सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By अभिनय कुलकर्णी|

मुंबईवरील हल्लाः काही प्रश्न

PTIPTI
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची तुलना अमेरिकेतील ९-११ च्या हल्ल्याशीच करता येईल. मुंबई यापूर्वीही अतिरेक्यांचे 'टार्गेट' ठरली आहे. पण यावेळी मात्र अतिरेक्यांनी अमानुषतेचा कहर गाठल्याचे दिसते. अंदाधुंद गोळीबाराची नवी हल्ला पद्धती यावेळी अवलंबण्यात आली. शिवाय हॅंड ग्रेनेडही पोलिसांच्या दिशेने फेकण्यात आले. सीमेवर लढल्या जाणार्‍या युद्धासारखीच ही परिस्थिती होती. कालच्या रात्री मुंबईत जे काही घडलं त्यावरून या देशात कुणीही सुरक्षित नाही हा संदेश गेला. जणू मुंबई अतिरेक्यांच्या ताब्यात होती, असं चित्र होतं. देशाची सुरक्षा, गुप्तचर यंत्रणा या खिळखिळ्या झाल्या हे तर गेल्या काही महिन्यातल्या बॉम्बस्फोट मालिकेवरून स्पष्ट झालंच आहे. पण या हल्ल्याने त्या हतबल झाल्याचंही दिसलं. अर्थात हे सगळं झालं तरी हे घडविणारे कोण आहेत? त्यांनी हे का घडवलं असावं? त्यांचे हेतू काय? या सगळ्यांचा छडा लावण्याचं मोठं आव्हान सुरक्षा यंत्रणेसमोर आहे.

डेक्कन मुजाहिदीन
सध्या तरी या हल्ल्याची जबाबदारी 'डेक्कन मुजाहिदीन' या संघटनेनं घेतली आहे. या संघटनेचं नाव पहिल्यांदाच समोर येते आहे. इंडियन मुजाहिदीनशी त्याचे काही संबंध आहेत काय किंवा तिचीच ती उपशाखा आहे काय याचा शोध घ्यावा लागणार आहे. सरकारने अल्पसंख्याक समुदायाला त्रास देणे थांबवावे व आम्हाला आमचे राष्ट्र द्यावे अशी या संघटनेची मागणी असल्याचे तिने पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. याचा अर्थ काय?

विशी-बाविशीचे तरूण
गोळीबार करणार्‍या काही अतिरेक्यांची जी छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत, त्यावरून ते विशी-बाविशीतील तरूण असल्याचं दिसतंय. एवढ्या लहान वयातील मुलांना एवढा हिंसाचार करायला कसे प्रवृत्त केले गेले असेल? त्यासाठी त्यांच्या मनात काय भरवलं असेल? निर्घृणपणे या मुलांनी बंदुका कशा चालवल्या असतील? त्यांना भडकावणारे कोण आहेत? याचा शोध आता घ्यावा लागणार आहे.

हल्ल्याची वेळ
हल्ल्यासाठी सीएसटी व कुलाबा हा गर्दीचा परिसर निवडण्यात आला. पण हल्ल्यासाठी रात्रीची वेळ निवडण्याचे कारण कळत नाही. अर्थात, या काळात गर्दी तुलनेने कमी असली तरी अंधारामुळे पळून जाण्याची संधी मिळू शकते हा हेतू कदाचित असू शकतो. ताज व ओबेरॉय हॉटेल निवडण्यामागे इतर देशांना 'योग्य तो' संदेश देण्याचा अतिरेक्यांचा मनसुबा असू शकतो. विशेषतः हॉटेलमधील ओलिसांमध्ये त्यांनी अमेरिकी व ब्रिटनच्या नागरिकांची केलेली पृच्छा ही त्या देशांवरील रागापोटी असू शकते.

अंदाधुंद गोळीबा
अतिरेक्यांनी बॉम्बस्फोटांची परंपरागत पद्धतही बदलून एके-४७ मधून अंदाधुंद गोळीबार करण्याचा मार्ग स्वीकारला. शिवाय हॅंड ग्रेनेड पोलिसांवर फेकण्यापर्यंत त्यांची मजल गेली. अंदाधुंद गोळीबार करण्यामागे दहशत पसरविण्याचा हेतू दिसून येतो. शिवाय गोळीबार केल्यानंतर पसरलेल्या गोंधळात पळून जाण्याचीही संधी साधण्याची शक्यताही दिसून येते.

शस्त्रे कोठून आली?
हे अतिरेकी बोटीतून अलिबागच्या किनार्‍यावरून आल्याचे समजते. अलिबागला ते कुठून आले? दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानने काही भारतीय मच्छिमारांना सोडून दिले. त्यांच्या मार्फत तर ते देशात घुसले नसावेत? शिवाय एके-४७ रायफल, हॅंड ग्रेनेडसारखा दारूगोळा त्यांनी कुठून मिळवला? (खरं तर कुणी पुरवला?) तो त्यांनी मुंबईपर्यंत कसा आणला? त्यांना कुणी मदत केली? हे सगळे मुंबईला आणेपर्यंत कुणालाच कसे कळले नाही? हे अनुत्तरीत प्रश्न आहेत.

गोंधळाचा मुद्द
या अतिरेक्यांपैकी काहींची जी चित्रे प्रकाशित झाली आहेत, त्यातील एकाच्या मनगटावर लाल धागा असल्याचे दिसते. सामान्यपणे असा धागा हिंदू बांधतात. हा हल्ला हिंदू संघटनांनी केला असावा अशी समजूत करून देण्यासाठी हातावर मुद्दाम लाल धागा बांधण्याचा विचारही त्यामागे असू शकतो.

मुंबईच का?
हल्ल्यासाठी मुंबई निवडण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण अर्थात मुंबईचे देशात असलेले महत्त्व हेच आहे. देशाची आर्थिक राजधानी जेवढी म्हणून दुर्बल करता येईल तेवढी करण्याचा अतिरेक्यांचा डाव आहे. त्यामुळेच देशभरात इतरत्र बॉम्बस्फोट होत असताना
मुंबई मात्र शांत होती. मात्र ही शांतता वादळापूर्वीची होती हे आता सिद्ध झाले आहे. दुर्देवाने मुंबई पोलिसांनीही देशातील इतरत्र झालेल्या स्फोटांमधून धडा घेतला नाही आणि गाफील राहिले. एवढा मोठा कट रचून तो अमलात येईपर्यंत पोलिसांना त्याची खबरही लागली नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल.

नेभळट सरका
दहशतवादाच्या बाबतीत केंद्र सरकारचे धोरण नेभळटपणाचे आहे हा संदेश लोकांपर्यंत गेला आहे. सरकारचे गृहमंत्री बोलभांडपणा तेवढा करतात बाकी त्यांच्याने काहीही होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मंत्रिपदाची वस्त्रे उतरवून ठेवण्याखेरीज त्यांच्यापुढे पर्याय नाही. अर्थात, त्यांनी राजीनामा दिला तरी आपण सुरक्षित नाही ही सामान्यांच्या मनातील भावना दूर होणार नाही. त्यासाठी ठोस कारवाईचीच गरज आहे. बघूया सरकार तशी पावले उचलते की नाही ते? नाही तर तोपर्यंत दुसरा हल्ला कुठेतरी होईलच.