शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (09:28 IST)

संत गाडगेबाबा जयंती विशेष : गाडगे महाराजांचे विचार आजही प्रासंगिक

गाडगे महाराज यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी महाराष्ट्रात झाला होता. संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जाणोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जाणोरकर असे होते.
 
हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांची राहणी साधीसुधी आणि गरीब होती. त्यांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांचा विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये मोठा सहभाग आहे.
 
गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले. लोक प्रबोधनाचा एक भाग त्यांचे कीर्तन असायचे. सामाजिक रूढी आणि परंपरेच्या टीका त्यात असायच्या. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली.
 
गाडगे महाराजांची गोरगरीब, दीनदलित ह्यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चटन करण्यासाठी तळमळ असायची आणि त्यासाठी हे कार्यशील होते. दीन, दुर्बळ, अनाथ, अपंगांची ते नेहमीच सेवा करत असत.
 
"देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकारा कडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, मंत्र-तंत्र, चमत्कार सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." ही त्यांची शिकवण होती. माणसातच दैव आहे असे त्यांचे मत होते. ह्याचाच शोध ते घेत होते. समाज कार्यासाठी मिळालेल्या देणगीतून त्यांनी अनाथ लोकांसाठी अनाथालय, धर्मशाळा, आश्रम, विद्यालय सुरू केले. दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचा साठी देव होते. त्यांच्या सेवेमध्येच जास्तच जास्त काळ वेळ रमायचे.
 
डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेष असे.
 
त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले "देव दगडात नसून तो माणसांत आहे" हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य दिले.
 
संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत असत. आपल्या कीर्तनात ते वऱ्हाडी भाषेचा प्रयोग करत असत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’असे ते म्हणायचे. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगे महाराजांत होत्या.
 
बाबांच्या कीर्तनात संत तुकाराम महाराज आणि ज्योतिबांची शिकवण प्रवाहात दिसते. त्यांची मृत्यू दिनांक २० डिसेंबर १९५६ रोजी झाली.
 
गाडगे महाराजांचे उपदेशात्मक सुविचार
 
१. चोरी करू नका.
२. सावकाराकडून कर्ज घेऊ नका.
३. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
४. देवा धर्माच्या नवा खाली प्राणी हत्या करू नका.
५. जातिभेद, अस्पृश्यता पाळू नका.
६. श्रीमंत गरीब असा भेद करू नका.