एअरसेल-मॅक्सिस गैरव्यवहार : दयानिधी मारन, कलानिधी मारन निर्दोष
एअरसेल-मॅक्सिस गैरव्यवहारप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन, त्यांचे बंधू कलानिधी मारन यांच्यासह सर्व आरोपींना पतियाळा हाऊस न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्व आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याने त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. चेन्नईचे दूरसंचार प्रवर्तक सी. शिवशंकर यांच्यावर २००६ मध्ये एअरसेल आणि त्याच्या उपकंपन्यांमध्ये आपली भागिदारी मलेशियन कंपनी मॅक्सिस ग्रुपला विकण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांच्यावर होता. हा आरोप मारन यांनी फेटाळून लावला होता.