ओडिशा : भात न बनवल्याने पत्नीची हत्या, आरोपी पोलिस कोठडीत
संबलपूर: ओडिशातील संबलपूर जिल्ह्यातील पोलिसांनी सोमवारी एका व्यक्तीला तांदूळ न शिजवल्यामुळे पत्नीला मारहाण केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले. जामनकिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुआधी गावात रविवारी रात्री ही घटना घडली. 40 वर्षीय सनातन धारुआ असे आरोपीचे नाव असून त्याच्या पत्नीचे नाव 35 वर्षीय पुष्पा धारुआ असे आहे. सनातन आणि पुष्पा यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांची मुलगी कुचिंदा येथे घरकाम करते, तर मुलगा रविवारी रात्री मित्राच्या घरी झोपायला गेला होता.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा सनातन घरी परतला तेव्हा त्याला आढळले की पुष्पाने भात नाही तर फक्त भाजी शिजवली होती. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि यादरम्यान त्याने पत्नीवर हल्ला केला. ज्यात तिचा मृत्यू झाला.
मृत महिलेचा मुलगा घरी परतल्यावर ही बाब उघडकीस आली. त्याला त्याची आई मृत दिसली. त्यानी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पतीला ताब्यात घेतले.
जामनकिरा पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक प्रेमजीत दास यांनी सांगितले की, सोमवारी शवविच्छेदन करण्यात आले आणि आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.
Edited by : Smita Joshi