मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जुलै 2023 (15:38 IST)

पुण्यातीला डॉक्टरला आयसिसशी संबंध असल्याचा आरोपाखाली NIAकडून अटक

arrest
पुणे शहरातील कोंढवा भागात नॅशनल इनव्हेस्टीगेशन एजन्सी (एनआयए) ने एक मोठी कारवाई केली आहे.
पुण्यातील 43 वर्षीय डाॅक्टरला कट्टरतावादी संघटनांशी संबंध असल्याप्रकरणी आणि देशविघातक कृत्यांप्रकरणी अटक करण्यात आला आहे. अदनान सरकार असं या डॉक्टरचं नाव आहे. त्यांच्या कोंढवा भागातल्या घरावर छापा टाकून तिथून काही इलेक्ट्राॅनिक साहित्यही जप्त करण्यात आलं आहे.
 
नेमकं प्रकरण काय?
28 जून 2023 पासून एनआयएने हाती घेतलेल्या कारवाईमधली सरकार यांची ही पाचवी अटक आहे.
 
याआधी चार जणांना मुंबई, ठाणे आणि पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे.
 
तबीश नासर सिद्दिकी (मुंबई), झुबैर नूर मोहम्मद शेख (पुणे), शार्जील शेख आणि झुल्फीकार अली बरोदावाला (ठाणे) अशी याआधी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.
 
एनआयएकडून महाराष्ट्रातील आयसिसच्या माॅडेलचा तपास सुरु आहे.
 
तपास यंत्रणा डाॅ. सरकारपर्यंत कशी पोहोचली?
सरकार यांच्या कोंढवा भागातील घरावर एनआयएकडून छापे मारण्यात आले. यामधून एनआयएने बरंच साहित्य जप्त केलं आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आि आयसिसशी संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे.
 
यामधून सरकार यांचे आयसिसशी असलेले संबंध उघड झाले आहेत, असं एनआयएने दिलेल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये सांगितलंय.
 
तसंच डाॅक्टर सरकार हे आयसिसचा हिंसक अजेंडा पुढे नेण्यासाठी तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी भरती करत होते, अशी माहिती एनआयएने प्रेस रिलिजमध्ये दिली आहे.
 
 
आरोपीने इस्लामिक स्टेट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक एँड लेव्हंट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक एँड सिरिया यासारख्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आयसिसच्या दहशतवादी कारवायांमध्ये मदत केल्याचं एनआयएने म्हटलं आहे.
 
डाॅक्टर सरकार भारताची शांतता, एकात्मता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचं एनआयएच्या तपासात आढळलंय. ‘आयसिस महाराष्ट्र माॅड्यूल’ अंतर्गत हे सुरु असल्याचं एनआयएने म्हटलेलं आहे.
 
डाॅक्टर अदनान सरकार कोण आहे?
मिळालेल्या माहितीनुसार डॉ. सरकार पुण्यातील एका खाजगी दवाखान्यासोबत संलग्न होते आणि अनेस्थेशाॅलाॅजिस्ट म्हणून काम करत होते.
 
इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार सरकार यांनी 2001 साली बी जे मेडिकल काॅलेजमधून एमबीबीएसची डीग्री घेतली होती.
 
त्यानंतर त्यांनी अनेस्थेशियालाॅजीमध्ये एमडी पूर्ण केलं. पुणे आणि मुंबईतील प्रसिद्ध दवाखान्यांमध्ये त्यांनी काम केल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
 
दोन वाॅन्टेड गुन्हेगार दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात
18 जुलै 2023 रोजी पुणे पोलिसांनी तीघांना दुचाकी चोर असल्याच्या संशयातून ताब्यात घेतलं. या संशयितांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या घरातून एक जिवंत काडतुस, चार मोबाईल, एक लॅपटाॅप आणि इतर कागदपत्रे सापडली.
 
यातून हे संशयित देशविघातक कृत्यास सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यातून अधिक चौकशी केली असता, हे एनआयएच्या फरार लिस्टमधले आरोपी असल्याचं निष्पन्न झालं.
 
यानंतर पुणे पोलिसांनी त्यातील दोघांना दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवलं. या प्रकरणाचा पुढचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून केला जातोय.
 
“आम्हाला तपास करताना आढळलं की, ते फरार आरोपी यादीमधले गुन्हेगार आहेत. त्यानंतर त्यांना दहशतवाद विरोधी पथकाकडे सुपुर्द करण्यात आलं. या केसमधली पुढची कारवाई एटीएसकडून केली जातेय,” अशी माहीती बीबीसी मराठीसोबत बोलताना पुणे पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
 
आरोपींना आसरा देणाऱ्याला अटक
या दोन आरोपींना राहण्यासाठी जागा देणाऱ्याला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केल्याचं लोकसत्ता या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे.
 
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावं मोहम्मद इम्रान युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ मोहम्मद याकूब साकी अशी असून त्यांना अब्दूल कादीर दस्तगीर पठाण याने राहायला जागा दिल्याचं दहशतवाद विरोधी पथकाने कोर्टात सांगितल्याचं लोकसत्ताने म्हटलं आहे.
 
मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी हे जयपूर बाॅम्बस्फोटामधले फरार आरोपी असल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यांच्यावर एनआयएने गुन्हा दाखल केल्यानंतर ते मुंबईत पळून आले होते.
 
या दोघांची पार्श्वभूमी माहिती असूनही त्यांना अब्दूलने राहायला जागा दिल्याचा दावा एटीएसने न्यायालयात केला.
 
या आरोपींना कोर्टाने ५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
Published By- Priya Dixit