स्वारस्य या शब्दाची मूळ व्युत्पत्ती 'रस' या शब्दापासून आहे. साहित्य-सृष्टीत सरतत्त्वाला सर्वाधिक महत्त्व आहे. साहित्यामधील नवरस आणि त्यांची निर्मिती तेव्हा यशस्वीपणे कलाकार करतो तेव्हाच त्या अभिव्यक्तीला कलाकृतीचा दर्जा प्राप्त होतो, हास्य, करुण, रौद्र, वीर, जुगुप्सा, शृंगार आदि विविध रसांसोबत आता दहावा भक्तिरसही साहित्य-सृष्टीत दाखल झाला आहे.
या स्थायी भावांचा परिपोष ज्या ताकदीने कलाकार आपल्या कलाकृतीत करू शकतो तितका त्या कलाकृतीचा कस वाढत जातो. कोणतीही कलाकृती रसपूर्ण असेल तरच आस्वादकाचे स्वारस्य त्यातून टिकून राहू शकते.
स्वारस्याचा दुसरा अर्थ अर्थपूर्णता किंवा गोडी वाटणे असाही होतो. मला त्या गोष्टीत आता स्वारस्य वाटत नाही किंवा अलीकडे मला प्रायोगिक नाटकात विशेष रस वाटतो, असेही आपण म्हणतो. म्हणजेच वयपरत्वे, कालपरत्वे किंवा स्थलपरत्वे आपल्या रुचीचे विषय बदलत असतात. पूर्वी ज्या गोष्टीत आपल्याला कमालिचा रस वाटत असे त्या अलीकडे आपणांस बिल्कुल स्वारस्य वाटत नाही. असेही आपण म्हणतो.
स्वारस्य कित्येकदा आपल्या अभिरुचीवर, प्रगल्भतेवरही अवलंबून असते. एखाद्या अशिक्षित, संथ जीवन जगणार्या ग्रामस्थाला शहरी धावपळीच्या जीवनात बिल्कुल रस वाटणार नाही. त्याउलट शहरी, घाईगर्दीच्या जीवनाची सवय असणार्या व्यक्तीला खेड्यातील संथ, साध्या जीवनाचे आकर्षण वाटणार नाही. तुमची आनुवांशिकता आणि ज्या वातावरणात, परिस्थितीत तुम्ही लाहनाचे मोठे होता त्यावर तुमच्या रूचीचे विषय अवलंबून असतात.
कधी कधी जीवनासंबंधीचा तुमचा दृष्टिकोनही तुमच्या स्वारस्याचे विषय निर्धारीत करतो. तत्त्वज्ञानातील विविध विचारधारांचे अध्ययन केल्यास जीवन म्हणजे एक निरर्थक प्रवास असे मत मांडणार्यांपासून तो जीवन म्हणजे परीपूर्णतेकडे वाटचाल असे म्हणणार्यांपर्यंत विविध मतांचे प्रवाह दिसून येतात. अस्तित्ववादी तत्त्ववेत्त्यांपैकी काही विचारवंतांना जीवन निरर्थक, अगम्य, अतार्किक, दिशाहीन, निर्हेतुक वाटते. तर काही केवलवादी विचारवंतांना ते एका निश्चित अशा ध्येयाकडे वाटचाल करणारे, सहेतूक, सारगर्भ, सार्थ आणि परिपूर्ण वाटते. जीवन आनंदसागर आहे असे काही म्हणतात तर जीवन एक दु:खयात्रा आहे असे काही मानतात. जीवन असार, निरुद्देश, नि:स्वभाव, असंगत आहे असे काहींचे म्हणणे आहे. तर जीवन रसपूर्ण, आनंदमय आणि उद्देशांनी ओतप्रोत भरले आहे असे कहींचे म्हणणे आहे.
आपण कोणत्या परिप्रेक्ष्यातून जीवनाकडे पाहतो ते सर्वात महत्वाचे आहे. आपला जन्म कुठे, कोणत्या परिस्थितीत, कोणत्या आईबापाच्या पोटी व्हावा हे आपल्या हातात नाही. आपले भाऊ, बहीण, नातेवाईक आपण निवडू शकत नाही आपला मृत्यू आपल्या हातात नाही. जन्म ते मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पसरलेले हे जीवन मात्र थोडे फार आपल्या हातात आहे. येथे आपल्याला निवड स्वातंत्र्य आहे, आपल्या प्रयत्नाला वाव आहे. यश मिळाले तर त्यातून ऊर्जा घेऊन दुप्पट वेगाने कामाला लागण्याची इच्छा आहे. अपयश आले तर थोडा काळ नाऊमेद होणे हे साहजिक आहे. पण त्या अपयशामुळे खचून जायचे की पुन्हा रसरसून कामाला लागायचे हे आपल्या हाता आहे.
जीवनातील गोडी, रूची जर सतत कायम राखण्याची कला आपणास अवगत झाली तर जीवन हा एक अवघड पंथ आहे असे आपणास वाटणार नाही. जीवनातला प्रत्येक क्षण आनंदाचा ठेवा घेऊन आला आहे, असे वाटेल. प्रश्न फक्त जीवनातल्या अगदी लहान, क्षुल्लक गोष्टीतही आपणास स्वारस्य वाटते कां? हाच आहे.