गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

सेल्फीच्या वाढत व्यसनामुळे येऊ शकते अवेळी म्हातारपण

आजचा जमाना हा स्मार्ट आहे आणि त्यातच आपल्या गरजेची वस्तू बनलेला स्मार्टफोन आणि त्यातून काढले जाणारे सेल्फी हेच आपल्याला पाहायला मिळते. पण या सेल्फीच्या नादात अनेकांना आपला जीवही गमवावा लागत आहे. तर आता सतत सेल्फी काढणे तुमच्या त्वचेसाठी घातक असल्याचा खुलासा डॉक्टरांनी केल्यामुळे यापुढे तुम्ही सेल्फीचा नाद सोडला नाहीतर तुमच्या त्वचेला हानी होऊ शकते.
 
तुमच्या त्वचेवर स्मार्टफोनमधून येणार्‍या लाईट्सच्या आणि रेडिएशनच्या संपर्कात येऊन त्याचे परिणाम होतात. यामुळे तुम्हाला त्वचेचे अनेक आजार होण्याचीही शक्यता असल्याचे त्वचा विशेषज्ञ डॉक्टरांनी म्हटले आहे. एवढेच नाहीतर हातात मोबाइल घेऊन चेहर्‍याच्या ज्या बाजूचा तुम्ही सतत फोटो काढता त्या बाजूची त्वचा लवकर खराब होत असल्याचेही डॉक्टरांनी म्हटले आहे. मोबाइलच्या कॅमेरातून येणार्‍या लाईट्स आणि रेडिएशनमुळे तुमच्या चेहर्‍यावर लवकर सुरकुत्या येऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला लवकर म्हातारपण येऊ शकते, असे लंडनमधील त्वचा रूग्णालयाचे प्रमुख डॉ. सिमन झोके यांनी सांगितले आहे. त्यांनी हेही सांगितले की, ज्यांना सेल्फी काढण्याची सवय आहे आणि जे ब्लॉगर आहेत त्यांना हा धोका अधिक आहे.
 
मोबाइलमधून येणारे इलेक्ट्रो मॅगनेटिक रेडीएशन हे चेहर्‍याचे रक्षण करणार्‍या डिएनएला नष्ट करतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात. यावर मार्ग काढण्.यासाठी मोबाइलमधून येणार्‍या लाईटची तीव्रता कमी करावी लागेल. 
 
त्यामुळे त्वचेचे नुकसान होणार नाही. आता खुद्द स्किन स्पेशालिस्ट डॉक्टरांनीच हे सांगितले आहे म्हटल्यावर सेल्फी वेडय़ा लोकांनी जरा सांभाळून राहायला हवे. नाहीतर ज्या चांगल्या चेहर्‍याचे आपण फोटो काढतो, तो चेहराच चांगला राहिला नाही तर मग काय कराल? त्यामुळे सेल्फी काढण्यावर जरा आवर घातलेला बरा नाही का?