गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 29 मार्च 2022 (13:14 IST)

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन मेट्रोचे हे दोन मार्ग होणार सुरू

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांचा प्रवास आता आणखी सूकर होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील मेट्रोचे दोन मार्ग सुरू होणार आहेत. मुंबई मेट्रो 7 अंधेरी - पूर्व ते दहिसर आणि मेट्रो - 2 अ डीएनए नगर ते दहिसर या दोन मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहे. 
 
दोन्ही मेट्रोची अपेक्षित कामे जवळपास पूर्ण झाली आहे. तसेच मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून आवश्यक प्रमाणात प्राधिकरणाला प्राप्त झाले आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांचे गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सोबतच उद्घाटन कार्यक्रमात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली.
 
मेट्रो 7 अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व पर्यंत 16.475 किमी लांबीवर पसरली आहे. या मार्गावर एकूण 13 मेट्रो स्टेशन येत आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गावर हा मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गिकेच्या बांधकामाला लागणारा खर्च 6 हजार 208 कोटी रुपये इतका आहे. यामध्ये दहिसर पूर्व ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा अँड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, महानंद, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी पूर्व अशी 13 स्थानके असणार आहे.
 
मेट्रो 2-ए डीएन नगर ते दहिसर पर्यंत एकूण 18.589 किमी लांबीवर पसरली आहे. या मेट्रो मार्गात एकूण 17 मेट्रो स्टेशन येणार आहेत. या मार्गिकेच्या बांधकामाला लागणारा खर्च 6 हजार 410 कोटी रुपये इतका आहे. यात आनंदनगर, ऋषी संकुल, आयसी कॉलनी, एकसर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीनगर, कामराजनगर, चारकोपर, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्कसह एकूण 17 स्थानके असणार आहेत.
 
या दोन्ही मेट्रो मार्गांचे भूमिपूजन ऑक्टोबर 2015 ला झाले होते. तर प्रत्यक्षात कामाला 2016 मध्ये सुरुवात झाली होती. दोन्ही मार्गांवरील सीएमआरएसच्या पथकाकडून सुरक्षा चाचणी करण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याने सीएमआरएसने सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे.