शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (07:17 IST)

‘मी त्याला मारले नसते तर त्याने मला मारले असते’ कर्वेनगरच्या तरुणाचे गूढ उकलेना

पुण्यातल्या कर्वेनगर परिसरातून एक तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याच्या तिसऱ्याच दिवशी त्या बेपत्ता तरुणाच्या घरी कुरियर पार्सल आले आणि त्याच्या कुटुंबाची झोप उडाली. कुरियर पार्सलमध्ये त्या तरुणाचा मोबाईल, कागदपत्रे आणि ‘मी त्याला मारले नसते तर त्याने मला मारले असते’ असे लिहीलेली ‘नोट’ आढळली आहे. त्यामुळे पोलीस देखील याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पण, अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही. 
 
याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. याबाबत अपहरण झालेल्या 29 वर्षीय तरुणाच्या भावाने तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेला तरुण एका ड्रायव्हिंग स्कुलमध्ये काम करतो. दरम्यान, धानोरी येथे राहणाऱ्या एका तरुणांकडे त्याने सेकंड हॅन्ड कारसाठी 9 ते 10 लाख रुपये दिले होते. पण त्याने कार दिल्या नाहीत. तर दिलेले पैसेही परत केले नव्हते. यामुळे त्यांच्यात वाद होते.
 
दरम्यान, बेपत्ता झालेला तरुण रविवारी एका मेडिकलच्या दुकानात गेला होता. त्यानंतर तो गायब झाला. त्याच्या कुटुंबाने तो न आल्याने रात्री पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मिसिंग दाखल केली. तोपर्यंत या प्रकरणात गंभीर असे काहीच नव्हते. पण तिसऱ्या दिवशी या तरुणाच्या घरी एक कुरियरमधून पार्सल आले. कुटुंबाने ते पाहिले. यावेळी त्यात बेपत्ता झालेल्या तरुणाचा मोबाईल, त्याचे संपूर्ण कागदपत्रे आणि एक नोट आढळून आली. त्या नोटमध्ये ‘आमचे पैसे व्यवहारचे होते. पण, त्यातून वाद झाले. मी त्याला मारले नसते तर त्याने मला मारले असते. त्यामुळे तुम्ही याचा शोध घेऊ नका’ असा उल्लेख केला आहे. कुटुंबाला हा प्रकार समजताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी या बेपत्ता प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तपासला सुरुवात केली आहे.