मंगळवार, 10 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जून 2023 (21:29 IST)

अमळनेरमध्ये श्री कालभैरव, माता श्री जोगेश्वरी व श्री गुरुदत्त मंदिरांच्या जागेचे भूमिपूजन

मंगळग्रह मंदिरात १ जून रोजी (गुरुवारी) श्री कालभैरव, माता श्री जोगेश्वरी व श्री गुरुदत्त यांच्या नियोजित मंदिरांच्या जागेचे भूमिपूजन संत सखाराम महाराज संस्थानचे गादिपती संतश्री प. पू. प्रसाद महाराज, मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.
 
महिनाभरात पाडळसरे धरणाचा प्रश्न मार्गी
अमळनेरकरांसाठी जिव्हाळ्याचा असलेला पाडळसरे धरणाचा प्रश्न काही वर्षांपासून निधीअभावी बासनात आहे. मात्र, या धरणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आजच बैठक होत आहे. त्यात सकारात्मक चर्चा होऊन नक्कीच चांगला निर्णय होऊन अमळनेकरांना गोड बातमी मिळेल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. तसेच कापसाला चांगला भाव मिळावा यासाठीही सरकारचे सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत, असेही राज्याचे वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास, युवक कल्याण व क्रीडा मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
 
सासरवाडीवर माझे विशेष प्रेम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव रेल यात्रेच्या माध्यमातून देशातील अनेक धार्मिक स्थळांना पर्यटकांनी भेट द्यावी, या उद्देशाने गौरव यात्रा सुरू केली आहे. यात मंगळग्रह मंदिराचा समावेश झाला आहे. यामुळे येणाऱ्या काळात अमळनेर रेल्वेस्थानकाचा विस्तार होईल. २० वर्षांत जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी अवघ्या १० महिन्यांत सरकारकडून मिळाला आहे. अमळनेर ही माझी सासरवाडी असल्याने या शहरावर माझे विशेष प्रेम आहे. त्यामुळे मंदिराच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.
डाव कोणताही असो चीत करण्याची ताकद
लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. लालमातीत कुस्ती खेळताना अनेक डाव शिकलो. खो-खो, कबड्डी, मलखांब यासारखे खेळ आत्मसात केले. त्यामुळे कोणता डाव कसा असतो हे मला चांगले माहीत आहे. राजकारण आणि कुस्ती यात साम्य आहे. त्यामुळेच मी सहा वेळा आमदार झालो. राजकारणातही डाव कुठलाही असला, तरी चीत करण्याची मी ताकद ठेवतो, अशी मिश्किल कोपरखळी मंत्री महाजन यांनी कार्यक्रमात मारली.