शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 डिसेंबर 2022 (14:40 IST)

मराठी अभिनेत्याची गंभीर आजाराशी झुंज; आर्थिक मदतीचे सोशल मीडियात आवाहन

अनेक मालिका तसेच सिनेमांमधून आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेले अभिनेते म्हणजे विलास उजवणे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते या मनोरंजन विश्वापासून लांब असल्याचे दिसते आहे. बऱ्याच काळापासून त्यांचा अभिनय असलेली मालिका काही दिसलेली नाही. यामुळे यासंदर्भात माहिती घेतली असता, धक्कादायक माहिती समोर आली. अभिनेते विलास उजवणे काही दिवसांपासून आजारी आहेत. आजार गंभीर असून आता त्यांनी आर्थिक मदतीसाठीच आवाहन केलं आहे.
 
प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रामुख्याने खलनायकी भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या तरी, त्या देखील त्यांनी ताकदीने निभावल्या. ‘चार दिवस सासूचे’, ‘वादळवाट’ अशा मालिकांमधून घराघरांत पोहचलेले विलास यांनी वैविध्यपूर्ण पात्र साकारुन अनेक भूमिका गाजवल्या. सध्या त्यांच्या तब्येतीविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसून त्यांच्या मित्राने अभिनेत्यासाठी आर्थिक आवाहन करत एक पोस्ट शेअर केली आहे.
 
तब्बल सहा वर्षांपासून डॉ. उजवणे हे ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत आहेत. या आजाराशी लढता लढता त्यांची संपूर्ण जमा खर्च झाली आहे. त्यातच त्यांना आता हृदयाचा त्रासही सुरू झाला आहे. या सर्व गोष्टींना खंबीरपणे तोंड देत असतानाच डॉ. विलास यांना कावीळ झाली. सध्या ते रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर तात्काळ एक शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील उपचारांसाठी विलास यांना आर्थिक मदतीची गरज आहे. यासाठी त्यांचे मित्र राजू कुलकर्णी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor