शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 6 जुलै 2021 (17:57 IST)

खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन केलंय- देवेंद्र फडणवीस

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला  सुरूवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी व विरोधक समोरा-समोर आले, एवढच नाही तर अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. यावरू आज भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. परिणामी भाजपाने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. असं फडणवीस म्हणाले आहेत.
 
विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलाताना फडणवीस म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं. आम्ही हे सरकार अपयशी ठरलं हे दाखवून दिलं. सरकारनं खोटे आरोप लावून १२ आमदारांना निलंबित केलं आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आम्ही हा मुद्दा लावून धरणार. आत्तापर्यंत नेहमीच असे प्रकार घडले परंतु कुणी कधी निलंबित झालं नाही. एकाही भाजपाच्या सदस्यानं शिवी दिली नाही. शिवी देणारे कोण होते हे सगळ्यांनी बघितलंय, शिवसेनेचे सदस्य होते त्यांनी धक्काबुक्की केली. आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांच्याशी सर्वांच्यावतीनं क्षमा मागितली व तो विषय संपवून बाहेर आलो. पण आमच्या आमदारांच्या निलंबनासाठी स्टोरी रचण्यात आली.