रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2016 (12:04 IST)

पुस्तके वाचल्या शिवाय भाषेचा विकास नाही – उत्तम कांबळे

समाज जीवनात पुस्तकेच माणसात लढण्याची क्षमता निर्माण करतात. कला हे माणसांच्या संवेदना व्यक्त करण्याचे प्रभावी साधन असून अशा संवेदना विकसित करण्याचे काम पुस्तके करतात. पुस्तक हे ज्ञानाचे झाड असून ती वाचल्या खेरीज भाषेचा विकास होत नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार उत्तम कांबळे यांनी आज नाशिक येथे बोलताना केले.
 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ‘वाचन संस्कृती’ या विषयावर आयोजित दुसऱ्या व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी प्रा. दादासाहेब मोरे हे होते. यावेळी व्यासपीठावर ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्राचे प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे होते.
 
उत्तम कांबळे म्हणाले, ज्याला दृष्टि पाहिजे त्याने पुस्तके वाचावीत. कारण निसर्ग डोळे देतो आणि ग्रंथ दृष्टि देतात. डोळे ही माणसाची ग्लोबल भाषा असते. ग्रंथांच्या वाचनातून माणसाला विचार मिळतो. काळ, काम, गती हे सर्व बदलांतून येते असे सांगून जगातील सर्व दुःखांचा जन्म हा मार्मिक तृष्नेतून होतो असे ते म्हणाले. जिथे पोकळी असते तिथेच नवनिर्माण होते. यासाठी पुस्तकांशी संवाद साधला जाणे आवश्यक आहे. पुस्तके आणि वाचनसंस्कृती याविषयी बोलताना उत्तम कांबळे यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील जगण्याचा संघर्ष मांडला. दु:खावर मात करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी केलेले प्रयत्न आणि पुस्तकांपर्यंतचा प्रवास त्यांनी विविध उदाहरणांनी स्पष्ट केला. 
 
प्रा. दादासाहेब मोरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मधुकर शेवाळे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, संशोधक व बीबीए विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक ग्रंथपाल प्रकाश बर्वे आदींनी विशेष परिश्रम घेतले.