बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (15:59 IST)

येवल्यातून संभाजी पवार देणार छगन भुजबळांना टक्कर

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना मात देण्यासाठी शिवसेनेने त्यांच्याविरोधात उमेदवाराची घोषणा केली आहे. शिवसेनेने भुजबळांना कडवी टक्कर देण्यासाठी येवल्यातून संभाजी पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. दरम्यान काही काळ ते शिवसेनेत परतणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, त्यांनी वारंवार याला नकार दिला होता.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः संभाजी पवार यांनी येवल्यातून उमेदवारीसाठी शिवसेनेचा एबी फॉर्म दिला. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांचाही शेवट झाला आहे. आता येवल्यातून शिवसेनेच्या संभाजी पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्यात लढत रंगणार आहे.
 
शिवसेनेकडून येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेतील इच्छुक उमेदवार संभाजी पवार आणि रुपचंद भागवत यांच्यात स्पर्धा होती. अखेर संभाजी पवार यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनीही उमेदवारीसाठी दावा केला होता. दरम्यान, भुजबळांनी देखील मागील काही काळापासून येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांवर लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यांनी या मतदारसंघातील अनेक विकास कामांचं लोकार्पण केलं. त्यामुळे येथे भुजबळच प्रमुख दावेदार मानले जात आहे.