पोलीसांचे कौतुक, अवघ्या तीन मिनिटात शोधून काढला हरवलेला मुलगा
अभ्यास करत नाही म्हणून वडील रागावल्याने एका 13 वर्षीय मुलगा घर सोडून ट्रेनमध्ये बसला आहे, इतक्या माहितीच्या आधारे जीआरपी पोलिसांनी हरवलेल्या मुलाला अवघ्या तीन मिनिटात शोधून काढलं.
मुंबईतील कल्याण जीआरपी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मिक शार्दूल यांना पो लीस नियंत्रण कक्षाद्वारे माहिती मिळाली होती की, “पालघर मध्ये राहणारा एक 13 वर्षाचा मुलगा अजमेर म्हैसूर या एक्सप्रेस गाडीने जाण्यास निघाला आहे”. ही माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांच्या हाती केवळ दहा मिनिटांचाच अवधी होता. कारण दहा मिनिटात कल्याण रेल्वे स्थानकात ही एक्सप्रेस गाडी येणार होती. कल्याण जीआरपीचे पोलीस अधिकारी डी.आर. साळवे हे पोलीस पथकासह रात्री 12.30 वाजता स्थानकात सज्ज झाले.
ही गाडी कल्याण स्थानकात केवळ चारच मिनिटे थांबते. त्यामुळे पोलिसांजवळ फक्त चार मिनिटांचा अवधी होता. मुलाच्या पालकांनी मुलाचा फोटो पोलिसांना व्हॉटसअॅपवर पाठवला होता. गाडी स्थानकात येताच पोलिसांनी गाडीचा ताबा घेतला. मुलाचा शोध घेतला. पोलिसांकडे असलेला मुलाचा फोटा पाहून त्यांनी एका 13 वर्षीय मुलाला हटकले. तेव्हा त्याने तो काकासोबत बाहेर जात असल्याचे सांगितले. फोटोतील मुलगा हाच असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.