मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (22:18 IST)

पाकिस्तान विरुद्धची मॅच आणि कर्णधारपदाबाबत काय म्हणाला विराट?

भारत पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात मैदानावर भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास असल्याचं भारतीय कर्णधार विराट कोहलीनं म्हटलं आहे.
 
रविवारी 24 ऑक्टोबरला भारताचा टी20 विश्वचषकातला पहिला सामना पाकिस्तानच्या विरुद्ध आहे.
 
"आम्ही टीमबाबत चर्चा केली आहे. मात्र मी त्याबाबत आत्ताच सांगणार नाही. आम्ही अत्यंत संतुलित असा संघ तयार केला आहे. संघातील सदस्य गेल्या काही दिवसांत आयपीएलमध्ये खूप टी-20 क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळं आम्हाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे," असं विराटनं म्हटलं.
"प्रत्येक जण चांगली कामगिरी करत आहे, ही संघासाठी सकारात्मक बाब आहे. आता सर्वकाही सामन्यात मैदानावर आमची कामगिरी कशी असेल, त्यावर अवलंबून आहे. सगळ्याकडूनच चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सर्वांना जबाबदारीची जाणीवही आहे."
 
5 फलंदाज, 1 यष्टीरक्षक, 3 फिरकीपटू, 3 अष्टपैलू आणि 3 गोलंदाज अशी संतुलित रचना असलेला संघ निवडसमितीने विश्वचषकासाठी निवडला आहे. विश्वचषकात के.एल. राहुल आणि रोहित शर्मा सलामीला येतील असं कर्णधार विराट कोहलीने सराव सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान सांगितलं होतं.
 
कर्णधार पद सोडण्याबाबत काय म्हणाला?
कर्णधार म्हणून कोहलीची ही अखेरची टी-20 स्पर्धा आहे. आयपीएलदरम्यान त्यानं वर्ल्ड टी-20 नंतर कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती.
 
कर्णधार पद सोडण्याचं कारण विराटला विचारण्यात आलं. त्यावर त्यानं याबाबत बोलण्यास नकार दिल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे. वाद निर्माण करणाऱ्यांना संधी द्यायची नसल्याचं विराट म्हणाला.
 
"मी आधीच खूप स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळं यावर अधिक बोलायला हवं, असं मला वाटत नाही," असं तो म्हणाला.
 
सध्या वर्ल्ड टी-20 मध्ये चांगली कामगिरी करण्यावर लक्ष असल्याचं विराटनं सांगितलं.
 
" ज्या गोष्टी प्रत्यक्षात नाहीतच त्या उकरून काढण्याचा लोक प्रयत्न करतात. मात्र मी त्यांना संधी देणाऱ्यांपैकी नाही."
 
"मी माझ्याबाबत अत्यंत प्रामाणिकपणे बोललो आहे. तरी लोकांना याबाबत अजून काही बोलायला हवं असं वाटत असेल, तर त्यांच्याबाबत मला वाईट वाटतं," असं त्यानं म्हटलं.
 
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. आयसीसी स्पर्धेचं जेतेपद पटकावत कर्णधारपद दिमाखात सुपूर्द करण्याची संधी कोहलीकडे आहे.