शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जुलै 2021 (15:40 IST)

आता जुलै महिन्यात तरी पाऊस बरसणार का ? हवामान विभाग म्हणते…

यंदा जून महिन्यात भारतात सरासरी आणि काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आता जुलै महिन्यात देखील देशभरात सरासरीच्या तुलनेत ९६ ते १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ऑगस्ट महिन्यातील मान्सूनचा अंदाज जुलै महिन्याच्या उत्तरार्धात जाहीर केला जाईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.
 
भारतीय हवामान शास्त्र विभागाने जुलै महिन्याचा मान्सूनचा अंदाज जाहीर केला असून, त्यानुसार जुलै महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर सुरुवातीला चांगला बरसला त्यानंतर मात्र काहीसा पावसाचा खंड पडला. मागील २-३ दिवस महाराष्ट्र पुन्हा चांगला बरसला. मात्र, आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता नाही आहे.
 
संपूर्ण देशात जुलै महिन्याचा विचार करता उत्तर आणि उत्तर पश्चिम भारतात पाऊस सर्वसाधारण राहील. मध्य भारतातील काही ठिकाणी सर्वसाधारणच्या तुलनेत अधिक पाऊस होईल. महाराष्ट्राचा किनारी प्रदेश आणि सह्याद्री परिसरात सर्वसाधारणच्या तुलनेत कमी पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्याच्या पूर्वेकडील बाजूस सर्वसाधारणच्या तुलनेत अधिक पाऊस होईल. विदर्भात सर्वसाधारणच्या तुलनेत कमी पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रात देखील तुलनेने कमी पाऊस होईल.
 
दरम्यान,गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. दि. २ जुलै रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
गेल्या २५ ते ३० वर्षाचा विचार करता भारतीय हवामान खात्याचे अंदाज अचूक नसतात, असे मत काही शेतकरी आणि काही सामाजिक आणि राजकीय तज्ज्ञ देखील व्यक्त करतात. परंतु अलीकडच्या काळात पावसासंबंधी अचूक अंदाज वर्तवण्यासाठी भारतीय हवामान खात्याने वेगवेगळे नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. भारतीय हवामान विभागाकडून एक नवा प्रयोग केला जात आहे. आता दर महिन्यातील मान्सूनच्या पावसाचा अंदाज वर्तवला जातो आहे.  त्यामुळे संपूर्ण देशाचा विचार केला तर जुलै महिन्यात पाऊस सरासरी राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
 
संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून जुलै महिन्यात सरासरी राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात कमी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रासह देशात चांगला पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. तर जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो. साधारण दि. ८ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापत असतो, मात्र मान्सून कमकुवत झाल्याने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून संपूर्ण देश व्यापण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, अरबी समुद्रातील पश्चिमी वाऱ्यांनी हा भाग व्यापला की तापमान खालवण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, मान्सून दिल्ली, हरियाणा, राजस्थानातील काही भाग आणि पंजाबमधील काही भागात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही दिवस उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारतात पाऊस कमी असणार आहे. शेतकऱ्यांकडून पेरण्यांची कामं साधारणत: जुलै महिन्यात उत्तर भारतात सुरु होतात. त्यामुळे पाऊस कमी असलेल्या भागात सिंचनाची परिस्थिती पाहून पेरण्या कराव्यात अन्यथा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होणार असल्याने शेतीची कामे करावीत, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.