बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मार्च 2023 (22:57 IST)

37 हजार फुटां'वर कॉफी-मिठाईचा आस्वाद घेणं वैमानिकांच्या अंगलट, विमान उडवण्यास बंदी

spice jet
होळीची धामधूम संपलेली दिसत असली तरी अनेकांच्या चेहऱ्यावरील लागलेला रंग अजूनही तसाच असेल. त्यातही होळीच्या दिवशी खाल्ली जाणारी मिठाई तर अनेक आठवड्यांची सोबत तुम्हाला देतेच ना.
 
होळीच्या दिवशी काय धमाल केली हे अनेक जण विसरले देखील असतील पण होळी दिवशी मिठाईचा आस्वाद घेतल्यामुळे दोन पायलटच्या रंगाचा भंग झाल्याचे दिसत आहे.
 
स्पाइसजेटने आपल्या दोन पायलटला विमान उडवण्याची बंदी घातली आहे. कारण त्यांनी कॉकपीटमध्येच कॉफी आणि गुजिया (करंजी)चा आनंद लुटला. विशेष म्हणजे त्यावेळी हे सदर विमान हे 37,000 फूट उंचीवर होते.
 
कॉफीचा खुला कप (ज्यावर स्पाइसजेट लिहिलेलं आहे) कंट्रोल पॅनेलमध्ये असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि स्पाइसजेटने कारवाई करत आपल्या दोन पायलटला जमिनीवर उतरवलं.
 
या फोटोमुळे भारतीय हवाई नियामक मंडळाने संबंधित एअरलाइनला नोटीस बजावली. यावर बुधवारी स्पाइसजेटने निवेदन प्रसिद्ध केले आणि सांगितले की आम्ही या प्रकाराची चौकशी करत आहोत. कथितरीत्या ते ड्युटीवर नसताना हा फोटो घेतला असावा असं एअरलाइन्सने म्हटले आहे.
 
या संबंधित योग्य ती कारवाई चौकशीअंती केली जाईल असे स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
 
भारतीय हवाई वाहतूक नियामक मंडळाच्या नियमावलींनुसार पायलटला कॉकपीटमध्ये खाण्या-पिण्यास मनाई नाही पण त्यांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे बंधन आहे. म्हणजेच कपावर झाकण असणे आवश्यक आहे, कारण कॉकपीटमध्ये चहा-कॉफी सांडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
 
8 मार्च रोजी म्हणजेच होळीच्याच दिवशी दिल्ली ते गुवाहाटी या प्रवासादरम्यान ही घटना घडल्याचे वृत्त आहे.
 
फोटोमध्ये असे दिसत आहे की विमानाच्या स्टार्ट लिव्हरजवळच कॉफीचा उघडा कप आहे आणि दोन्ही पायलट्सच्या हातात गुजिया (करंजी) आहे. पण त्यांचे चेहरे दिसत नाहीत.
 
सोशल मीडियावर यानंतर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जणांनी पायलटची वर्तणूक निष्काळजीपणाची असल्याचे म्हटले आहे.
 
एक छोटासा धक्का आणि कॉफी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणावर पडू शकते, यामुळे यंत्रणा बिघडू शकते. हे गुन्हेगारी कृत्य आहे असं एव्हिएशन तज्ज्ञ मोहन रंगनाथन यांनी म्हटलं आहे. त्यांनीच सर्वांत आधी हा फोटो शेअर केल्याचे म्हटले जात आहे.
 
भारतीय हवाई वाहतूक नियामक मंडळाने (DGCA) या प्रकरणात स्पाइसजेटला आदेश देऊन तत्काळ कारवाई करावी असे सांगितले.
 
सध्या या वैमानिकांना विमान उडवण्यास स्पाइसजेटने बंदी घातली आहे तरी, स्पाइसजेटने द हिंदू या वर्तमानपत्राला सांगितले आहे की या घटनेची नेमकी वेळ काय हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
 
फोटोवरून हे ठरवणे कठीण आहे की नेमका हा फोटो केव्हा घेण्यात आला. हा नवा फोटो आहे की जुना आहे, नेमका त्यावेळी विमान सुरू होते की नाही इतर गोष्टींची शहानिशा होणे आवश्यक आहे, असं एअरलाइन्सने म्हटले आहे.