1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: अबुधाबी , गुरूवार, 17 एप्रिल 2014 (10:33 IST)

कोलकाता नाईट रायडर्सची विजयी सलामी?

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) ७ व्या सत्राच्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्सने विजयी सलामी देताना मुंबई इंडियन्सचा ४१ धावांनी दणदणीत पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयात जॅक कॅलिस आणि मनीष पांडे यांची शतकी भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. 

विजयासाठी १६४ धावा फटकावण्याचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांनी सावधगिरीने खेळत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र ४.४ षटकांत २४ धावांची भागीदारी झाली असताना सुनील नरीनने सलामीवीर मायकल हसीला त्रिफळाचीत करीत मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. १३ चेंडूंना सामोरे जाणार्‍या हसीला केवळ तीनच धावा करता आल्या. इथेच मुंबई इंडियन्सच्या पराभवाचा पाया रचला गेला. आदित्य तरेने २२ चेंडूंना सामोरे जात २ चौकार आणि १ षटकारासह २४ धावा केल्यानंतर साकीब अल हसनने त्याचा आपल्याच गोलंदाजीवर झेल टिपला. त्यानंतर अंबाती रायुडू आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ६१ धावांची भागीदारी केली, मात्र त्यांना आवश्यक धावगती राखणे जमले नाही. १६ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रोहित शर्माने षटकार ठोकून मुंबई इंडियन्सचे शतक धावफलकावर झळकावले, मात्र पुढच्याच षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा (२७) बाद झाला. त्यानंतर रायुडूही यष्टीचीत होऊन तंबूत परतला. रायुडूने ४0 चेंडूंत ४८ धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर किरॉन पोलार्ड (नाबाद ६) मैदानात उतरला, मात्र तोही अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. मुंबई इंडियन्सला निर्धारित २0 षटकांत ७ बाद १२२ धावाच करता आल्या.

तत्पूर्वी इंडियन प्रीमियर लीगच्या उद्धाटनीय सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कर्णधार गौतम गंभीर आणि जॅक कॅलीस हे सलामीला उतरले. मात्र कर्णधार गंभीरला आठ चेंडू खेळूनही एकही धाव काढता आली नाही. अखेरीस तो शून्यावर बाद झाला. लसिथ मलिंगाने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर जॅक कॅलिस आणि मनीष पांडे यांनी शतकी भागीदारी करीत कोलकाताचा डाव सावरला. या दोघांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवर हल्ला चढवताना चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. कॅलिस आणि पांडे यांची जमलेली ही जोडी मलिंगाने पांडेला त्रिफळाचीत करून फोडली. पांडेने ५३ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६४ धावा केल्या. पांडे बाद झाल्यानंतर आलेल्या रॉबिन उथप्पाला (१) झहीर खानने आल्यापावली माघारी परतवले. त्यामागोमाग कॅलिसला मलिंगाने बाद केले. कॅलिसने अवघ्या ४६ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ७२ धावांची झंझावाती खेळी केली. त्यानंतर साकीब अल हसनलाही (१) मलिंगाने स्वस्तात टिपले. युसूफ पठाण (४) आणि सूर्यकुमार यादव (१३) नाबाद राहिले. सूर्यकुमारने केवळ ५ चेंडूंना सामोरे जाताना ३ चौकार ठोकले. मलिंगाने चार बळी टिपले.