रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: शनिवार, 11 जून 2022 (12:48 IST)

राज्यसभा निवडणूक निकाल :शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं 'या' शब्दांत केलं कौतुक

sharad panwar
राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत.
 
मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत.
 
शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना 33, तर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांना 41 मतं मिळाली.
 
राज्यसभेच्या या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निकालाबाबत भाष्य केले आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
 
प्रफुल्ल पटेल एक जादाचे मत कुठले ?
राज्यसभेच्या एकूण निकालावर बोलताना पवार म्हणाले की, "मला धक्का बसेल असा निकाल नाही. प्रत्येक उमेदवाराच्या मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या कोट्यामध्ये काही फरक पडलेला नाही."
 
राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना एक मत जादा मिळाले आहे, त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडले आहे आणि ते कुठून आले आहे ते मला ठाऊक आहे. ते महाविकास आघाडीचे नाही"
 
'देवेंद्र फडणवीस यांना माणसं आपलीशी करण्यात यश'
यावेळी बोलताना शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. ते म्हणाले की "मान्य केले पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आले आहे"
 
ते म्हणाले, "शिवसेनेने लढवलेल्या सहाव्या जागेसाठी मतांची संख्या कमी होती. तिथे आमचा फरत वाढत होता. पण धाडस करत प्रयत्न केला. यामध्ये अपक्षांची संख्या भाजपाकडे अधिक होती पण दोघांनाही पुरेशी नव्हती.
 
त्यामुळे भाजपाला आम्हाला पाठिंबा देणारे जे इच्छुक होते त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी भाजपाने जी कारवाई केली त्यामध्ये त्यांना यश आले. त्यामुळे हा फरक पडला आहे.
 
आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झाले आहे. यामध्ये वेगळे काही नाही. मान्य केले पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आले आहे."
 
माझ्यावर प्रेम करणारे अनेक त्यामुळे मला एक मत विरोधकांकडून जास्त मिळाले - प्रफुल्ल पटेल
आमच्या आमदारांनी ठरल्याप्रमाणेच मतदान केले. मात्र, आम्हाला अपक्षांचे चार ते पाच मत मिळाले नाही. तसेच एक मत अवैध ठरवले. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता आले नाही. या सर्वांचा विचार केला तर फार मोठा फटका बसलेला नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ठरल्याप्रमाणेच मतदान केले. अपक्ष आणि आमच्यासोबत असलेल्या लहान पक्षांनी महाविकास आघाडीलाच मतदान केले. महाविकास आघाडीतील नेत्यांचे मत फुटले नाही. काही लोकांची वेगळी प्रवृती असू शकते. त्याच्या खोलात जावे लागेल, असेप्रफुल्ल पटेल म्हणाले.
 
या वक्तव्याचा राजकीय अर्थ काय?
फडणवीसांना माणसं जवळ करता आली म्हणजे उद्धव ठाकरे यांना करता आली नाहीत असाही त्याचा अर्थ होतो असं राजकीय विश्लेषक सांगतात.
 
मतदानाच्या एक दिवस आधी पडद्यामागे ज्या घडामोडी झाल्या त्यानुसार शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसकडे पहिल्या पसंतीची मतं मागितली होती. प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीसाठी 46 मतं ठरली होती पण राष्ट्रवादी काँग्रेसने काही मतं शिवसेनेला दिली असं ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या.
 
"म्हणूनच शरद पवार असं म्हणाले. कारण आम्ही एवढी जुळवाजुळव करूनही तुम्हाला अपक्षांना सांभाळता आलं नाही असं पवारांना सांगायचं आहे." असंही मृणालिनी सांगतात.
 
शिवाय, आमदारांची नाराजी ही सुद्धा यामागची पार्श्वभूमी आहे. मुख्यमंत्री आमदारांना वेळ देत नाहीत, त्यांना भेटत नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार काही दिवसांपूर्वी म्हणाले की अजितदादांकडे पाहून आम्ही मत देऊ आणि मिलिंद नार्वेकरांनी आम्हाला आश्वासन दिलंय.
 
"याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचं थेट नातं नाही हे दिसतं. सचिवांच्या सांगण्यावरून हालचाली सुरू आहेत." असंही त्या म्हणाल्या.
 
त्या पुढे सांगतात, "राज्यसभा यांसारख्या निवडणुकीत व्यूहरचना महत्त्वाची असते. त्यानुसार काम करणारे 2-3 नेते तरी आवश्यक असतात. शिवसेनेत तसं कोणी दिसत नाही. तसंच नेतृत्त्वाला 24 तास झोकून देऊन काम करावं लागतं. जसं शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस करतात. उद्धव ठाकरेंच्याबाबतीत हे होताना दिसत नाही
 
शरद पवार यांचं वक्तव्य म्हणजे उद्धव ठाकरे यांना खोचक टोला आहे या मताशी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई मात्र सहमत नाहीत.
 
ते म्हणाले, "शरद पवार यांनी फडणवीसांचं कौतुक केलं म्हणजे त्यांनी केवळ मान्य केलं की महाविकास आघाडी कमी पडली. देवेंद्र फडणवीसांना चमत्कार करून दाखवला असंही ते म्हणाले. याचे अनेक अर्थ निघतात. अपक्षांना आपल्याकडे वळवून घेण्यात महाविकास आघाडीला यश आलं नाही. पण त्यांनी टोला लगावला असं मला वाटत नाही."
 
अपक्षांच्या पाठिंब्यासाठी उद्धध ठाकरेंनी प्रयत्न केले होते. पण जोखीम होतीच. सहा मतं भाजपकडे वळली हे स्पष्ट आहे
 
"स्वाभिमानी पक्ष, बहुजन विकास आघाडी उद्धव ठाकरेंना भेटले असंही सांगण्यात येत होतं परंतु त्यांना त्यांनी मनं वळवता आली नाहीत हे यावरून सिद्ध होतं. त्यामुळे नातेसंबंध जपता आले पाहिजेत असं पावारांना सांगायचं आहे." असंही देसाई सांगतात.