तुमचे हास्य हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. सहाजिकच खळाळत्या हास्यात दातांचे महत्त्वही आहे. म्हणूनच तर हसतील त्याचे दात दिसतील अशी म्हण आहे. हसताना दात दिसावेत, पण ते अस्वच्छ, किडलेले असतील तर हे 'दात काढणे' महागात पडू शकते. आपल्याबद्दल अनेकांची मते बदलूही शकतात. त्यामुळे दातांच्या सौंदर्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
दातांचे सौंदर्य त्यांच्या स्वच्छतेवर तसेच चमकदार असण्यावर अवलंबून असते. जेवणात, चेहर्याचे सौंदर्य वाढविण्यात व मोहक हास्यांत दातांचे योगदान मोठे आहे. दातांचे त्रास उद्भवू नये म्हणून त्यांच्या स्वच्छतेकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक ठरते. अन्यथा दातांचे किडणे तसेच श्वासातील दुर्गंध यासारखे त्रास उद्भवू शकतात.
दातांकडे दुर्लक्ष केल्याने तोंडात किटाणूंचे प्रमाण वाढते. किटाणूंची उत्पत्ती हेच दात किडण्याचे प्रमुख कारण असते. दातांमध्ये तसेच हिरड्यांमध्ये जमा झालेल्या मळाने किटाणूंची उत्पत्ती होते. हेच किटाणू जेवण्यात असणार्या साखरेसोबत एसिड बनविते. दातांच्या किडण्यामुळे दात पडण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे हिरड्यांमधून रक्त येण्याचे प्रमाणही वाढते. यात हिरड्या व दात यांच्यात खाद्यपदार्थ अडकून राहिल्यामुळे हिरड्यांवर सूज येते व त्यातून रक्त निघू लागते.
दात किडण्याची कारणे
दातांच्या आजारामागे मुख्यत: मिठाई, चॉकलेट, जंकफूड, फास्टफूड, कोल्ड ड्रिंक्स यांचे अतिसेवन, दातांची नियमित स्वच्छता न ठेवणे, खाल्लेले पदार्थ दातात अडकून राहणे ही कारणे असू शकतात. खाल्लेले पदार्थ दातांमध्ये अडकून राहिल्याने पदार्थ किडतात व हेच किडलेले पदार्थ पोटात गेल्याने पचनशक्ती कमी होऊन भूकही कमी होते. तसेच कंठ, टाळू, व जिभेचे विकार जडतात. दातांकडे वेळेवर लक्ष दिले नाही तर दातांमध्ये पू होऊन पायरिया नावाचा आजार होऊ शकतो. अशावेळी तोंडातून असह्य दुर्गंध येऊ लागतो.
दातांची काळजी कशी घ्यावी? आजारापासून वाचण्यासाठी दातांची व्यवस्थित काळजी घ्यावी. दात वेळोवेळी स्वच्छ करावेत. खूप जास्त गरम किंवा खूप थंड पदार्थांचे सेवन करू नये. जेवणानंतर सॅलड खावे. त्यामुळे दातांमध्ये अडकून राहिलेले कण निघून जातात. कोणतेही गोड पदार्थ खाल्ल्यानंतर अवश्य चूळ भरावी. रोज सकाळी उठल्यानंतर वरा्त्री झोपण्याअगोदर दात स्वच्छ करावेत.