शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (18:37 IST)

मुकेश अंबानींच्या उद्योग साम्राज्यात ईशा अंबानीकडील मोठी जबाबदारी नेमकं काय सांगते?

ambani family
गेल्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स उद्योगसमूहाची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठीकत त्यांनी रिलायन्स उद्योगसमूहात आपल्या तिन्ही मुलांना वेगवेगळी जबाबदारी विभागून दिली. मुकेश अंबानींच्या या पावलाकडे अनेकजण त्यांचा 'सक्सेशन रोडमॅप' म्हणून पाहतायेत.
 
मुकेश अंबानींनी अकाश आणि ईशा यांना अनुक्रमे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या टेलिकम्युनिकेशन्स आणि रिटेल बिझनेसची जबाबदारी दिलीय, तर लहान मुलगा अनंत अंबानींना नवीन ऊर्जेशी संबधित विभागात लक्ष घालण्यास सांगण्यात आलंय.
 
मुकेश अंबानींच्या पुढील पिढ्यांकडील नव्या जबाबदाऱ्यांकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. कारण बाजार मूल्यांकनानुसार रिलायन्स उद्योगसमूह भारतातील सर्वांत मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे. कुणाकडे कोणती जबाबदारी दिली जाईल, याबाबत अजूनतरी अंदाजच आहेत.
 
मात्र, उद्योग पुढील पिढीकडे देण्याबाबत मुकेश अंबानी इतिहासातील चूक पुन्हा गिरवू इच्छित नाहीत. 20 वर्षांपूर्वी धीरुभाई अंबानींचं निधन झालं. तेव्हा त्यांनी मृत्यूपत्र लिहिलं नसल्यानं, पुढे जेव्हा उद्योगाच्या वाटण्या करण्याची वेळ आली, तेव्हा मुकेश अंबानी आणि त्यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्यात वितुष्ट निर्माण झालं होतं.
 
रिलायन्स उद्योगसमूहाच्या वार्षिक सर्वसाधरण बैठकीनंतर सर्वांना थोडं आश्चर्यचकित करणारी घटना म्हणजे इशा अंबानींकडे सोपवलेली जबाबदारी. कारण अंबानी कुटुंबातातील महिलांनी उद्योगसमूहात आतापर्यंत घेतलेला सहभाग पाहता, इशा अंबानींना महत्त्वाचं स्थान मुकेश अंबानींनी दिल्याचं स्पष्ट आहे.
 
गेल्या दोन दशकात भारतातील उद्योगपतींच्या कुटुंबातही 'जनरेशन शिफ्ट' झाल्याचं दिसून येतंय. कारण महिलांकडेही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत.
 
पुढचं नियोजन
मुकेश अंबानी आता 65 वर्षांचे आहेत. रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. मुलांना उद्योगात सहभागी करण्यासाठी आणखी वेळ थांबू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही.
 
"आपल्या संपत्तीवर पूर्ण नियंत्रण ठेवणाऱ्या अनेक आशियाई पितृसत्ताक उद्योगपतींचा मार्ग त्यांनी मोडला. मुकेश अंबानी आशियातील उद्योजकांच्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्त्व करतात. तसंच, त्यांनी उद्योगविश्वातील संघर्षही पाहिलाय," असं इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधील थॉमस श्मिधेनी सेंटर फॉर फॅमिली एंटरप्रायझेचे वरिष्ठ सल्लागार प्रा. कविल रामचंद्रन यांनी म्हटलं.
 
अगदी टाटा समूहापासून सिंघानिया कुटुंबापर्यंत सगळ्यांनीच उत्तराधिकारी निवडताना कायमच वाद पाहिलाय. अनेकदा तर हे वाद न्यायालयापर्यंत पोहोचले आणि त्यातून मोठा आर्थिक बोजा सुद्धा संबंधित उद्योग समूहांना सोसावा लागला.
 
हुब्बीस या वेल्थ कन्सल्टिंग फर्मच्या मते, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संपत्ती हस्तांतरित करण्याला कोव्हिड-19 च्या महासाथीनंतरच्या काळात वेगळ महत्त्व आलंय.
 
नाईट फ्रँक या ग्लोबर प्रॉपर्टी कन्सल्टन्सीच्या मते, खरंतर आशियातील अनेक उद्योजक कुटुंबामध्ये सक्सेशन प्लॅन तयार होत होते. मात्र, कोरोनानं संपत्तीचं पुन्हा मूल्यांकन करण्याची वेळ आणलीय.
 
जेंडर शिफ्ट
संपत्तीचं पुनर्मूल्यांकन होत असताना महिलांच्या भूमिकेचा विचार केला जातोय, असंही म्हटलं जातंय.
 
मुलांच्या भूमिकांबद्दल बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, ते आधीच रिलायन्समध्ये चांगलं काम करत आहेत.
 
इशा अंबानी तिच्या इतर भावांसारख्याच रिलायन्समध्ये पुढे येत आहेत, जबाबदाऱ्या घेत आहेत. अंबानी कुटुंबातील इतर महिलांच्या तुलनेत त्यांचं असं ठळकपणे पुढे येणं आणि जबाबदाऱ्या घेणं हे वेगळं आणि लक्ष वेधून घेणारं आहे.
 
इशा अंबानी या येल विद्यापीठातून पदवीधर असून, त्यानंतर त्यांनी मॅकिन्से या कन्सल्टिंग कंपनीत काही काळ काम केलं. रिलायन्स उद्योगसमूहात प्रवेशाआधी तिथं त्यांनी एकप्रकारे प्रशिक्षणच घेतलं.
 
अंबानी ज्या गुजराती व्यापारी समाजातून येतात, ते पाहता जेंडर शिफ्ट म्हणजे त्यांनी दिलेला एक मोठा संदेश ठरण्याची शक्यता असल्याचं प्रा. रामचंद्रन म्हणतात.
 
टेरेन्शिया या लिगसी प्लॅनिंग फर्मचे व्यवस्थापकीय संचालक संदीप नेर्लेकर म्हणतात की, अंबानींकडून हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल असेल, जो इतर उद्योगसमूहांसाठी नवा पायंडा पाडेल.
 
इशा अंबानी या उद्योजक कुटुंबातल्या नव्या पिढीच्या महिलांच्या प्रतिनिधी आहेत. गोदरेजच्या निसाबा गोदरेज, पार्ले अॅग्रोच्या नादिया चौहान यांसारख्या काही महिलांनी त्यांच्या त्यांच्या उद्योजक कुटुंबात जबाबदाऱ्या सांभळल्या आहेत आणि सांभाळत आहेत.
 
महिलांनी उद्योगविश्वात मोठमोठ्या जबाबदाऱ्या हाती घेण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. उदाहरणार्थ, महिलांना उच्चशिक्षणाची कवाडं खुली झाली आहेत. तसंच, पारंपरिक एकत्र कुटुंब आता वेगळ्या मार्गनं जाणाऱ्यांना वाट मोकळी करून देत आहेत.
 
आपले पंख छाटले जातील, याची चिंता न करता अनेक महिला आता आपल्या अधिकारांबाबत आणि क्षमतांबाबत आवाज उठवत आहेत, अस दीपाली गोयंका म्हणतात. दीपाली गोयंका या वेलस्पन इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आहेत. वेलस्पन ग्रुप भारतातील सर्वांत मोठ्या टेक्स्टटाईल कंपन्यांपैकी एक आहे.
 
दीपाली गोयंकांनी वयाच्या 18 व्या वर्षी लग्न केलं. मुलं थोडी मोठी झाल्यानंतर त्या पतीसोबत उद्योगविश्वात सक्रीय झाल्यात. नंतर त्यांनी हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये व्यवस्थापनाचेही धडे घेतले.
 
मात्र, नेर्लेकर म्हणतात की, अजूनही दहापैकी आठ उद्योजक कुटुंब तरी असेच आहेत, जे उद्योगाचं भविष्य ठरवण्याची वेळ येते, तेव्हा मुलींपेक्षा मुलांना प्राधान्य देतात. किंबहुना, मुलं आणि मुलींमधील संपत्तीचं वाटप सुद्धा समान नाहीय.
 
चेन्नईस्थित मुरुगप्पा ग्रुपच्या वारसांपैकी एक असलेल्या वल्ली अरुणाचलम यांनी बोर्डमधील जागेसाठी केलेली लढाई याच गोष्टीला अधोरेखित करते की, भारतात महिलांसाठी अधिकार मिळवणं किती कठीण गोष्ट आहे.
 
हिंदू वारसाहक्क कायद्यान्वये महिलांना समान अधिकार मिळतात. हा कायदा महिलांना मदतगार ठरत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
 
तज्ज्ञ म्हणतात की, हा लढा केवळ अधिकारांचा नसून, पितृसत्ताक पद्धतीविरोधातीलही आहे आणि तो आता कुठे सुरू झालाय.