बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (10:00 IST)

सुटी नव्हे, 'ड्युटी'; नरेंद्र मोदींच्या कन्याकुमारीतील 45 तासांच्या ध्यानाची पीएमओने अशी केली नोंद

narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 मे ते एक जून 2024 दरम्यान कन्याकुमारीच्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये '45 तास' ध्यानधारणा केली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकांचा प्रचार अखेरच्या टप्प्यात होता.
 
पीएम मोदींच्या ध्यानाच्या या 45 तासांची सरकार दरबारी नेमकी कशी नोंद करण्यात आली, याबाबत बीबीसीनं पंतप्रधान कार्यालय (पीएमओ)कडून RTI अंतर्गत माहिती मागवली होती.
 
या अर्जाच्या उत्तरात पीएमओनं, पंतप्रधानांनी सुटी घेतली नव्हती असं सांगितलं. त्याचबरोबर ‘पंतप्रधान कायम ड्युटीवर असतात’ असंही उत्तरात म्हटलं आहे.
 
पीएमओ कार्यालयानं उत्तरात असंही म्हटलं आहे की, मे 2014 मध्ये पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारला तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी एकही सुटी घेतलेली नाही.
 
नरेंद्र मोदींपूर्वीच्या भारताच्या माजी पंतप्रधानांपैकी काही जणांनी त्यांच्या कार्यकाळात सुट्या घेतल्या होत्या आणि त्याची माहितीही जाहीर केली होती.
 
भूतकाळाचा विचार करता आतापर्यंत पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत अनेकदा एखाद्या ज्येष्ठ मंत्र्यावर जबाबदारी सोपवली जात होती. काम सुरळीत सुरू राहावं म्हणून तसं केलं जात होतं.
 
के.एम. चंद्रशेखर भारत सरकारचे कॅबिनेट सचिव होते. कॅबिनेट सचिव हे नोकरशाहीतील सर्वोच्च पद आहे.
 
माजी कॅबिनेट सचिव चंद्रशेखर यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, “भारतात पंतप्रधान सुट्यांसाठी अर्ज करतील किंवा सुट्या मागतील अशी कोणतीही व्यवस्था नाही. पूर्वीच्या काळात पंतप्रधानांना त्यांच्यासाठी वेळ काढायचा असेल तेव्हा ते राष्ट्रपतींना याबाबत माहिती द्यायचे. तसंच कॅबिनेट सचिवांनाही याची माहिती दिली जायची.”
 
पंतप्रधान मोदींनी कन्याकुमारीला जाण्यापूर्वी कुणाला जबाबदारी सोपवली होती का? किंवा राष्ट्रपतींना माहिती दिली होती का? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती नाही.
 
कन्याकुमारीमध्ये ध्यान करण्याबाबत कोणतंही अधिकृत सरकारी निवेदन काढण्यात आलेलं नाही. पण पीएम मोदींच्या ध्यानाचे अनेक व्हीडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आणि एएनआय या वृत्तसंस्थेवर उपलब्ध आहेत. त्यावेळी अनेक टीव्ही वाहिन्यांनीही ते व्हीडिओ प्रसारीत केले होते.
 
30 मे रोजी डीडी न्यूजनं दिलेल्या वृत्तामध्ये पीएम मोदी 30 मेच्या सायंकाळपासून एक जूनच्या सायंकाळपर्यंत कन्याकुमारीत ध्यान करत होते, असं म्हटलं होतं. एएनआयनेही 31 मेच्या वृत्तामध्ये याचा उल्लेख केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी साधना करण्यात व्यग्र असतील आणि ही साधना ते ध्यानमंडपममध्ये करतील, असं त्यात म्हटलं होतं.
 
भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या या कृतीचं कौतुक केलं होतं. महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींच्या ध्यान साधनेचा एक व्हीडिओ अपलोड केला होता. त्यात त्यांनी, ‘मोदीजींच्या ध्यानाद्वारे प्राप्त झालेली दिव्य ऊर्जा’, असा उल्लेख केला होता.
 
तर मोदींनी केलेलं ध्यान हा राजकीय कार्यक्रम असल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली होती. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी हे केलं जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता.
 
संजय बारू हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार होते. त्यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळावर ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ डॉ. मनमोहन सिंह’ हे पुस्तकही लिहिलं आहे.
 
संजय बारू यांनी याबाबत बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, “पंतप्रधान मोदींनी कन्याकुमारीमध्ये केलेलं ध्यान हे त्यांच्या औपचारिक कर्तव्याचा (ड्युटी) भाग आहे असं म्हणणं हास्यास्पद ठरेल. लोक ध्यान करतात तेव्हा ते त्यांची ड्युटी म्हणून करतात का? एखादी संघटना त्यांच्या कर्मचाऱ्याच्या ध्यान करण्याला त्याची ड्युटी म्हणून मान्य करेल का? त्याचबरोबर जेव्हा पंतप्रधान उपलब्ध नसतात तेव्हा त्यांची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याला द्यायला हवी. म्हणजे ते सरकारचं काम सुरू ठेवतील.”
 
ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी नुकतंच त्यांच्या ‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसाइड’ मध्ये पंतप्रधानांच्या कार्यशैलीचं अत्यंत बारकाईनं वर्णन केलं आहे. त्यांनाही पीएमओनं पंतप्रधानांच्या साधनेला ड्युटी म्हणणं विचित्र वाटलं.
 
“पूजा करणं हा पंतप्रधानांचा अधिकार आहे. पण अशाप्रकारे साधना करण्याचा अधिकृत ड्युटी म्हणणं हे माझ्या समजण्यापलिकडं आहे. त्यांच्या साधनेच्या वेळी ते ड्युटीवर होते, असं म्हणणं मला तर्कसंगत वाटत नाही.”
 
सुधींद्र कुळकर्णी हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सल्लागार होते. त्यांना पंतप्रधान मोदींची साधना म्हणजे ड्युटी आहे, असं सांगण्यात काही गैर वाटत नाही. पंतप्रधान कायम कर्तव्यावर असतात, असं त्यांचं मत आहे.
 
कुळकर्णी यांनी वाजपेयींनी पंतप्रधान असताना घेतलेल्या सुटीबाबतही आठवण सांगितली. “त्यांनी 2000 मध्ये केरळमध्ये सुटी घेतली होती, त्यावेळी वाजपेयी व्यग्र नाहीत असा काळ क्वचितच आला असेल. त्यांच्यासमोर काही ना काही काम येतच होतं. "
 
"मला आठवतं, त्यावेळी त्याठिकाणचे मुख्यमंत्री त्यांना भेटायला आले होते. सोबत प्रशासनातील काही लोकही होते. पंतप्रधान सुटीवर होते, पण सुटीचा आनंद घेत होते असं म्हणणं चुकीचं ठरेल."
 
"आणखी एक बाब म्हणजे, जेव्हा तुम्ही किंवा मी सुटी घेतो त्यावेळी ज्याठिकाणी आपण काम करतो त्या संस्था आपलं काम दुसरं कुणाकडं तरी सोपवतात. पण पंतप्रधान पदाच्या पातळीवर ही बाब लागू होऊ शकत नाही.”
 
माजी कॅबिनेट सचिव चंद्रशेखर म्हणाले की, पंतप्रधान सुटीवर असो वा नसो त्यांच्यासाठी कायम सर्व प्रकारच्या सुविधा सज्ज असतात.
 
त्यांच्या मते, “गरज असते तेव्हा त्यांना सज्ज राहावं लागतं. पंतप्रधानांचा स्टाफ, एसपीजी आणि न्यूक्लिअर ब्लॅक बॉक्स कायम त्यांच्याबरोबर असतो. त्यामुळं त्यांना गरज असेल तेव्हा आवश्यक ती पावलं उचलणं शक्य होऊ शकतं. पंतप्रधान मोदी कन्याकुमारीला गेले, त्यावेळीही अशाप्रकारची काळजी घेतली गेली असेल, यात मला शंका वाटत नाही.”
 
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं ऑपरेशन होणार होतं, त्यावेळी त्यांनी तेव्हाचे ज्येष्ठ मंत्री प्रणव मुखर्जी यांना मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.
 
टी.के.ए. नायर त्यावेळी पंतप्रधान कार्यालयात मुख्य सचिव होते. ते म्हणाले की, “पण आम्ही पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासाठी सुटीचा अर्ज दिल्याचं मला तरी आठवत नाही.”
 
परदेशात पंतप्रधान किंवा राष्ट्रपती सुटीबाबत सार्वजनिकरित्या चर्चा करतात.
 
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी सुटी घालवली आहे. अनेक शतकं त्यांच्याकडे तसं होत आहे.
 
इतिहासकार लॉरेन्स नट्सन त्यांच्या एका लेखात लिहितात की, “जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सुटीवर जातात तेव्हा ते एअर फोर्स वनच्या विमानानं जातात. त्यांचा कम्युनिकेशन स्टाफ, सिक्रेट सर्व्हिस, त्याठिकाणचे पोलीस आणि माध्यमांचे प्रतिनिधीही त्यांच्या आसपास असतात. बारीक-सारीक माहिती त्यांना दिली जात असते. राष्ट्राध्यक्ष गोल्फ कार्टमध्ये असो, जहाजात असो किंवा डोंगरावर असो. त्यांच्याकडे माहिती आणि संवादाची साधनं त्यांच्या कार्यालयाप्रमाणे सहज उपलब्ध असतात.”
 
अनेक वर्षांपासून या सुट्यांवर वाद सुरू असल्याचंही नट्सन म्हणतात. सुट्यांवर होणारा खर्च, वारंवार घेतल्या जाणाऱ्या सुट्या आणि त्यांचा कालावधी यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण तरीही “राष्ट्राध्यक्ष सुट्या घेतच राहिले.”
 
ब्रिटनबद्दल बोलायचं झाल्यास त्याठिकाणीही पंतप्रधान अगदी जनतेसमोर त्यांच्या सुट्यांची माहिती देतात.
 
पण तसं असलं तरी पंतप्रधानांना सुट्यांदरम्यान आवश्यक ती माहिती उपलब्ध असते. पण सुटीवर जाण्यापूर्वी तेही एका मंत्र्याची नियुक्ती करतात. ते पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत त्यांची दैनंदिन कामं सांभाळतात. पण नुकतेच माजी पंतप्रधान ऋषी सुनक त्यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा सुटीसाठी कुटुंबाबरोबर गेले होते, त्यावेळी त्यांनी अशीच व्यवस्था केली होती.
 
नीरजा चौधरी यांच्या मते, नेत्यांचं सुट्यांबाबतचं मत हे त्यांचे समर्थक सुट्यांच्या मुद्द्याकडं कोणत्या दृष्टीकोनातून पाहतात, यावर ठरत असतं.

Published By- Dhanashri Naik