सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2023 (11:30 IST)

नेल्सन मंडेला : संघर्षमय जीवन आणि रोमांचक प्रेमकहाणी

नेल्सन मंडेला 1990 मध्ये जेव्हा 27 वर्षांनंतर जेलमधून बाहेर आले तेव्हा एका महिलेनं त्यांची कडकडून गळाभेट घेतली. तिथे असलेल्या असंख्य कॅमेऱ्यांनी हा क्षण टिपला. हा फोटो पुढे अनेक वर्ष वंशभेदाच्या संघर्षाविरोधातलं प्रतिक म्हणून दाखवला गेला.
 
नेल्सन मंडेला यांना मिठी मारणारी ही महिला म्हणजे त्यांच्या पत्नी विनीफ्रेड मॅडकिजेला म्हणजेच विनी मंडेला.
 
आज नेल्सन मंडेलांचा जन्मदिन आहे. नेल्सन मंडेलांचं आयुष्य जितकं संघर्षमय आहे तितकीच त्यांची प्रेमकहाणी रोमांचक आहे.
 
विनी आणि नेल्सन मंडेला यांची प्रेम कहाणी
मंडेला जेव्हा देशद्रोहाचा खटला लढत होते, त्याच काळात विनी आणि मंडेला यांच्यातलं प्रेम फुलत होतं. तेव्हा विनी 22 वर्षांच्या होत्या आणि नेल्सन मंडेलांपेक्षा त्या 22 वर्षं लहान होत्या.
 
सामाजिक कार्यकर्त्या म्हणून विनी यांच्या राजकीय जाणिवा टोकदार होत्या. नेल्सन मंडेला यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहीलं आहे की, "मी तिच्या प्रेमातही पडत होतो आणि तिला राजकीयदृष्ट्या सक्षमही करत होतो."
 
'मंडेला यांनी मला कधी प्रपोज नाही केलं'
विनी यांनी सांगितलं की मंडेला यांनी त्यांना कधी औपचारिकदृष्ट्या प्रपोज नाही केलं. विनी यांनी सांगितलं होतं की, "एक दिवस नेल्सन यांनी रस्त्यावर चालताना मला विचारलं की तू त्या ड्रेस डिझायनर महिलेला ओळखतेस का? तू तिला जरूर भेटायला हवं. ती तुझ्यासाठी लग्नाचा ड्रेस तयार करत आहे. तू तुझ्याबाजूच्या किती लोकांना बोलावणार आहेस?"
विनी म्हणतात, "आणि या रीतीनं माझा विवाह त्यांच्याशी होणार असल्याचं मला कळवण्यात आलं. मी रागावले नाही. मी फक्त इतकंच विचारलं की कधी?"
 
लग्नासाठी सरकारची परवानगी
विनी यांनी 1983 मध्ये फिल्म निर्माता केविन हॅरिस यांना मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की त्या फक्त एका कैद्याबरोबर लग्न करत नव्हते तर त्यांच्यावर काही प्रतिबंधही लादण्यात आलेले होते. याशिवाय प्रिटोरियामध्ये त्यांच्याविरोधात खटलाही सुरू होता.
 
यासारख्या कारणांमुळे त्यांना लग्नासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागली ही. लग्नासाठी त्यांना चार दिवस मिळाले, जेणेकरून ते ट्रांसकेई इथं लग्नासाठी जाऊ शकतील.
 
हायस्कूलमध्ये शिकत असताना मंडेला यांचं नाव पहिल्यांदा ऐकल्याचं विनी यांनी बीबीसीला सांगितलं होतं. या मुलाखतीदरम्यान त्यांनी मंडेला यांच्याबरोबर असलेल्या नात्यातील अनेक पैलू उघड केले होते.
 
हायस्कूलमध्ये शिकत असताना आम्ही जगभरात सुरू असलेल्या अनेक आंदोलनांविषयी आणि संघर्षांविषयी वाचत होतो. त्याचवेळी मी त्या काळ्या व्यक्तीविषयी ऐकलं जो अन्यायाविरोधात लढत होता.
 
माझ्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून मी पहिल्यांदा त्यांना भेटले होते. ही 1957ची गोष्ट असेल. माझी ती मैत्रीण माझ्या भावाची पत्नीही होती.
 
आमची दुसरी भेट ही योगायोगानेच झाली.आम्ही एका गल्लीत भेटलो. मी त्या व्यक्तीकडे चकित होऊन पण आदराने बघत होते. ही तीच व्यक्ती होती ज्यांच्याविषयी आम्ही किती काही ऐकलं होतं.
 
तेव्हा मला माहीत नव्हतं की मी पुढे याच व्यक्तीशी लग्न करणार आहे.
 
विनी सांगतात की मंडेला यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांना आपण अधिक शक्तिशाली झाल्याचं वाटू लागलं. त्यांच्याकडूनच मी संघर्ष करायला शिकले.
 
नेल्सन आणि विनी यांचं आयुष्य
ईस्टर्न कॅप इथं 1936मध्ये विनी यांचा जन्म झाला. मंडेला यांची भेट झाल्याच्या वर्षभरातच 1958मध्ये विनी यांचं त्यांच्याशी लग्न झालं. त्यावेळेस त्या एक प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्या होत्या.
 
विनी आणि मंडेला यांचा संसार 38 वर्षं चालला. तथापि, दोघांना एकमेकांसोबत फार कमी वेळ घालवता आला. कारण लग्नाच्या तीन वर्षानंतरच मंडेला हे भूमिगत झाले होते आणि पकडले गेल्यानंतर त्यांना कैदेत टाकण्यात आलं होतं.
 
मंडेला आणि विनी या दाम्पत्याला दोन मुली झाल्या. मंडेला जेव्हा कैदेत होते, तेव्हा विनी यांनीच बाहेरच्या जगात त्यांचं आंदोलन पुढे नेलं. यामुळे त्यांनाही कैदेची शिक्षा मिळाली आणि त्यांच्या अभियानाला एक नवीन ओळख मिळाली.
 
वर्णभेदाविरोधात विनी यांचा संघर्ष आणि मंडेला यांना सतत दिलेली साथ याकारणामुळे लोक त्यांना 'राष्ट्रमाता' असं म्हणू लागले.
 
विनी आणि विवाद
तथापि, विनी यांच्या जीवनात सगळंच काही चांगलं घडलं, असं नाही. त्या अनेक वादांच्या केंद्रस्थानी राहिल्या आणि त्यांचं नाव अनेक घोटाळ्यांमध्येही आलं.
 
जेव्हा नेल्सन मंडेला हे राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांनी आपली पत्नी विनी यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिलं. पण लवकरच पक्षाचा निधी वापरण्यावरून विनी मंडेलांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. त्यांची प्रतिमा राजकीय आणि कायदेशीर रूपानं डागाळली गेली.
 
या कठीणसमयी नेल्सन मंडेला हे नेहमी त्यांच्या पाठीशी उभे होते. तरीही त्यांच्या संसाराचा गाडा पुढे चालला नाही आणि 1996मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
 
पण घटस्फोटानंतरही विनी यांनी मंडेला आडनाव कायम ठेवलं. एवढंच नव्हे तर मंडेला यांच्याशी त्यांची मैत्रीही शाबूत राहिली.
 
अनेक विवादानंतरही त्या राजकारणात सक्रिय राहिल्या. पण 2003 मध्ये फसवणुकीच्या एका प्रकरणात त्या दोषी आढळल्या आणि पद्धतीने पुन्हा एकदा त्या विवादाच्या भोवऱ्यात सापडल्या.
 
Published By- Priya Dixit