सुनील जाखड यांच्या नाराजीमुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र आपण काँग्रेस पक्षाचाच एक भाग राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जाखड हे पंजाबच्या राजकारणातील एक मोठा हिंदू चेहरा आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना प्रचार समितीचे अध्यक्ष केले मात्र त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. जाखड काही दिवसांपासून नाराज असल्याचे व्यक्त केेेले जात होते. नुकतेच ते म्हणाले होते की हिंदू असल्यामुळे ते पंजाबचे मुख्यमंत्री होऊ शकले नाही.
राज्यात सुमारे 38 टक्के हिंदू मतदार आहेत. त्यांचा शहरी भागातील 46 जागांवर प्रभाव असून भाजपला शहरी भागात पाठिंबा मिळत आहे. पण 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने शहरी भागात चांगली कामगिरी केली होती पण आता सुनील जाखड यांच्या नाराजीमुळे हिंदू मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो.
जाखड यांनी दावा केला होता की पक्षाच्या हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जागी नवीन मुख्यमंत्रिपदासाठी आमदारांचे मत घेतले असताना 42 आमदार त्यांच्या बाजूने होते. सिद्धू यांना सहा तर चन्नी यांना केवळ दोन मते मिळाली. मात्र मुख्यमंत्र्यांनी पगडी असावी, असे मत पक्षातील अनेक नेत्यांचे होते. त्यामुळेच पाठिंबा असूनही ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत.