गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By वेबदुनिया|

माळव्यातली मराठी

महाराष्ट्रात मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. पण महाराष्ट्राबाहेर रहाणाऱ्या तिथल्या 'परप्रांतीय' मराठी मंडळींनी मात्र अनेक वर्षांपासून आपली भाषा आणि संस्कृती टिकवली आहे. इंदूर हे तर मराठी भाषकांचे एक मोठे केंद्र. येथे मराठी भाषा आणि संस्कृतीची काय स्थिती आहे, ते जाणून घेऊया इंदूरकर मराठी भाषकाच्या शब्दांत......

मी इंदौर शहरातली. तसे मराठीत या शहराला इंदूर म्हणतात. पण खरं म्हणजे मला भाषाप्रमाणे कोणत्याही शहराच्या नावात बदल करणे हे काही जमत नाही.

थोरल्या बाजीरावांनी उत्तर दिग्विजयासाठी नर्मदा ओलांडली आणि या मध्य भारतात मराठी लोक पसरले. पुढे इंदूर होळकरांच्या ताब्यात गेले आणि त्यांनी महाराष्ट्रातून बर्‍याच मराठी कुटुंबांना इथे आणले. सहाजिकच मराठी टक्का या शहरात मोठा आहे. मराठी लोकवस्ती किमान 30 टक्के तरी असावी.

पूर्वी हे प्रमाण निम्म्यापेक्षा जास्त होते, असे म्हणतात. पण इंदूरच्या समृद्धीमुळे बाहेरून येथे खूप लोक आले. त्यामुळे येथेही मराठी टक्का कमी झाला. येथील रामबाग हा येथील जुना मराठी इलाका. होळकरांचा जुना राजवाडा गावाच्या अगदी मध्यवर्ती भागात आहे. तेथे लागूनच रामबाग आहे. या भागात वाडे बरेच होते. आता वाडे पाडून इमारती बांधल्या जाऊ लागल्या आणि मुंबईतील मराठी माणूस जसा उपनगरात गेला अगदी तशीच स्थिती येथील मराठी मंडळींचीही झाली. त्यामुळे आता नारायण बाग या भागात काही मराठी मंडळी रहातात. बाकी लोकमान्य नगर, राजेंद्र नगर, सहदेव नगर, टिळकनगर या भागांमध्ये मराठी मंडळी रहायला गेली आहेत. या भागात गेल्यास कानावर मराठी पडू लागते.

इथे असेही म्हणतात, की इथल्या प्रत्येक सार्वजनिक स्थळावर म्हणजे घरातून बाहेर पडल्यावर अशी जागा सापडणार नाही जिथे मराठी माणूसे नसेल. इथे मराठी लोक रहातात हे लक्षात येण्याचा आणखी एक निकष म्हणजे कुठेही उभे राहिलं तरी ऐकू येणारे ‘इंदौरच्या मराठी’तील संभाषण. आपल्या समोरची व्यक्ती आपल्या बरोबर असलेल्या माणसांची मराठी काहीतरी संभाषण करताना आढळणे ही इथे ‘आम’ बात आहे. इथले मराठी लोक मराठी माणसांशी मराठीतचं बोलतात. पण हे सर्वांना लागू पडतं असं म्हणणेही चुकीचं ठरेल. कारण येथे आपसात मराठी संभाषण करणारे देखील आपोआप एका वर्गात वाटले गेले आहे. उदा. सध्याची तरूण पिढी घरात मोठ्यांशी मराठीत बोलत असली तरी भाऊ- बहीणींशी मराठीतचं बोलतं असतील याची खात्री देता येत नाही. कारण स्पष्ट आहे, शिक्षणातील भाषेचा म्हणजे हिंदी, इंग्रजीचा मातृभाषेवर ताबा झाला आहे. तरीही मराठी मेली नाहीये. आजही घरोघरी एखाद्या लहान पोराच्या तोंडून तुम्हाला प्रथम मराठी शब्दचं बाहेर पडताना ऐकू येतील. त्या शिवाय दोन मराठी माणसांमध्ये एखादा स्थानिक हिंदी भाषक घुसला की ही टिप्पणी ऐकायला मिळेलच, ‘बस अब दो मराठी लोग मिल गये अब तो मराठी मी ही बात करते बैठेंगें।

आपली भाषा, संस्कृती जिंवत ठेवण्यासाठी काही संघटनांचे प्रतत्न चालूच असतात. ज्यात नियमित नाटकं, चित्रपट, गाणी, कीर्तन, अभंग व इतर काही कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमांमध्ये ही मोठ्या प्रमाणात लोकं आपली उपस्थिती नोंदवतात. महाराष्ट्रातील लोक जेवढ्या आव़डीने अशा कार्यक्रमांना जातात, तेवढे प्रमाण इथे नसेल, पण तरीही हे प्रमाण लक्षणीय आहे.

इथल्या हिंदीची जशी वेगळी चव तशीच मराठीचीही आहे. माळव्यातील मराठी बोली भन्नाट आहे. येथील लोकांच्या मराठी बोलण्यात हिंदी शब्द येणं ही 'आम' बात आहे. येथे लोक छान किंवा मजेत नसतात, तर 'बढिया' असतात. इंदूरमध्ये मराठी भागात पत्ता शोधत असताना 'थोडं पुढे जाऊन डावीकडे 'मुडा' असं ऐकू आलं नाही तर आश्चर्य वाटू देऊ नका. एकारान्ती क्रियापदांची इंदूरी आवृत्ती खाशी आहे. म्हणजे जाईल्ले, करील्ल्ये खाईल्ल्ये, अशी क्रियापदे नीट लक्ष देऊन ऐकली तर ऐकू येतात. जाशील ना, करशील ना या प्रकारच्या अंत्य शब्दांचा वळणदार पण छान वाटणारा उच्चारही येथील लोक करतात. इथल्या मराठी बोलीने हिंदी ताल धरला आहे. म्हणजे नहीं करेंगेच्या तालावर 'नाही करणार' असं म्हटलं जातं. असंच नाही आहेचं, आहे नाही होतं. वास्तविक हे इथे लिहिण्यापेक्षा ते ऐकण्यात मजा आहे.

या मराठीला मुंबई, पुण्याचे लोक धेडगुजरी असं म्हणतात. पण ते चुकीचं आहे. इथल्या मराठीवर हिंदीचा प्रभाव अपरिहार्य आहे. उलट अनेक मराठी कुटुंबाच्या पिढ्या येथे जाऊनही ती मराठी बोलतात, हे विशेष आहे. हिंदीच्या आधाराने का होईना पण मराठी टिकून आहे. इथले मराठी लोक साहित्यातही पुष्कळ आहे. त्यांच्या मराठी लेखनातही हिंदी शब्द असतात. भाषकदृष्ट्या आपल्याला ती चुक दिसेल. पण माझ्या मते हे लोक मराठीत साहित्य निर्मिती करतात हे जास्त महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात मराठी विविध पदरी असताना इंदूरमध्ये ती वेगळे रूप घेऊन जिवंत आहे.

मराठी मंडळी कुठेही गेली तरी त्यांचे काही गुण अगदी सारखे आहेत. त्यामुळे येथील मराठी मंडळीही प्रामुख्याने नोकरी क्षेत्रात आहेत. येथील कुठल्याही शाळेत गेल्यास किमान चाळीस ते पन्नास टक्के शिक्षक वर्ग मराठी आहे. कॉलेजांमध्येही तीच परिस्थिती. डॉक्टर मंडळीतही मराठी लोकांचे प्रमाण बरेच आहे. याशिवाय इतर खासगी सेवा क्षेत्रातही मराठी लोक बरेच आहेत. त्यामुळे बाहेर पडल्यानंतर मराठी ऐकू येणे ही नवलाची बाब रहात नाही. (इतर हिंदी भाषक क्षेत्रात असे वाटू शकते.) त्यातच मराठी माणसांचे आणखी एक क्वालिफिकेशन म्हणजे प्रामाणिकपणा. त्यामुळे नोकरी देणाऱ्यापुढे मराठी, पंजाबी, राजस्थानी, बिहारी वा इतर कुठलाही हिंदी भाषक आल्यास तो प्राधान्य मराठी माणसालाच देतो. कारण तो प्रामाणिक असतो. आपलं काम भले आणि आपण भले असा त्याचा एटिट्यूड असतो. आणि आपल्याकडून शिकून दुसरीकडे जाऊन स्वतःचा उद्योग सुरू करेल अशी सुतराम शक्यता नसते. थोडक्यात येथील मराठी माणूस हा अपवाद वगळता नोकरदारच आहे.

आणि मुंबईत उत्तर भारतीयांविरोधात झालेल्या आंदोलन येथील लोकांसाठी मात्र चर्चेतील विषय सोडून याहून जास्त महत्वाचा असेल मला तरी वाटतं नाही. याबद्दल एखाद्या महाराष्ट्रातील माणासाला जेवढा ‘जुडाव’ असेल तेवढा येथे जन्माला आलेल्या माणसाला असेल असे जाणवतं नाही.