शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (06:21 IST)

सात जन्मांचे पाप नष्ट करणारी देवी कात्यायनी

दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'आज्ञा' या चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो. परिपूर्ण आत्मदान करणार्‍या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते.
 
दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.
 
काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा पुराणात आहे.
 
कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्‍णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेजःपुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे.
 
कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो. तो रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्त होतो. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.
 
देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे. ज्यात संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत. कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात. 
 
विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, आणि सहजीवन. देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतीक आहे. आत्म्याशी एकरूप होणे हे खरे नातेसंबंध.