शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (10:52 IST)

तुम्ही देत राहा तो कधीच काही कमी पडू देत नाही....

एक माणूस असतो तो एवढा गरीब असतो की त्याला दोन वेळेचे अन्न देखील नीट मिळत नसते. तो एका ठिकाणी बसलेला असतो तेंव्हा त्याच्या समोरून एक तपश्चर्या केलेले मोठे साधू महाराज चाललेले असतात तो त्यांना बघून म्हणतो, महाराज तुम्ही तर खूप महान साधू दिसत आहात मला सांगा माझ्या नशिबात नक्की काय लिहले आहे मला दोन वेळची नीट भाकरी सुद्धा खायला मिळत नाही आणि आयुष्यात नुसते दुःखच दुःख आहे.
 
तेंव्हा महाराज म्हणतात ठीक आहे, आणि ते डोळे बंद करून थोडी साधना करतात काही वेळानंतर डोळे उघडल्यानंतर ते त्या माणसाला सांगतात इथून पुढे तुझ्या आयुष्यात मोजून फक्त 20 भाकरी लिहल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त तुला आयुष्यात काही मिळणार नाही. 20 भाकरी मिळतील पण त्यानंतर तू राहशील नाही राहणार हे मी सांगू शकत नाही. तेंव्हा तो माणूस म्हणतो, महाराज तुम्ही एवढे ज्ञानी आहात, विद्वान आहात, तुम्ही एवढे भविष्य बघता तेंव्हा असे काहीतरी करा की या 20 च्या 20 भाकरी मला एक साथ आत्ता मिळायला हव्या. कारण मी आतपर्यंत एक साथ कधी दोन भाकरी सुद्धा बघितल्या नाहीत.
 
तेंव्हा महाराज म्हणतात, अरे तुला या 20 भाकरी मिळून तर जातील पण नंतर तुझ्या आयुष्यात काहीच नाहीये. या शेवटच्या 20 भाकरी असणार आहेत. तेंव्हा तो माणूस म्हणतो महाराज ठीक आहे नंतर काही नाही मिळाले तरी चालेल, पण आत्ता 20 भाकरी मिळाल्या तर बरं होईल. तेंव्हा ते साधू महाराज म्हणतात ठीक आहे. आणि कसेतरी ते आपल्या शिष्यांची मदत घेऊन त्या माणसासाठी 20 भाकरींची व्यवस्था करतात आणि त्याला सांगतात या तुझ्या वाट्याच्या राहिलेल्या 20 भाकरी आहेत. आणि असे बोलून ते महाराज निघून जातात.
 
आता तो माणूस त्या भाकरी खायला सुरुवात करतो. तो खूप खुष असतो, ज्याने 2 भाकरी कधी एक साथ खाल्ल्या नाहीत त्याला एकदम 20 भाकरी मिळालेल्या असतात. मग ती अर्धी भाकर खातो, नंतर एक भाकर खातो, नंतर 2 खातो. आयुष्यात त्याने एवढे जेवण कधीच केलेले नसते. 2 भाकरी खाल्ल्या नंतर त्याचे पोट भरते. आता पोट भरल्यानंतर तो विचार करतो की या राहिलेल्या 18 भाकरींचे मी काय करू? तेंव्हा तो बघतो की एक त्याच्या सारखाच माणूस समोरून चाललेला असतो. तो सुद्धा खायला काही मिळते का याच्या शोधात असतो मग तो त्या दुसऱ्या माणसाला म्हणतो की आज माझ्याकडे 18 भाकरी आहेत त्यातल्या दोन तू घे.
 
जसे तो त्या गरीब माणसाला दोन भाकरी देतो, तो दुसरा माणूस  पळत पळत जातो  आणि त्याच्या आसपासच्या गरीब लोकांना सांगतो की त्या माणसाकडे आज भाकरी आहेत. तेंव्हा ते सगळे गरीब त्या माणसाकडे येतात मग तो राहिलेल्या सगळ्या भाकरी त्या गरीब लोकांमध्ये वाटतो. काही वर्षे उलटल्या नंतर ते जे साधू महाराज असतात ते त्याच रस्त्याने चाललेले असतात. ते विचार करतात मी काही वर्षांपूर्वी इथे एका माणसाला 20 भाकरी दिल्या होत्या, ज्या त्याच्या नशीबातल्या शेवटच्या भाकरी होत्या. आता बघू तरी त्या माणसाचे काय हाल आहेत?
 
ते जेंव्हा त्या जागेजवळ येतात तेंव्हा ते बघतात तर तो माणूस खूप मोठा धनवान झालेला असतो, त्याने तिथे खूप मोठा मांडव घातलेला असतो, तिथे हजारो लोक जेवत असतात. जेवणामध्ये सुद्धा स्वादिष्ट पक्वान्न असतात. ते साधू महाराज एकदम हैराण होतात. ते त्या माणसाजवळ येतात आणि विचारतात हे कसं झालं? तुझ्या हाताच्या रेषांवर, तुझ्या मस्तकावर फक्त 20 भाकरी लिहल्या होत्या, याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काहीच नव्हते. पण आज तर तू धनवान झालास. तुझ्यामुळे आज हजारो लोक जेवत आहेत.
 
तेंव्हा तो माणूस म्हणतो, महाराज जेंव्हा तुम्ही मला 20 भाकरी देऊन गेलात तेंव्हा त्यातल्या मी फक्त दोनच भाकरी खाऊ शकलो मग बाकीच्या 18 भाकरी मी माझ्या सारख्याच गरीब लोकांना वाटल्या. आणि जसे मी भाकरी वाटल्या माझ्याकडे अजून लोक जेवण घेऊन येऊ लागली जसे तुम्ही मला 20 भाकरी दिल्या होत्या तसेच बाकीचे लोक सुद्धा मला जेवण देऊ लागली. परत मी त्यातले थोडे खायचो आणि बाकीचे वाटायचो आणि असे करत करत लोक माझ्याकडे जेवण घेऊन यायची आणि एक दिवस एवढे जेवण आले की मी खाऊन सुद्धा शंभर लोकांना वाटू शकलो.
 
जेवढे मी वाटू लागलो त्याच्या कित्येक पटीने जेवण माझ्याकडे येत गेले. माझं हे काम बघून काही मोठ्या लोकांनी मला घर घेऊन दिले. त्यांनीच मला व्यवसाय चालू करून दिला. माझा व्यवसाय माझी बायको बघते. आणि मी दिवसभर हे जेवण वाटायचे काम करतो. आज हजारो लोक रोज जेवण करतात. मला माहित नाही कुठून हे येतं. पण जेवढे जास्त मी वाटतो त्याच्या अनेक पटीने माझ्याकडे येतं. मित्रांनो हा निसर्गाचा सर्वात मोठा नियम आहे. जेवढे तुम्ही दुसऱ्याला देता निसर्ग तुम्हाला अनेक पटीने देतोच देतो आणि हा नियम शंभर टक्के काम करतो.
 
तरी तुमच्या नशिबात ठराविक गोष्टी लिहल्या असतील पण तुम्ही देण्याचे कर्म सतत करत असाल तर तुमच्या नशिबात लिहलेल्या गोष्टींपेक्षा 10 पट जास्त तुम्हाला मिळते आणि हे मी स्वतः अनुभवातून सांगत आहे. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की द्यायचे म्हणजे  फक्त पैसे द्यायचे पण तसे नाहीये. तुमच्याकडे देण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. तुम्ही तुमच्याकडे असलेले एखादे कौशल्य शिकवू शकता. तुम्ही एखाद्याला चांगले मार्गदर्शन करू शकता. तुम्ही एखाद्याला आधारासाठी तुमचा खांदा देऊ शकता. तुम्ही एखाद्याला त्याच्या संकट काळात धीराचे दोन शब्द देऊ शकता.
 
काही जमत नसेल तर एखादे छानसे हास्य तर देऊ शकता. मित्रांनो एक लक्षात ठेवा जेंव्हा जमिनीमध्ये आपण बी पेरतो तेंव्हा झाडाला यावच लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. तसेच ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टी द्यायला सुरुवात करता निसर्गाला तुम्हाला द्यावेच लागते हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपली अपेक्षा असते आपण ज्याला मदत केली त्यानेच आपली मदत केली पाहिजे. आणि मग आपण म्हणतो मी त्याला एवढी मदत केली आणि नंतर त्याने धोका दिला.
 
तर मित्रांनो जरुरी नाही की ज्याला तुम्ही मदत केली त्याच्याकडूनच तुम्हाला काही मिळेल, ते वेगळ्या रुपात सुद्धा मिळू शकते. जसे तुमचे ऑफिस मध्ये प्रोमोशन होईल, तुमच्या मुलांना चांगली शाळा मिळेल, तुमची अडकलेली कामे पटापट व्हायला सुरुवात होईल. पण तुम्ही वाटले की तुम्हाला मिळणार हे निश्चित. अजून एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते ती म्हणजे स्वतःचे नुकसान करून दुसऱ्यांना काही देऊ नका. त्या गरीब माणसाने आधी स्वतःचे पोट भरले आणि मग राहिलेले दुसऱ्यांना वाटले. तसेच तुम्ही सुद्धा स्वतःचे नुकसान होऊ न देता दुसऱ्यांची मदत करा. म्हणून जो माणूस देणारा असतो त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही.
 
-सोशल मीडिया