शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (10:19 IST)

विक्रम गोखले जेव्हा अफगाणिस्तानात खुदा गवाहच्या शुटिंगला गेले होते...

vikram gokhale
प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचं  26 नोव्हेंबर पुण्यात निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत आणि मालिकेत भूमिका केल्या होत्या.
 
त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले हे सुद्धा मराठी रंगभूमीवरचे महत्त्वाचे कलाकार होते. दुर्गाबाई कामत यांनी 1913 साली प्रसिद्ध झालेल्या मोहिनी भस्मासूर सिनेमात भूमिका केली होती.
 
विक्रम गोखले यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1945 रोजी झाला.
 
विक्रम यांच्या हिंदी-मराठी चित्रपटातील अनेक भूमिका गाजल्या . 
श्रद्धांजली
 
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले असल्याची शोकसंवेदना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
 
"मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमा जगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे.", अशा शब्दांमध्य़े फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 
 
तर विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपल्याची शोकभावना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
 
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात ते म्हणतात, "हिंदी सिनेसृष्टीतील तो लोकप्रिय मराठी चेहरा होता. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. मृत्यूवर मात करुन ते परत येतील असे वाटत होते.पण दुर्दैव. मी या महान अभिनेत्याला आदरांजली अर्पण करतो."
खुदा गवाह या हिंदी सिनेमातली त्यांची भूमिकाही विशेष गाजली होती. 
 
 30 वर्षांपूर्वी रिलीज झालेला खुदा गवाह हा त्यावेळेच्या सर्वांत लोकप्रिय हिंदी चित्रपटांपैकी एक होता.
 
या चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी आणि किस्सेही खूप रंजक आहेत.
 
या सिनेमाच्या चित्रिकरणासाठी तालिबानने सहकार्य केलं होतं. या चित्रिकरणाच्या अनुभवाबद्दल विक्रम गोखले यांनी एबीपी न्यूजला मुलाखत दिली होती.  
 
त्यात ते म्हणाले होते, “काबूलमध्ये उतरलो तेव्हा 97 ते 98 रॉकेट्सचा मारा झालेला होता, रशियन सैन्य तालिबानच्या त्यांच्या मागे लागलं होतं. अत्यंतच चांगला अनुभव होता. काबूल शहराच्या प्रमुखांनी अमिताभ यांची तिथल्या घरात सोय केली होती. आम्ही हॉटेलांमध्ये राहिलो होतो.
आम्ही जे पाहिलं ते अफगाणिस्तानचं बॉलिवूड आणि बॉलिवूडच्या कलाकारांवर प्रेम असल्याचं मला दिसलं. भारतीयांवर प्रेम करायचे तिथले लोक. प्रत्येक अभिनेत्याला गाडी आणि संरक्षण पुरवलेलं होतं. कोणालाही फारसं जवळ येऊ देऊ नका असं सांगण्यात आलं होतं.
 
मी एक दोनवेळा बाहेर गेलो होतो, तिथं चित्रिकरण पाहायला, अमिताभ यांना पाहायला भरपूर गर्दी लोटलेली असायची, लोक झाडावर चढून पाहात होते.
 
अफगाणिस्तान भारतीयांच्या बाजूने आहेत असं वाटायचं. पण वर आकाशात सतत विमानं उडत असायची. आमच्या संरक्षणासाठी एक महिनाभर त्यांनी मदत केली होती.” 
 
ते पुढे म्हणाले, तिथं एका सभागृहात झालेल्या मीटिंगला आम्हाला बोलावण्यात आलं होतं. तेव्हा अफगाणिस्तानातील लोक आणि आमची चांगली चर्चा झाली होती. आम्हाला खरंच भरपूर आनंद वाटायचा.” 
 
अफगाणिस्तानातला सर्वांत लोकप्रिय चित्रपट
या सिनेमाचे प्रोड्युसर मनोज देसाईंनी मागे एकदा बीबीसीशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, 'खुदा गवाह'च्या निर्मितीवेळी अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरू होतं.
 
"खुदा गवाहच्या युनिटच्या सुरक्षेसाठी पाच रणगाडे पुढे आणि पाच रणगाडे मागे असायचे. पण अफगाणिस्तानात अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता एवढी होती की, एवढ्या सुरक्षेची गरजही भासत नव्हती."
 
"एकदा शूटिंग सुरू असताना आम्हाला तत्कालिन विरोधी नेते बुरहानुद्दीन रब्बानी यांनी निरोप पाठवला होता. मी अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा फॅन आहे आणि फिल्म युनिटला बंडखोरांकडून कोणताही धोका नाहीये, असं त्यांनी सांगितलं होतं. अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीनं ते अमिताभ बच्चन यांना गुलाबाचं फुल द्यायला आले होते."
काबुलमधला शूटिंगचा अनुभव
हा तो काळ होता जेव्हा अमिताभ बच्चन आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची अतिशय घट्ट मैत्री होती.
 
मनोज देसाई यांनी सांगितलं होतं की, राजीव गांधी यांच्यामुळे अफगाणिस्तानमधल्या नजीबुल्लाह सरकारनं 'खुदा गवाह'च्या युनिटची खूप काळजी घेतली होती.1991 साली राजीव गांधींची हत्या झाली होती आणि 1992 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला.
 
लेखक रशीद किडवई यांनी आपल्या 'नेता अभिनेता- बॉलीवुड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स' या पुस्तकात लिहिलं आहे,
 
"दिल्लीत खुदा गवाहची लॉन्च पार्टी होती. त्या पार्टीत अमिताभ बच्चन आपले मित्र राजीव गांधींच्या आठवणीने रडले होते.
 
अफगाणिस्तानात खुदा गवाहचं शूटिंग कसं पूर्ण होईल याकडे राजीव गांधींनी कसं लक्ष दिलं होतं आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती नजीबुल्लाह यांच्याकडे वैयक्तिकरित्या सर्वांच्या सुरक्षेची हमी मागितली होती, याची आठवण अमिताभ बच्चन यांनी सांगितलं होतं."
 
रंगमंचावरुन थेट शेतीकडे
एक काळ असाही आला जेव्हा ते रंगमंच सोडून थेट शेतात जाऊन रमले. प्रसिद्ध वृत्तनिवेदक आणि मुलाखतकार प्रदीप भिडे यांच्या दूरदर्शनवरील कोर्ट मार्शल या कार्यक्रमात स्वतः विक्रम गोखलेंनी हा किस्सा सांगितला होता.
 
 गोखले म्हणाले होते की, ते कुणालाही डेझर्ट करून, वाऱ्यावर सोडून गेले नव्हते. “मी माझ्या तमाम निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, ज्यांच्यासोबत माझं काम सुरू होतं, त्यांना मी सांगितलं होतं की मी या तारखेपासून उपलब्ध नसेन. तोवर माझ्याकडून तुम्ही माझं काम उरकून घेऊ शकता.”
 
 विक्रम गोखले या मुलाखतीत नेमक्या तारखाही सांगतात - 6 मे 1982 ते 2 मार्च 1989. पण ते नेमके का निघून गेले होते?
 
“इथे मला थांबायचं नव्हतं, कारण माझ्या मते, प्रत्येक माणूस ज्याने आपला संसार आखलेला आहे, जो एका विशिष्ट क्षेत्रामध्ये त्याच्या कामाकडे त्याच्या उपजीविकेचं साधन म्हणून बघतोय, त्या व्यवसायामध्ये जर त्याच्या वेळेला, घामाला, बुद्धीला, कर्तृत्वाला त्याच्या कर्तृत्वाला आर्थिकदृष्ट्‍या काही महत्त्व नसेल, तर त्याने तिथे का राहायचं?
 “मला असं लक्षात आलं की माझ्या घामाचे पैसे किंवा कष्टाच्या, मेहनतीच्या मानाने जे काही मिळतंय, ते पैसे मला माझ्या वेळेला मिळत नसतील, त्यासाठी मला कुणाकडे हात पसरावे लागत असतील, तर अशा इंडस्ट्रीमध्ये मला राहायचं नाही. आणि म्हणून मी सगळ्यांना नमस्कार करून निघून गेलो.
 
 “मला त्या वेळेलासुद्धा दुतर्फा उभे राहून सॅल्यूट करणारे लोक होते, मी त्या सगळ्यांकडे पाठ करून निघून गेलो, याचं कारण म्हणजे अर्थशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि कलाशास्त्र यांची नीट सांगड जर बसली नाही, तर अशा तऱ्हेने निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं,” असं गोखले सांगतात.
 
 लोकांनी आपल्या कामाचे आणि हक्काचे वेळीच पैसे न दिल्याने आणि त्यासाठी वेळोवेळी त्यांना विचारणा करावी लागल्याने कंटाळून हा निर्णय घेतल्याचं गोखले सांगतात.
पण प्रदीप भिडे पुढे असाही एक प्रश्न उपस्थित करतात की अनेक निर्मात्यांची तक्रार असते की गोखले त्यांना परवडत नाहीत आणि ते कायम पैशांच्या मागेच असतात. यावरही विक्रम गोखलेंनी स्पष्टीकरण दिलं होतं. 
 
 “मी इथे काम करतो तेव्हा मी पैशासाठी काम करतो. मी कधीही असं कुणाला भासवलेलं नाही, कधीच कुणाला म्हटलेलं नाही की मी इथे कलेसाठी, कला राबवायला आलो आहे, किंवा मी शौकासाठी आलेलो आहे. मी पहिल्या दिवसापासून इथे माझ्याकडे असलेल्या कलागुणांना वाढवत नेऊन, त्यातून पैसे मिळवण्यासाठी आलोय. कारण माझा व्यवसाय आहे हा. This is a money-making industry,” असं गोखले स्पष्ट करतात.
 
 आपल्या अशाच परखड मतांसाठी विक्रम गोखले कायम चर्चेत राहिले.
 
 कधी त्यांची वक्तव्यं कलाक्षेत्राशी निगडित होती, तर कधी त्यांच्या राजकीय मतांशी आणि भूमिकांशी.
 
 अभिनेत्री कंगना राणावतने म्हटलं होतं की, भारताला स्वातंत्र्य हे 2014 साली, म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मिळालं होतं. या वक्तव्याशी सहमती दर्शवत विक्रम गोखले म्हणाले होते,
 
 “हे स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालेलं, या तिच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. हे दिलं गेलेलंय. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठेमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही. आपल्या देशांतले लोक ब्रिटिशांच्या विरुद्ध उभे राहतायत, हे पाहूनही या लोकांना त्यांना वाचवलं नाही, असे मोठे लोक आपल्या केंद्रीय राजकारणात होऊन गेले.”  

Published By- Priya Dixit