गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2019 (12:13 IST)

"मिस यू मिस्टर"चे पहिले पोस्टर प्रकाशित

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २१ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अनेक गाजलेले चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही मालिका ज्यांच्या नावावर आहेत असे समीर जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली आहे. थ्री आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. "मिस यू मिस्टर" या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज प्रकाशित करण्यात आले.
 
‘मिस यू मिस्टर’ हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट असून तो नातेसंबंधांवर बेतलेला आहे. या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे.
 
चित्रपटाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली की 'मिस यू मिस्टर'चे लेखक आणि दिग्दर्शक समीर जोशी यांच्याबरोबरचा हा माझा दूसरा चित्रपट असून या आधी मी त्याच्या 'मामाच्या गावाला जाऊया' या सिनेमामध्ये काम केले होते. 'मिस यू मिस्टर'मध्ये मी 'कावेरी' नावच्या मुलीची भूमिका साकारत आहे, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सिनेमातदेखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. जी या चित्रपटाच्या नावातूनच लक्षात येते’.
 
‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाबद्दल बोलताना सिद्धार्थ चांदेकर म्हणाला की ‘मृण्मयी आणि मी कॉलेजमध्ये असताना एकांकिकांमध्ये काम केले आहे. मृण्मयी देशपांडे ही खूप चांगली अभिनेत्री असल्यामुळे मलादेखील सिनेमामध्ये तिच्यासोबत काम करताना खूप मजा आली. या चित्रपटामध्ये मी ‘वरूण' नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केले असून त्यांनी आम्हाला काम करण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूप दर्जेदार झाला आहे आणि तो नक्की प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे’.
 
‘मिस यू मिस्टर’चे दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, “ही काही फक्त वरुण आणि कावेरीची गोष्ट नाही, तर कामानिमित्त एकमेकांपासून दूर रहायची वेळ आलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. एकमेकांवर अतीव प्रेम असणाऱ्यांना एकमेकांपासून दूर रहायची वेळ आली तर ते अंतर फक्त शारीरिक नाही, पण त्यामुळे नात्यामध्ये अंतर पडतं? आणि जर असं अंतर पडलं तर ते मिटवण्यासाठी काय करावं, या सर्वांबद्दल हसत-खेळत, कधी डोळ्यांच्या कडा ओलावत सांगितलेली ही गोष्ट आहे,” ते म्हणतात.
 
समीर जोशी यांनी दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. बस स्टॉप (२०१७), मामाच्या गावाला जाऊया (२०१४), मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३) असे गाजलेले मराठी चित्रपट जोशी यांच्या नावावर आहेत. त्यांनी ‘बे दुणे दहा’, ‘प्रीती परी तुजवरी’ आणि ‘एक नंबर’ या स्टार प्रवाहवरील टेलिव्हिजन मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
 
मंत्रा व्हिजन ही एक बहुआयामी निर्मिती कंपनी असून अर्थपूर्ण आणि उच्च दर्जाची निर्मिती मूल्य असलेले कार्यक्रम करण्यावर तिचा भर असतो. चित्रपट, डिजिटल मीडिया, नुत्य नाटिका तसेच उर्वशी सारख्या रंगमंच कार्यक्रमात कंपनी कार्यरत आहे.
 
कंपनीची सर्वात जमेची बाजू म्हणजे ही एक युवा कंपनी आहे. त्या माध्यमातून कंपनीला भक्कम पायावर आधारित आणि धाडसी विषय हाताळता येतात. या विषयांना वाचा फोडणे आणि त्यांना प्रकाशझोतात आणणे महत्त्वाचे असते. कंपनीने आतापर्यंत हाताळलेल्या सर्वच प्रकल्पांमध्ये ताजेपणा आणि चिकाटी दिसली आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना त्या त्या क्षेत्रातील सर्वोत्तम असे देण्याच्या आपल्या धोरणाला अनुसरूनच कंपनीने आतापर्यंतची वाटचाल केली आहे.
 
दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे हे ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाचे निर्माते आहेत. दीपा यांना तब्बल चार दशकांचा गारमेंट आणि निर्यात क्षेत्रातील अनुभव आहे. त्यांनी आत्तापर्यंत चित्रपट, डान्स ड्रामा आणि टेलिव्हिजन मालिकांची निर्मिती केली आहे. त्या एक स्वयंनिर्मित उद्योजिका आहेत. सुरेश म्हात्रे हे जाहिरात क्षेत्रातील आघाडीचे नाव आहे. त्यांनी आत्तापर्यंत २५० हूनही अधिक कॉर्पोरेट आणि जाहिरात लघुपट केले आहेत. इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंटमधील पदवी धारण केलेले म्हात्रे हे कॉर्पोरेट जगतात चार दशकांहूनही अधिक काळ कार्यरत आहेत. त्यांनी २०१४मध्ये डायरेक्टर'स रेअर या अंतर्गत तसेच पीवीआरने प्रस्तुत केलेल्या ‘सुलेमानी किडा’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आहे.