रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (16:03 IST)

अखेर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच

माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर रिकाम्या झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. याची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून, विधानसभेसोबत म्हणजेच २१ ऑक्टोबरलाच साताऱ्यात मतदान होणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबरच घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात डेरेदाखल झालेले उदयनराजे भोसले यांना दिलासा मिळाला आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर करताना सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नाही, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. मात्र आज (२४ सप्टेंबर) अधिसूचना जाहीर करत आयोगाने पोटनिवडणूक विधासभेसोबत घेण्याचे जाहीर केले. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्याच्या विधानसभेसोबत २१ ऑक्टोबरला सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २४ ऑक्टोबरला विधानसभा मतमोजणीच्या दिवशीच होणार आहे. सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे पोटनिवडणुकीचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सातारा पोटनिवडणुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाचे आदेश सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला मिळाले. त्यानंतर मंगळवारी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची आयोगाने घोषणा केली.