गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 6 मार्च 2020 (16:00 IST)

महिलांकडे वाकड्या नजरेने पाहू नये : आदित्य

महिला ही जननी आहे. तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नये. शाळेपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे धडे देणे आवश्यत आहे. महिलांना व्यापक प्रमाणात स्वसंरक्षणाचे धडेही दिले गेले पाहिजेत, अशी भूमिका पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महिला सुरक्षेसंदर्भात मांडली आहे.
 
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत महिला सुरक्षेवर चर्चा झाली. या चर्चेत भाग घेताना आदित्य  यांनी अत्यंत कळकळीने आपले विचार मांडले. महिलांच्या सुरक्षेवर महिलांपेक्षा पुरुषांनी जास्तीत जास्त बोलायला हवे, असे नमूद करत आदित्य यांनी महिला सुरक्षा ते महिला सबलीकरण अशा विविध मुद्द्यांना स्पर्श केला. महिला सबलीकरण हा महत्त्वाचा मुद्दा असून यावर विधिमंडळात किमान दर तीन महिन्यांनी चर्चा व्हाला हवी. त्यातही महिलांपेक्षा पुरुषांना जास्त बोलण्याची संधी दिली पाहिजे. महिला महिलेबद्दल काळजीनेच बोलणार मात्र पुरुष त्यावर कसे बोलतात, हे ऐकण्यासारखे असेल, असे आदित्य म्हणाले.
 
तसेच ती आई आहेच शिवाय नर्स, शिक्षिका, मुख्याध्यापक, प्राध्यापिका, प्राचार्यही प्रामुख्याने महिलाच असतात. अशाप्रकारे आयुष्यातील महत्त्वाच्या प्रत्येक पारीवर कोणत्या ना कोणत्या रूपाने महिलांचेच संस्कार आपल्यावर घडत असतात. त्यानंतरही असे नक्की कोणते पुरुष आहेत जे महिलांकडे वाकड्या नजरेने पाहतात ते हुडकायला हवे. हा मोठा विषय असून याकडे गांभीर्याने पाहायला हवे, असे आदित्य म्हणाले. महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी कठोर कायदा व्हायला हवा, असे आपण सगळेच बोलत आहेत. पण प्रत्यक्षात शिक्षेवर बोलतानाच महिलांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचारच होणार नाही, यावरही बोलण्याची, सखोल विचार करण्याची गरज असल्याचे आदित्य यांनी नमूद केले.
 
शालेय अभ्यासक्रमात अगदी चौथीपासून 'राइट टच', 'राँग टच' काय असते हे शिकवायला हवे. महिलेवर कुठे अत्याचार होत असेल तर महिलेने कालीमातेचे रूप धारण करायला हवे, असे आवाहनही आदित्य यांनी केले.