रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified रविवार, 18 जुलै 2021 (17:30 IST)

Mumbai Rain: मुंबईत पावसाळी दुर्घटनांमध्ये 20 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चेंबूर भागात घराची भिंत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं.वाशी नाका, न्यू भारत नगर माहुल इथे ही दुर्घटना घडली.
 
रात्री एकच्या सुमारास हा दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे झाड पडून भिंतीवर कोसळलं आणि भिंत पडली.
 
विक्रोळी इथे पावसामुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. विक्रोळी मधल्या सूर्या नगर, पंचशीळ चाळ भागात ही दुर्घटना घडली आहे. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
रात्री पावणेतीनच्या सुमारास सतत पडणाऱ्या पावसामुळे दरड कोसळून ही दुर्घटना घडली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी बचावाचं कार्य करत आहे. पावसामुळे दरड कोसळून 15-20 झोपड्यांचं नुकसान झालं आहे. ढिगाऱ्याखाली काही माणसं अडकली असण्याची शक्यता आहे.
 
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्य आणि केंद्राची मदतीची घोषणा
चेंबूर आणि विक्रोळी येथील घटनेविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येईल, असं त्यांनी जाहीर केलं आहे. 
 

तर दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये केंद्र सरकारतर्फे देण्यात येणार आहेत. जखमींना 50,000 रुपये प्रत्येकी देण्यात येणार आहेत, असं पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलं.
 
दरम्यान चेंबूर आणि विक्रोळी दुर्घटनेत जीव गमावलेल्या घटनेसंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला.
 
"मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत अनेक लोकांनी जीव गमावल्याचं वृत्त वेदनादायी आहे. पीडितांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. बचावकार्यातून अडकलेल्या माणसांची सुटका केली जाईल," असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
 

प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या घटना घडताहेत - विरोधकांचा आरोप
प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या घटना घडत आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.त्यांनी म्हटलं, "चेंबूरमध्ये भिंत कोसळून,विक्रोळीत घर कोसळल्याने जीवितहानी झाली. काही जखमी झाले. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.
 
"आम्ही बोललो कि राजकारण करतो, असे म्हणाल. पण, पावसाळा आला की, असे हकनाक बळी अजून किती दिवस जाणार आहेत?"तर मुंबई महापालिका या घटनेची चौकशी करेल, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
 
ते म्हणाले, "जे लोक धोकादायक परिस्थितीत राहत आहेत, त्यांना कायमस्वरुपी सुरक्षित हलवण्यासंदर्भातला निर्णय आम्ही घेऊ. मुंबई महापालिका या घटनेची चौकशी करेल."
 
घरांमध्ये पावसाचं पाणी
कांदिवली पूर्व भागात हनुमान नगर भागात पावसाचं पाणी अनेक घरांमध्ये घुसलं आहे.सायन,किंग्जसर्कल, लालबाग,प्रभादेवी या सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.
 
आयएमडीने रात्री वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस बरसला आहे.
 
रात्रभर झालेल्या पावसामुळे दादर,परळ,सायन,कुर्ला,भांडुप या ठिकाणी पाणी साचल्याने सीएसटी-ठाणे सेवा स्थगित करण्यात आली आहे.ठाणे ते कल्याण आणि त्यापुढील मार्गांवरील सेवा सुरू आहे अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. पावसामुळे सीएसटी-वाशी रेल्वे सेवाही बंद करण्यात आली आहे.
 
जोरदार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे.मुंबई-जालना, मुंबई-पुणे(, मुंबई-मनमाड, मुंबई-मडगाव, मुंबई-कोल्हापूर या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.अनेक ट्रेन्सच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
 
लांब पल्ल्याच्या अनेक ट्रेन्स नाशिक,मनमाड, पुणे,इगतपुरी, देवळाली,भुसावळ,दादर, दिवा इथे नियंत्रित करण्यात आल्या आहेत.
 
भारतीय हवामान के.एस.होसाळीकर यांनी ट्वीट करून दिलेल्या माहितीनुसार, "रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी भरलं आहे.अतिशय अल्प कालावधीत विक्रमी स्वरुपाचा पाऊस झाला आहे.महानगरपालिका आणि राज्याचा आपात्कालीन विभाग यांनी पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांना मदत पुरवण्याचं काम सुरू केलं आहे".
 
18 जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजता सांताक्रुझ इथे 217.5 मिलीमीटर, कुलाबा इथे 178 , महालक्ष्मी इथे 154.5, वांद्रे इथे 202, जुहू विमानतळ 197.5, मीरा रोड 204, दहिसर 249.5, भायंदर इथे 174.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
 
बोरिवली पूर्व भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
पुढील 24 तासांसाठी मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पावसाच्या बरोबरीने गडगडणे आणि वेगवान वाऱ्यांचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
सखल भागात पाणी भरण्याची शक्यता आहे. भरतीच्या वेळी काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.पावसामुळे रस्ते वाहतुकीला फटका बसण्याची शक्यता आहे.