गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (18:22 IST)

राज्यात अतिवृष्टीचा इशारा, मुंबई महानगरपालिका सज्ज

मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात येत्या ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे. परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्याही सूचना केल्या आहेत.
 
हे लक्षात घेत मुंबई महानगरपालिका अतिवृष्टीला तोंड देण्यासाठी सज्ज असून महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महापालिकेच्या तयारीची माहिती दिली. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला.
 
मुंबईतील नाल्यांची केलेली स्वच्छतेची कामे, नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण याची माहिती देण्यात आली. तसेच पाणी साचेल अशी शक्यता असलेल्या ठिकाणी ४७४ पंप बसवण्यात आल्याचे तसेच अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी ज्युनिअर इंजिनिअर स्पॉटवर राहून पाणी निचऱ्याचे काम करतील असेही चहल यांनी सांगितले.
 
अलीकडेच हिंदमाताच्या परिसरात दोन मोठे टँक केले असून यामध्ये साचलेले पाणी वळते करून साठवण्याची व्यवस्था केली गेली आहे. तसेच पालिका क्षेत्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनला निधी देऊन स्कॉड तयार करण्यात आले आहे. हे स्कॉड वॉर्डमधील अडचणींचे निवारण करतील. झाडं पडल्यास हटवणे, रस्ते वाहतूकीसाठी मोकळे करणे या जबावदार्‍या पार पाडतील. तसेच प्रत्येक वार्डात मनपाच्या ५ शाळा तयार ठेवल्या आल्या असून गरजेनुसार लोकांना तिथे स्थलांतरीत करता येईल. एनजीओच्या मदतीने स्थलांतरीत लोकांच्या जेवणाची व्यवस्था देखील केल्याची माहिती चहल यांनी दिली.
 
या बैठकीत मुख्यमंत्र्यांना विभागातील इतर महानगरपालिका आयुक्त, जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून अतिवृष्टीच्या काळात करण्यात येणार असलेल्या सर्व उपाययोजनांचा आढावा घेतला. धोकादायक इमारती, दरडग्रस्त भागातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे असेही आदेश देण्यात आले आहेत.