मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (08:13 IST)

विशाल निकम बिग बॉस मराठी-3 चा विजेता, जाणून घ्या त्याचा प्रवास

विशाल निकम बिग बॉस मराठी-3 स्पर्धेचा विजेता ठरला आहे. जय दुधाणे आणि विशाल निकम यांच्यात चुरस पाहायला मिळाली. विशालने यामध्ये बाजी मारत जेतेपदावर नाव कोरलं.
उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मिनल शाह, जय दुधाणे आणि विशाल निकम शेवटचे पाच स्पर्धक होते. उत्कर्ष, विकास, मिनल हे स्पर्धेतून बाहेर पडले. विशाल आणि जय यांच्यात अंतिम मुकाबला झाला.
100 दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर विशाल जेतेपदाच्या करंडकासह बाहेर पडणार आहे. विशालला विजेता म्हणून 20 लाख बक्षीस रकमेने गौरवण्यात आलं आहे.
बिग बॉस मराठीच्या पहिल्या हंगामात मेघा धाडे तर दुसऱ्या हंगामात शिव ठाकरे विजयी ठरले होते.
बिग बॉस मराठी-3 स्पर्धेत 15 स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, कीर्तनकार शिवलीला पाटील, गायक संतोष चौधरी उर्फ दादूस, एमटीव्ही वरील स्पिल्टसव्हिला विजेता जय दुधाणे, हिंदी रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या मीनल शहा यांच्यासह अभिनेते सोनाली पाटील, स्नेहा वाघ, मीरा जगन्नाथ, गायत्री दातार, आविष्कार दारव्हेकर, सुरेखा कुडची, विकास पाटील, अक्षय वाघमारे सहभागी झाले होते.
प्रकृतीच्या कारणास्तव शिवलीला पाटील यांनी स्पर्धेतून माघार घेतली. आदिश वैद्य आणि नीथा शेट्टी यांना वाइल्ड कार्ड एंट्री मिळाली होती. मात्र ते झटपट बाहेर पडले.
 
कोण आहे विशाल निकम?
"तुमची साथ आणि माऊलींचा आशिर्वाद यामुळेच जेतेपदाचं स्वप्न साकार झालं. रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार. आईशप्पथ सांगतो, तुम्ही होतात म्हणून जेतेपदाचा करंडक उंचावू शकलो. गावातून शहरात येऊन कारकीर्द घडवणाऱ्या मुलाला तुम्ही खूप प्रेम दिलंत", असं विशालने जिंकल्यानंतर बोलताना सांगितलं.
सांगली जिल्ह्यातल्या देवखिंडी इथे विशालचा जन्म झाला आहे. गावी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर विशालने पुण्यात बीएससी आणि एमएससीचं शिक्षण घेतलं.
2018 मध्ये 'मिथुन' चित्रपटाद्वारे त्याने पदार्पण केलं. 2019 मध्ये 'धुमस' चित्रपटात काम केलं होतं. स्टार प्रवाहवरच्या 'साता जन्माच्या गाठी' चित्रपटात युवराजची भूमिका साकारली होती.
'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेत ज्योतिबाची मुख्य भूमिका साकारली होती. यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली. तब्बल 20 दिवसांत 12 किलो वजन वाढवलं होतं.
'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत शिवा काशिदची भूमिका साकारली होती. 'स्निपर' नावाच्या वेबसीरिजमध्येही विशाल झळकला होता.
विशाल व्यायाम प्रशिक्षक आहे. त्याला क्रिकेट खेळायलाही आवडतं. त्याने मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षणही घेतलं आहे. ज्योतिबाची भूमिका साकारताना त्याने सेटवरच्या साहित्यासह जिम उभारली आणि व्यायाम केला.