शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (13:40 IST)

‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला

माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या जोडीला नशिबाची साथ असते, त्यामुळे, तो भरपूर प्रमाणात आपल्या नशिबावर अवलंबून असतो, असे म्हंटले जाते. उदाहरणार्थ, आपल्या दैनंदिन जीवनात काही काम चांगल्या पद्धतीने पार पडले की, अमुक व्यक्तीने नशीब काढले असे बोलले जाते, पण जर हेच काम बिघडले तर त्याच्या नशिबाला कोसले जाते. मुळात, आपले नशीब हे आपल्याच हातात असते, आयुष्यात येणाऱ्या चढ उताराला माणूसच जबाबदार असतो, मात्र नाव नशिबाचे पुढे केले जाते. नशिबाच्या याच संकल्पनेवर आधारीत असलेला एक नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत, फ्लाईंग गॉड फिल्म्स निर्मित, गिरी मीडिया फॅक्टरी यांच्या सहयोगाने प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘नशीबवान’ असे आहे. अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. ‘नशीबवान’ सिनेमाच्या या मोशन पोस्टरवर मराठीचा गुणी कलाकार भाऊ कदम एक स्वच्छता कामगाराच्या भूमिकेत आपल्याला दिसून येतो. तसेच, त्याच्या हातात त्याचा साथीदार म्हणजे साफ सफाई करणारा  झाडूसुद्धा तेवढ्याच दिमाखात चमकत असल्याचे पाहायला मिळते.
 
‘नशीबवान’ सिनेमातील भाऊ कदमच्या व्यक्तिरेखेचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, नुकत्याच पार पडलेल्या दिवाळीसणाच्या उत्तरार्धात भाऊने याच व्यक्तिरेखेचा पेहराव धारण करत, मुंबईकरांना परिसर स्वच्छ राखण्याचा संदेशदेखील दिला होता. दिवाळीचा जल्लोष साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी फटाके तर वाजवले जातात, पण त्यातून होणाऱ्या कचऱ्याकडे सहज कानाडोळा केला जातो. परिसर अस्वच्छ करणारा हा कचरा त्वरित उचलणे गरजेचं असून, याच संदेशपर बांद्रा येथील निवासी वसाहतीमध्ये 'नशिबवान' चित्रपटाच्या टीमने स्वच्छता मोहिम राबवली. यात भाऊने रस्त्यावर उतरून सफाई कर्मचाऱ्यासोबत हातात झाडू घेऊन रस्ता साफ करत, मोलाचा हातभार लावला. दिवाळीच्या उत्तरार्धात म्हणजेच भाऊबिजेच्या मुहूर्तावर राबविण्यात आलेल्या या मोहिमेला स्थानिकांनीदेखील उत्तम प्रतिसाद दिला. 
 
उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारीत असलेला 'नशीबवान' हा सिनेमा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांची देखील मुख्य भूमिका आहे. 'नशीबवान' या सिनेमाचे अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे निर्माते असून, प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.