युपीमध्ये 'एकला चलो रे' चा निर्णय योग्य
उत्तर प्रदेशात मुलायमसिंहांच्या सायकलवर बसण्याचे नाकारून कॉंग्रेसने त्यांना 'हात' दाखवून अवलक्षण केलेले नाही. उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसच्या गतकामगिरीचा नीट आढावा घेतल्यास ही बाब स्पष्ट होते. कॉंग्रेसने सुरवातीला समाजवादी पक्षाबरोबर युती करणार असल्याची हवा केली आणि आयत्यावेळी पंधरा जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. कॉंग्रेसने समाजवादी पक्षाला चर्चेत गुंतवत ठेवत ही चाल खेळली असली तरी त्यामागे मोठा विचार होता. गेल्या काही वर्षापासून या राज्यात पक्षाची स्थिती ढासळलेली आहे. ती मजबूत करायची असेल तर त्यासाठी स्वतंत्रपणे लढणे गरजेचे होते. तोच निर्णय आयत्यावेळी घेण्यात आला. राज्यात एकूण ८० जागा आहेत. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने नऊ जागा मिळवल्या होत्या. सहा जागांवर त्यांचे उमेदवार दुसर्या क्रमांकावर होते. आता यावेळी कॉंग्रेस ५७ जागांवर लढत आहे. यातल्या किमान वीस जागी कॉंग्रेस पहिल्या किंवा दुसर्या क्रमांकावर रहाण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ स्वबळावर लढण्याचा निर्णय चुकीचा नव्हता. पण त्याचवेळी पक्षाने समाजवादी पक्षाला ठोकर मारताना छोट्या छोट्या पक्षांशी मात्र युती केली आहे. यात आर. के चौधरी यांची राष्ट्रीय स्वाभीमान पार्टी, सोनेलाल पटेल यांचा अपना दल व महान पार्टी यांचा समावेश आहे. कॉंग्रेसला मुलायमसिंह जेवढ्या जागा देत होते, त्यापेक्षा दुप्पट जागांवर कॉंग्रेसचे तगडे उमेदवार मैदानात आहेत. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला नऊ जागा मिळाल्या असल्या तरी १२.०४ टक्के मते मिळाली होती. त्या आधी ९९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला १४.७२ मते मिळाली होती व १० जागा पदरात पडल्या होत्या. २००२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ४०२ जागी उमेदवार उभे केले होते. त्यात पक्षाला ८.९९ टक्के मते मिळाली आणि २५ जागा. २००७ च्या निवडणुकीत पक्षाने ३९३ जागी उमेदवार उभे केले आणि २२३ जागी अमानत जप्त झाली. ८.८४ टक्के मते मिळवून पक्षाने २२ जागा कमावल्या. हे सगळे पाहिल्यानंतर गेल्या दोन निवडणुकीच्या तुलनेत पक्षाची आजची स्थिती बरी आहे. अमेठी, रायबरेली, सुलतानपूर, कुशीनगर येथे कॉंग्रेस मजबूत आहे. मुरादाबादमध्ये अझहरूद्दीनच्या विजयात फारसा अडसर येईल, असे वाटत नाही. रामपूरमधून नूरबानो, धोरहरा येथून जतिन प्रसाद, उन्नाव येथून अनू टंडन, कानपूरहून श्रीप्रकाश जैसवाल, फरुखाबाद येथून सलमान खुर्शीद, प्रतापगडहून रत्ना सिंह, बदायूं येथील सलीम शेरवानी, देवरिया येथून बालेश्वर यादव व मिर्झापूरहून रमेश दुबे मजबूत आहेत. यावेळी बसपा, सपा, भाजप व कॉंग्रेस असा चौकोनी मुकाबला असल्याने कॉंग्रेसला गेल्यावेळेच्या तुलनेत जास्त जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटायला नको. सध्या तरी 'एकला चलो रे'चा कॉंग्रेसचा निर्णय योग्य वाटतो आहे. निकालानंतर काय दिसते ते बघूया.