रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जुलै 2024 (17:01 IST)

भुशी डॅम अपघातानंतर पुणे जिल्हा प्रशासनाने पर्यटकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या

लोणावळ्या जवळील भुशी डॅमच्या धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याच्या अपघातानंतर आता पुणे जिल्हा प्रशासनाने पर्यटकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. पर्यटकांना संभाव्य धोकादायक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली असून सायंकाळी 6 नंतर पर्यटकांना धरणावर जाण्यास बंदी करण्यात आली आहे. या शिवाय पर्यटनस्थळी गोताखोर,बचाव नौका आणि लाईफ जॅकेट ठेवण्यास सांगण्यात आले आहे. 
भुशी डॅम जवळ धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना घडली. या अपघातात एका महिलेसह चार मुले वाहून गेली.नंतर त्याचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 
 
या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना संभाव्य धोके ओळखून मुळशी, मावळ, खेड, जुन्नर, वेल्हा, भोर,आंबेगाव भागात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना करण्यास सांगितले आहे. या साठी पश्चिम घाटाचे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे.  

अधिकाऱ्यांना नद्या, धरणे,किल्ले, धबधबे या क्षेत्रात तसेच पर्यटनस्थळी चेतावणी देणारे फलक लावून प्रतिबंधित क्षेत्रांचे सीमांकन करण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणी आपत्ती प्रवण आहे त्या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेण्यास सांगितले तसे न झाल्यास त्यांना तातडीनं बंद करावे. 
 
सध्या वर्षाविहार सहलीसाठी पर्यटक भुशी,पवना धरण परिसर,लोणावळा,सिंहगड,माळशेज घाट आणि ताम्हिणी घाट येथे भेट देतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन,रेल्वे ,महानगरपालिका सारख्या यंत्रणांना पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांसाठी गोताखोर,बचाव नौका,लाईफजॅकेट ठेवण्याचे निर्देश दिले आहे. 
 
Edited by - Priya Dixit