गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

श्रीशांत-चंडिलाचा तुरुंगातच झाला ‘राडा’

WD
‘अरे ए चंडिला, तूच मला फिक्सिंगच्या जाळ्यात अडकवले आहेस.. तुझ्यामुळेच माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.. बघून घेईन तुला.. सोडणार नाही..’

रागाने लालबुंद झालेला, संतापाने थरथरणारा एस. श्रीशांत त्वेषाने बडबडत होता. पोलीस चौकशीदरम्यान, अजित चंडिलाला समोर पाहताच त्याची साफ ‘सटकली’ होती. काय करू आणि काय नको, असे त्याला झाले होते. तर, श्रीशांतचे आरोप ऐकून चंडिलाही खवळला होता. अंगावर येणार्‍या श्रीशांतला शिंगावर घेण्यासाठी तो तयारच होता. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना एकमेकांपासून दूर केल्याने जेलचा आखाडा होता-होता राहिला.

ही गोष्ट आहे रविवार रात्रीची. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने श्रीशांत आणि अजित चंडिला यांना चौकशीसाठी एकत्र आणले, तेव्हा ‘ड्रामेबाज’ श्रीशांतचा स्वत:वरचा ताबा सुटला. दहा दिवस तुरुंगाची हवा खाऊन तो सैरभैर झाला होता. त्यातच कोर्टाने जामीन देण्याऐवजी त्याच्या कोठडीत वाढ केल्याने त्याचे डोके फिरले होते. नेमका त्याचवेळी चंडिला त्याच्या नजरेसमोर आला आणि मग सगळी भडास श्रीशांतने त्याच्यावरच काढली.

तुझ्यामुळेच मी अडकलो. तू माझे करिअर संपवले आहेस, आयुष्य उद्ध्वस्त केले आहेस, मी तुला सोडणार नाही, असा हल्लाबोल श्रीशांतने चंडिलावर केला. अर्थात, चंडिलाचे चित्तही थार्‍यावर नव्हतेच. त्यामुळे श्रीशांतची ही ‘बकबक’ ऐकून त्याचाही पारा चढला. त्याने स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचे बिल श्रीशांतवर फाडायला सुरुवात केली. या शाब्दिक चकमकीचे रूपांतर मारामारीत होण्याची चिन्हे दिसू लागली होती. चंडिला श्रीशांतच्या समोर जाऊनच उभा ठाकला होता. परंतु, त्याचा हा पवित्रा पाहून पोलिसांनी दोघांनाही दूर नेले आणि शांत केले. पोलिसांनी ‘खर्जातला आवाज’ दिल्यानंतर गप्प राहण्याशिवाय दोघांकडेही पर्यायच नव्हता. परंतु, तुरुंगाची हवा खाऊनही वाद घालायची श्रीशांतची सवय गेलेली नाही, हेच या ‘राडय़ा’तून स्पष्ट झाले आहे.