शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (12:49 IST)

मराठा आरक्षणचा फैसला होणार आज

मराठा आरक्षणाप्रकरणी (maratha reservation)आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी होत आहे. राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर असणारी नाराजी तसंच आरोप-प्रत्यारोप होत असताना होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या खंडपीठासमोरच सुनावणी होणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून नाराजी दर्शवण्यात आली आहे.
 
आरक्षणाला (maratha reservation) स्थगिती देताना प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्यात आलं होतं. परंतु आजची सुनावणी नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे होणार आहे. याच खंडपीठाकडून आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती.
 
मराठा आरक्षण (maratha reservation) उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी यासंबंधी बोलताना ज्या खंडपीठाने स्थगिती दिली त्यांच्यासमोर सुनावणी न होता दुसऱ्या खंडपीठासमोर घेण्यात यावी अशीही विनंती करणार असल्याचं म्हटलं होतं. “मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हायला हवी ही फक्त सरकारचीच नाही तर सर्व याचिकाकर्त्यांची भूमिका आहे,” असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
 
“मराठा आरक्षणावरुन आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात मंजुरी मिळावी हीच आमची भूमिका आहे. तसंच हा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे,” असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
 
"मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने जोर लावायचा म्हणजे काय करायचं?,” असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी विचारला आहे.