आहे पण तिला त्याच्याबरोबर मरायचं नव्हतं.”
 
तेव्हा ही प्रक्रिया थांबवली गेली. त्या बाईच्या नवऱ्याला नैसर्गिक मरण आलं. त्याची बायको अजूनही जिवंत आहे.
डॉ. थिओ बोर हे नेदरलँड्स मधील एका विद्यापीठात हेल्थकेअर एथिक्स या विषयाचे प्राध्यापक आहेत. ते इच्छामरणाच्या संकल्पनेवर टीका करतात. पेलेटिव्ह केअर च्या क्षेत्रात विकास झाल्यामुळे या संकल्पनेची गरज पडल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
“मला तर असं वाटतं की डॉक्टरांनी एखाद्याला मारणं एखाद्या वेळी योग्य असू शकतं मात्र ते अपवादात्मक असायला हवं.”
एकत्रित इच्छामरणाचा परिणाम याची डॉक्टर बोर यांना काळजी वाटते. विशेषतः नेदरलँड्स चे माजी पंतप्रधान आणि त्यांची पत्नी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला एकत्र मरण पत्करण्याचा निर्णय घेतला आणि तिची जागतिक पातळीवर एक बातमी झाली.
 
“गेल्या वर्षात आम्ही अशा अनेक केसेस पाहिल्या आहेत. आणि अशा मृत्यूचं उदात्तीकरण होत आहे असं ते म्हणाले. त्याचवेळी एकत्रित इच्छामरणाच्या संकल्पनेवर असलेला टॅबू आता दूर होत आहे.” ते सांगतात.
 
जॅन आणि एल्स कदाचित त्यांच्या कॅम्परव्हॅनवर कितीही काळ राहू शकतात. त्यांना नैसर्गिक मरण येईल असं त्यांना वाटतंय का?
 
“नाही नाही नाही…. मला असं वाटत नाही.” एल्स म्हणतात.
“मी माझं आयुष्य जगलो आहे आणि मला आता कोणत्याही वेदना नको आहेत.” असं तिचा नवरा सांगतो. “आम्ही जे आयुष्य जगलो त्याचा विचार केला तर आम्ही आता खरोखरच म्हातारे झालो आहोत आणि हे सगळं थांबवावं असं आम्हाला वाटतं.”
 
त्यात आणखी एक बाब आहे. डॉक्टरांनी एल्स यांची तपासणी केली आणि आपला निर्णय घेण्यास त्या अजूनही सक्षम आहे असं त्यांनी जाहीर केलं. याचाच अर्थ जगायचं की नाही हा निर्णय त्या घेऊ शकतात. मात्र त्यांचा डिमेन्शिया आणखी वाढला तर मात्र परिस्थिती बिकट होऊ शकते.
 
जॅन आणि एल्स यांच्या मुलासाठी हा निर्णय अजिबातच सोपा नव्हता.
“तुम्ही तुमच्या पालकांना असं मरताना बघू शकत नाही त्यामुळे नक्कीच अश्रुपात झालाच. आमचा मुलगा म्हणाला की योग्य वेळ येईल योग्य वातावरण निर्माण होईल, पण खरं सांगायचं तर माझ्यासाठी नाही.” जॅन सांगतात.
“असेल नाही असंच वाटतं आता दुसरा कोणताही पर्याय नाही.” एल्स यांनाही असंच वाटतं.
 
डॉक्टरबरोबर ज्या दिवशी अपॉइंटमेंट होती त्याच्या आदल्या दिवशी एल्स, जॅन त्यांचा मुलगा आणि नातू एकत्र होते. जॅन इतका इतके व्यवहारी होते की त्यांना कॅम्परव्हॅन विकायची असेल तर कोणत्या मुद्द्यांवर विकायची आणि तिचे काय गुण अवगुण आहेत हे त्यांनी मुलाला सांगितलं.
 
“त्यानंतर मी माझ्या आईबरोबर समुद्रकिनाऱ्यावर चालायला गेलो. मुलं खेळत होती अधून मधून जोक सांगत होती. तो एक विचित्र दिवस होता.” मुलगा सांगत होता.
“मला आठवतं की आम्ही संध्याकाळी जेवत होतो आणि आता या पुन्हा कधीही एकत्र जेवणार नाही हे माझ्या लक्षात आलं आणि माझ्या डोळ्यात अश्रू तरळले.” तो पुढे म्हणाला.
 
“सोमवारी सकाळी सर्वजण हॉस्पिटलमध्ये एकत्र जमले. या जोडप्याचे मित्र-मैत्रिणी होते जॅन आणि एल्सची भावंडं होती, त्यांची सून आणि त्यांचा मुलगाही होता.”
“डॉक्टर येण्यापूर्वी आमच्याकडे दोन तास होते. आम्ही आमच्या आठवणी बद्दल बोललो आणि काही गाणी ऐकली.”
 
“शेवटचे काही तास मात्र अतिशय कठीण होते. डॉक्टर आले आणि सगळं एकदम पटापट झालं. ते त्यांची प्रक्रिया पार पाडतात आणि काही मिनिटातच सगळा खेळ संपतो.”
एल्स व्हॅन लिनिजन आणि जॅन फेबर यांना धोकादायक औषध दिली आणि 3 जून 2024 ला त्यांना एकत्रित मृत्यू आला.
कॅम्परव्हॅन अजूनही विकायला काढलेली नाही. एल्स आणि जैन यांच्या मुलाने ती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांच्या पत्नी बरोबर आणि मुलांबरोबर सुट्टीसाठी जाण्याचा ते विचार करत आहेत.
“मी ती नंतर विकेन आधी मला आमच्या कुटुंबासाठी काही आठवणी तयार करायच्या आहेत” असं तो म्हणाला.

Published By- Priya Dixit